मराठी पदें - पदे १६१ ते १६५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १६१
तो गुरु श्रीगुरो सद्गुरु भवसिंधूचा तारू ॥धृ॥
निजदेहीं निजडोळा दाखवि आत्मा देह निराळा ॥१॥
आपुण विश्वाठायीं दाखवि जगनग आपले ठाईं ॥२॥
श्रुतिवचनातें सेवी जिवशिव दोन्ही एकचि दावी ॥३॥
रघुवीरसद्गुरु ऐसा केला निरंजन आपुलासा तो ॥४॥
पद १६२
धन्य भाग्य त्या नंदयशोदेचें । परब्रह्म येवोनी पुढें नाचे ॥धृ०॥
ब्रह्मादीकां न कळे ज्याचा पार । होउनिया चिमणा तो किशोर ।
ठेवुनिया साजिरे कटि कर । नानाछंदें नाचतो वारंवार ॥१॥
तयासंगें नाचती तिन्ही ताल । गाई इच्छें नाचताती गोपाळ ।
गोपगोपी अवघेची गोकूळ । नाचावया लागलें पक्षीकूळ हो ॥२॥
नद्या वृक्ष नाचति ते पाषाण । इंद्रचंद्र आणिक देवगण ।
ऋषि सर्व नाचती तपोधन । कैलासी नाचतसे ईशान हो ॥३॥
भूमि माथा घेउनी नाचे फणी । उसळलें समुद्राचें पाणी ।
मेघमाळा उडताती गगनीं । अष्टभाव ऊठलें निरंजनीं ॥४॥
पद १६३
नयनिं पाहे यशोदा नंदराणी । मुखालागि दाखवी चक्रपाणी ॥धृ०॥
उघडोनि पाहताची मनें तोंड । तयामाजि पाहिलें हो ब्रह्मांड ।
स्वर्गमृत्यूपाताळ प्रचंड । मेरवादी पर्वतही उदंड हो ॥१॥
नवखंडें आणिक सप्तद्वीप । सप्तसिंधू नद्यांचे वाहे आप ।
ऋषिवृंद करिती घोरतप । नाना क्षेत्रें दैवतें प्रजाभूप हो ॥२॥
देखियलें गोकुळ दुजे दीठी । त्यांत दीसे यशोदाजगजेठी ।
उकलुनि दाखवी मुखपेटी । तया आंत ब्रह्मांडाच्या कोटी ॥३॥
पाहुनिया विस्मीत जाली मनीं । कृष्णरूप देखिलें जनिंवनीं ।
प्राप्त झाली सर्वही सुखधनी । स्थिरभाव पावली निरंजनीं हो ॥४॥
पद १६४
पाहीन निजडोळां मी श्रीराम । बोलतो ऐसा हें भरत उत्तम ॥धृ॥
छि छि वो माते तुवा काय केलें । जानकीरामा वनासि धाडीलें ॥
दशरथालागीं जीवेंचि मारीलें । धिगधिग तुझें तोंड काळें जालें ॥१॥
नलगे मज राज्यउपभोग । करीन निजदेहाचा मी त्याग ॥
नगमे रामाचा मज वीयोग । लागली चिंता हो काळजासी आग ॥२॥
काय म्यां होतें पूर्वीं दोष केले । ह्मणवुनि ऐसें फळ प्राप्त जालें ॥
न कळे राम कोण्या वना गेले । आहाहा मजहो कैसें टाकीलें ॥३॥
सद्गुरुलागीं सांगाती घेवोनी । निघता झाला भक्तशिरोमणी ॥
देखियला रघुविर निरंजनीं । अद्वयभावें हो आनंदला मनीं ॥४॥
पद १६५
केशव केशव वद रे मनुजा निष्काम ।
हितकारक हे मोठें श्रीहरिचें नाम ॥धृ॥
त्रैलोक्याचे ठाई नामाविण सार ।
न दिसे मजला कांहीं छेदक संसार ॥१॥
शुकसनकादिक करिती नामाचा घोष ।
वाल्मिक नामस्मरणें जाला निर्दोष ॥२॥
भवरोगाची मात्रा निश्चित हे जाण ॥
या वचनाला देती श्रुतिशास्त्र प्रमाण ॥३॥
रघुविर वचनीं बरवा ठेवुनि विश्वास ।
हरिच्या नामें तरला निरंजन दास ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP