मराठी पदें - पदे १४१ ते १४५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १४१
मनुजा राम भजावा रे पळभर व्यर्थ न जावा रे ॥धृ॥
कैजे हत्ती घोडे पागा कैची घर जिनगानी ॥
आज आहे उद्याचि नाही उतरुनि जाइल पाणी ॥१॥
कैचे काका बाबा दादा कैचे रांडा पोर ।
संपत सरल्यावरती होती अवघीं हरामखोर ॥२॥
हातपाय अपले ह्मणवुनिया न धरी कांहीं भरोसा ।
अंतकाळिंच्या ठायीं पडेल यमाजीचा फासा ॥३॥
निरंजनाच्या वचनालागीं भाव धरुनि ऐकावें ।
नाहीं तरि मग तुजला बाबा नरका लागल जावें ॥४॥
पद १४२
मन हें श्रीरामीं तन्मय झालें । मनपण हें गेलें ॥धृ॥
करितां सद्भावें सद्गुरुभक्ति । विषयिं विरक्ती ।
दृष्टी पाहिली विन्मय व्यक्ति । अद्भुत निजदीप्ती ॥१॥
घेणें टाकणें अवघे सरलें । मन मागें फिरलें ।
पाहतां चित्सागरिं जाऊनि शिरलें । लवणापरि विरलें ॥२॥
जैसी जळचंचळ वीचि मुराली । जळ होउनि ठेली ।
तैसी सद्वृत्ति ठाइ जिराली । ब्रह्मचि ते झाली ॥३॥
सुलट्या दृष्टीनें उलटे पहातो । निजठायीं रहातो ।
ह्मणे निरंजन सरली वार्ता । रामची मी आतां ॥४॥
पद १४३
तया गुरुदयाळाचा उपकार काय वानूं ।
अज्ञा निरसुनि उगविला बोधभानू ॥धृ॥
अनंत जन्मवरि घेत आलों मी फेरे ।
तें दु:ख मजलागी जालें होतें जें बा रे ।
तें आजि निरसलें ज्याच्या वचनें सारें ॥१॥
आनंदसागरासि मेळविलेंसे नेऊन ।
चिन्मयप्रकाशाचें लेवविलेंसे लेण ।
अढळपदीं मज नांदविलेसे जेणें ॥२॥
कृपादृष्टि उघडुनि मजलागीं निरखीलें ।
अपुले ह्मणुनिया लागवेगीं संबोखिलें ।
भवरोग निवारूनि अजर अमर केलें ॥३॥
दुर्जन असतां मी मज केलें निरंजन ।
अनुभव देउनिया चुकवीले येणे जाणें ।
उतराई होऊ काय देऊनिया मी देणें ॥४॥
पद १४४
राममूर्ती ते निजहृदयीं ध्यावी ॥धृ॥
श्यामवर्न भवतरन शरण अघण करुनि भवताप दुरावी ॥१॥
विषमठाण करिं चापबाण हनुमानसहित सीतासति सेवी ॥२॥
श्रीकरुणाकर पीतांबरघर सुंदर प्रियकर सतत यजावी ॥३॥
रघुविरकंजनयन जलपुंजअयन जो शेषशयन हरि निरंजन भावी ॥४॥
पद १४५
नित्य गावा रे श्रीहरिगुण महिमा ॥धृ॥
भार फार अनिवार त्यजुनि संसार भवार्णवि घोर तरावा ॥१॥
अमल कमलदल मृदुल शुशोभित चरणयुगुलसम हृदयीं ध्यावा ॥२॥
आशापाशसह र्हास करुनि मन नाश हरिपदिं वास करावा ॥३॥
माइक रंजन जगनगअंजन रहित निरंजन पूर्ण विसावा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP