मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे १८१ ते १८५

मराठी पदें - पदे १८१ ते १८५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद १८१
श्रीगोविंदा मुकुंदा आनंदकंदा रे ।
झडकरि आतां दाखवी निज पदारविंदा रे ॥धृ॥
दानवकदना मंदस्मित कमलावदना रे ।
अंबुजनयना शुकनासिक कुंदरदना रे ।
माधवराया ये मुनिजनमानस सदना रे ॥१॥
जलजाधरना जलजावर जलजाभरणा रे
जलनिधिशयना जलपूरित जलदावर्णा रे
जगदावारा शरणागत - भवभय - हरणा रे ॥२॥
तरुतलावरुते बैसुनि येई सत्वरि आतां रे ।
कामादिक रिपु लौकर करी यांच्या घाता रे ।
तुजवांचुनिया नाहीं मज कोणी त्राता रे ॥३॥
सच्चितसुखघन नीरंजन वीलासीया रे ।
श्रीगुरुमूर्ती करुणाकर हे रघुराया रे ।
दासावरुते करि पूर्ण कृपेची छाया रे ॥४॥

पद १८२
श्री गोपाळा नंदाच्या चिमण्या बाळा रे ।
नकळे कवणा नानापरी तुझी लीला रे ॥धृ॥
निर्गुन असतां उभविसि विश्वभुगोळा रे ।
इतुकें असतां अक्रिय तूं सर्वि निराळा रे ।
तुझिया स्वरुपा लागुनिया जाणे विरळा रे ॥१॥
अजन्मा तूं जन्मूनिया वृष्णीकुळा रे ।
सांडुनि मथुरा आलासी व्रजगोकुळा रे ।
पुतना हारली ओढुनिया अंतरमाळा रे ॥२॥
खेळसि चेंडू मुलासी करुनि गोळा रे ।
नानापुष्पें वनमाळा घालिसि गळा रे ॥
वादन करिसि मुरलीतें वेळोवेळां रे ॥३॥
भोगिसि नारी रात्रींतुनि सहस्रसोला रे ।
शेखीं म्हणसी मी ब्रम्हचारी भोळा रे ॥
नीरंजन हा इच्छित तूज पाहू डोळां रे ॥४॥

पद १८३
आतां भय नाहीं भय नाहीं, निर्भय दीशा दाहीं ॥धृ०॥
संतसमागम केला तेणें मनिचा संदेह गेला ॥१॥
आपणां वाचुनि कांहीं दूजें सहसा उरलें नाहीं ॥२॥
चिदाकार जग सारें अपणासरसें दिसतें बा रे ॥३॥
रघुविरगुरुचें देणें मजला केलें निरंजन ॥४॥

पद १८४
खंडेराया रे शंभु अवतारा । सोडुनिया कोदंडा धरि ॥
करि खंडा मणीमल पुंडाते करि दंडा सुरवर लागति पायां ॥१॥
बरवा सांडुनि अश्वारूढ निजविश्वातें दृढ रक्षिसि करुनि उपाया ॥२॥
कैलासीचा हुडा बहुत अवघडा ह्मणुनि चौघडा वाजवित आलासी जेजुरीठायां ॥३॥
रघुविर सद्गुरु मित्र तुझ्या करिं सूत्र जगाचें ह्मणुनि निरंजन इच्छितसे गुण गाया ॥४॥

पद १८५
सोइरा सद्गुरु ऐसा जोडला मायबाई । संसारचिंता आतां मजलागीं कांहीं नाहीं ॥धृ०॥
दारिद्र्य गेलें पळुनि ज्याचिया दर्शनमात्रें ॥
ऐकतां वचनें श्रवणीं शीतळ जालीं गात्रें ॥
दाखविलें माझें मजसी निजरूप प्रज्ञानेत्रें ॥१॥
सांगू मी तुजला काई भाग्याची थोर शिराणी ॥
इंद्रादिक सर्वहि देव जोडीती मजला पाणी ।
रवि शशि माझ्या तेजें चालताति दिनरजनी ॥२॥
अंतचि नाही माझा ऐसा मी ऊदंड ।
त्रैकाळ बाधातीत सर्वदा शुद्धाखंड ।
साठविती माझ्या उदरीं अनंतब्रह्मांड ॥३॥
काय मी होऊं आतां तयासि उतराई ।
रघुविरचरणावरुते सद्भावें ठेवुनि डोई ।
निरंजन टाकुनि देहे गडबडा लोळे भूई ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP