मराठी पदें - पदे १७१ ते १७५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १७१
माझ्या माहेरीची गोष्ट । तुला सांगतें मी स्पष्ट ।
ऐक सांडोनिया कष्ट । ग सये बाई ॥१॥धृ॥
गुरु बाप श्रुती माई । संतजन माझे भाई ।
चिदाकासीचे देसाई । अनुभवी जे कां ॥२॥
वस्ती निरंजन देसी । बहुत जुनाट मिरासी ।
सर्व सुखाचिया रासी । त्यापासी सये ॥३॥
श्रुती माझी मायबाई । तीचे गुण सांगूं काई ।
जीच्या योगें मज सोई । सांपडली सये ॥४॥
तीचे पतिव्रतापण । काय सांगू तुजलागून ।
नेणे बापाजी वाचून । दुसरें कांहीं ॥५॥
गजलागीं नानापरी । शिकविलें वारंवारीं ।
आत्मा अनात्मा कुसरीं । निवडुनी दिल्ही ॥६॥
तिचे वचनीं विश्वास । ठेवूनी मी सावकाश ।
देखियला महापुरुष । सद्गुरुराय ॥७॥
गुरु बापाजी रायाचें । रूप न बोलवे वाचे ।
परि बोल अबोलाचे । बोलले सये ॥८॥
रूपावीण रूपवंत । गुणावीण अळंकृत ।
मोठेपणीं त्याचा अंत । नाहीं ग सये ॥९॥
सर्वांठायीं व्यापून । राहिला अकर्तेपण ।
कदा नाहीं येणें जाणें । तयासि सये ॥१०॥
ज्याचिया प्रकाशानें । अग्नी चंद्र सूर्य मन ।
सर्व प्रकाशती जाण । ग सये बाई ॥११॥
भोगावेण सुखरूप । पुण्यावीण तो निष्पाप ।
ऐसा माझा गुरू बाप । आहे ग सये ॥१२॥
तोचि आकारा येऊन । सांगितलें मज ज्ञान ।
अनुभवासी येऊन । जाले मी सुखी ॥१३॥
संत बंधु जिरायाचे । गुण किति गाऊं वाचे ॥
भाग्यवंत दैवाचे । ते सई बाई ॥१४॥
अनंत ब्रह्मांडांचे । सत्ताधारी राज्य ज्याचें ॥
अकर्तेपणानें त्याचें । करितीं राज्य ॥१५॥
श्रुति गुरुच्या वचनीं । नांदतीं तत्परणीं ॥
ब्रह्मानंद सुखखाणी । भोगिती जे कां ॥१६॥
माझ्या जीवीचे जिवलग । मायबाप बंधूवर्ग ॥
त्याच्या योगें सर्वजग । सुखाचें मला ॥१७॥
त्यांनीं कृपाळू होऊन । माझें केलें समाधान ॥
आवडीनें निरंजन । ठेविलें नांव ॥१८॥
पद १७२
सोडि रे मना या संसारा । ध्याई रघुवीरा ॥धृ०॥
उतरुनी भवाच्या सागरा । जासी परतीरा ॥
माझें माझें ह्मणुनिया बा रे । भुलसी तूं कां रे ॥
त्याच्या योगें तुजलागीं फेरे । पडले हे सारे ॥१॥
संतांचीया समागमें राही । करि साधन कांहीं ॥
अविनाश रघुविरा पाहीं । निरअंतरिं बाही ॥२॥
भवसिंधू सहजिं अटेल । संशय फिटेल ॥
रघुविर मीच झालों ऐसें । तुजसीं वाटेल ॥३॥
रघुविर जनिंवनिं पाहसी । निरंजन होसी ॥
विलया जातिल अनायासीं । दु:खाच्या रासी ॥४॥
पद १७३
तांबुल घ्यावा स्वामी विनवित लक्षुमी ।
भावार्थ मंचकासि बैसुनिया सुखधामीं ॥धृ॥
नवमिधाभक्तिपानें पिकविलिं कोमळ ।
विज्ञानशुद्धचुना लावियला सोज्वळ ॥१॥
अक्रोधकर्पूरांत वैराग्यसुपारी ।
घोळोनि वारंवार फोडियली नानापरी ॥२॥
विचार - वेलदोडे दयाक्षमा लवंगा ।
शांतीच्या कातगोळ्या मेळविल्या सुरंगा ॥३॥
प्रेमाची जायपत्री ब्रह्मानंद जायफळ ।
शेवटिं अर्पियलें सर्व साधनाचें फळ ॥४॥
निरंजन विलासिया नारायणा स्वामिया ।
अंकित तुमचा मी दास लागतों मायां ॥५॥
पद १७४
तो म्यां देखियला संन्यासी । सच्चित् सुख - घन - राशी ॥धृ०॥
कमंडलू शोभे ब्रह्मांड । मेरू ज्याचा दंड ॥१॥
अष्टदिशाचे प्रावरण । कौपिन सप्तावर्ण ॥२॥
सर्वा सृष्टीचा वेगळा । निर्मळ सोंवळा ॥३॥
त्याच्या दर्शनें करून । जालों निरंजन ॥४॥
पद १७५
त्याच्या उपकारा लागुन । नोहे मी उत्तीर्ण ॥धृ॥
जन्ममरणाच्या फेर्यासी । चुकविलें सायासीं ॥१॥
दु:ख नेउनिया विलयासी । दिलें सुख अविनाशी ॥२॥
देह भावासी सोडविलें । निरंजन मज केलें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP