मराठी पदें - पदे २३१ ते २३५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद २३१ ( बाळसंतोषाचें )
बाळसंतोस आम्ही बाळसंतोस ॥धृ॥ झालों सर्वस्वें उदास ॥१॥
त्यागुनी विषयाचा ध्यास ॥२॥ इंद्रियग्राम केला ओस ॥३॥
झालों सद्गुरुचे दास ॥४॥ नाहीं द्वैताचा भास ॥५॥
प्रपंच मिथ्या हा साभास ॥६॥ निरंजनीं अक्षयिं वास ॥७॥
पद २३२ ( जोगी भराडी )
चांग भला नाथ तुझा । हेत पुरवावा माझा ॥धृ॥
निर्गुण पुरिच्या भैरवा । धाव रे गुरु देवदेवा ॥१॥
बोध त्रिशूळ घेउन । छेदि माझे भवबंधन ॥२॥
महावाक्य डमरुवाद । करुनि दवडी माझा भेद ॥३॥
तुझी कृपा योगेश्वरी । करो भवभय दूरी ॥४॥
तुझें नाम उच्चारून । होइन सुखी नीरंजन ॥५॥
पद २३३
येई वो माउली माझे श्रीकृष्ण माउली गे ।
लागलेसें मन माझें तुझिये पाउलिं गे ॥धृ॥
नखचंद्राची कांती माये व्यापियलि नभा ।
अंगुळ्या शोभति इंद्रनिळाचा पैं गाभा ।
वज्रांकुशध्वज याची अगणित शोभा ।
ब्रह्मादि इच्छिति चरणरजाचिये लाभा ॥१॥
रुणझुणती नूपुरें चरणीं ब्रिदाचा तोडर ।
आंड बुलि शोभे रत्नखचित सुंचर ।
कटिसूत्र मेखळा क्षुद्र घंटिकेचा भार ।
शब्दानें सांगति उपनिषदाचें सार ॥२॥
तायतळ्यामधि शोभे श्वेतवाघनख ।
रत्नाच्या पेटियावरि यंत्र रेखा अंख ।
कटकें शोभति दोन्ही हातीं सिंहमुख ।
कर्णाचीं कुंडलें करिताति लखलख ॥३॥
सरळनासिका सौम्यदृष्टीचे पाहणें ।
कुरळकेशाची दाटी आकृति लहान ।
निरंजनाप्रति ऐसें आवडतें ध्यान ।
संपूर्णाचे सार पूर्ण ब्रह्म सनातन ॥४॥
पद २३४
येई वो सखे कृष्णाई तान्हुले तुझियासाठीं स्तन माझे पान्हेले ॥धृ०॥
यशोदा ह्मणे ऐके हो साजणी । काळया डोह विषाचीच खाणी ।
उडोनि पक्षि जाइना वरोनि । कान्हया माझा बुडाला जीवनीं ॥१॥
नंदराय शोकाकुल जाले । प्राण ग सये माझेहि चालिले ।
मुखभरुनि नाहीं मी बोलिलें । अहा रे दैवा कैसें ओढवलें ॥२॥
चेंडूदांडू लगोर्याचा खेळ । वेताटी वेणुसि दोरीचें जाळ ।
पाहुनि यासीं वाटे तळमळ । संवगडे तुझे मिळाले गोपाळ ॥३॥
गर्गमुनि बोलीले वचन । कृष्ण हा तुझा ब्रह्मचि निर्गुण ॥
अविनाशीं अचळ निरंजन । तें काय मृषा जालें हो वचन ॥४॥
पद २३५
येशोदे बाई कृष्ण तुझा आला । नवसासी ईश्वर पावला ॥धृ॥
यमुनाडोह भयंकर जाणा । काळ्यानें उभारिल्या फणा ।
त्याचियावरि नाचे तुझा कान्हा । शब्द होतो मोठा दनाना ॥१॥
नंदराय दैवाचा आगळा । ह्मणोनि कृष्ण देखियला डोळां ।
लावण्याखाणी मदनाचा पुतळा । पुरवी दृष्टीचा सोहळा ॥२॥
पाडस वनिं हरिणीला भेटले । गाइवत्सें एकत्र जहाले ।
पक्षिणीचे पिलें मिसळले । तैसें आज तुजलागीं जालें ॥३॥
वचन झालें गर्गाचें सफळ । कृष्ण हा तुझा ह्मणुं नये बाळ ।
निरंजन अविनाशी अचळ । नाटकि मोठा खेळतसे खेळ ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP