मराठी पदें - पदे ६१ ते ६५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद ६१
गुरुराया तुमचे कृपादानें । संवसारासी येउनि झालों धन्य ॥धृ०॥
कृपाळुवा सद्गुरु मायबापा । मार्ग आह्मां दाउनी दिला सोपा ॥१॥
तत्वबोध करोनि लागवेगी । परब्रह्म केलेसें मजलागी ॥२॥
मोक्ष आमुचे अंगणीं लाळ घोटी । परमात्मा रिघाया पाहे पोटीं ॥३॥
निरंजन सद्गुरु रघुराजा । कृपा आतां असूं द्या महाराजा ॥४॥
पद ६२
जगनग सारें पाहतां मजला ब्रह्माचि सर्वहि भासे ।
त्वंपद तत्पद असिपद अवघी द्वैतभावना नासे ॥धृ०॥
जीवात्मा परमात्मा दोघां एकचि पडली गांठी ।
चिन्मय स्वरुपीं मिळणी झाली आनंदाची दाटी ॥
आदी अंतीं मीच अवघा वेष्टी आणि समष्टी ॥१॥
आत्मा अनात्मा हा केला व्यतिरेके दों ठाईं ।
अन्वयें पाहातां ब्रह्माविरहित कांहीं नाहीं ॥
जैसी मृत्कुंभासि मृत्तिकाची सर्वाठायीं ॥२॥
रघुविरप्रसादें शुद्ध जहालों निरंजन ।
जालों ह्मणुं तरि मजला नाहीं होणेंजाण ।
अस्ति भाति प्रिय अवघा अपुला अपण ॥३॥
पद ६३
आत्मा सत्य जयाप्रती झाला । मिथ्याभास अनात्मा त्याला ॥धृ०॥
पाहतां श्रम प्रतीबिंबालागीं । त्याचे श्रम तें बिंब न भोगी ॥
जैसा व्याळ बिळाचे द्वारीं । पहातसे आपुलि कांतारी ॥
मिथ्या मृगजळ कळलें ज्यासी । दिसते परिश्रम नाहीं त्यासी ॥
निश्चय पूर्ण निरंजनिं असतां । सहजची मग निज देही अनास्था ॥१॥
पद ६४
सावध होउनि निजसुख भोगी जातें रे वांया ।
श्रमदायक त्या विषया लागुनि सोडुनि दे सखया ॥धृ०॥
ब्रह्मानंद वसे तवठायीं तुज ठाउक नाहीं ।
तें सुख विषया ठायीं योजुनि मानीसी नवाई ।
इच्छुनिया मनिं विषया साठीं पडसी आपाईं ॥१॥
श्वान जसें अस्थीला घेउनि फोटितसे दांतीं ।
मुखांतिल रुधिराला सेवुनि भवितसे तृप्ती ।
तैसी तूं विषयाचे संगें मानिसि सुखप्राप्ती ॥२॥
विषयावरि मन धावुनि जातां पावसि दु:खाला ।
तें मन मागें परतुनि येतां होतें सूख तूला ।
ह्मणवुनिया मन जेथिल तेथें ठेवुनि राहे भला ॥३॥
नष्ट जडात्मक विषय मनींहुनि सोडुनिया देई ।
रघुविर सद्गुरु पाहुनि पूर्ता शरण तया जाई ।
निरंजन मग होउनिया तूं पूर्णपणें राही ॥४॥
पद ६५
बोधभानु उगवला जया ठायीं । भवतम नुरेची तेथें कांहीं ॥धृ०॥
कळों आली शुक्तीका स्पष्ट ज्यासी । न भासेची मागुती रौप्य त्यासी ॥१॥
दृष्टिलागी पाहातां शुद्धदोर । न भासेची त्याजला सर्पाकार ॥२॥
रविरश्मि दीसल्या डोळा ज्याला । मृगजळ न वाटे कदा त्याला ॥३॥
गुरुकृपें उडालें दृश्यभान । सर्वपणें तोची तो निरंजन ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP