मराठी पदें - पदे २६६ ते २७०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद २६६
कोठें दावि हरी सत्वरीं । आमुचा कुळवैरी सत्वरीं ।
हिरण्याक्षा वधिलें जेणें । कपटरूपें समरीं ॥धृ॥
घेईन सूड मि निजबंधूचा । मारुनिया स्वकरीं ।
परि तो विष्णू माझ्या भेणें । पळतो देशवरी ॥१॥
मी तरि कैसा पूर्णप्रतापि । निर्भय ब्रह्मवरी ।
माझें भय मनिं घेऊनिया स्थळ । सोडविलें अमरीं ॥२॥
बाळ ह्मणे हरि व्यापक माझा । भरला सर्वत्रीं ।
चालविता जो या विश्वातें । होय कळासुत्रीं ॥३॥
सत्वरि व्यापक पाहे हरी । सत्वरि आमुचा कैवारी ।
सत्वरि हिरण्याक्ष । क्रोडरूपें समरीं ।
स्तंभ सभेचे गुरगुरु करितां दचकूनि दैत्य उरि ।
स्तंभालागीं ताडियले तव । नरहरिरूप धरी ।
दैत्यप्रभूतें अंकीं घेउनि । फाडियलें स्वकरीं ।
कडकड दाढा खावुनि मोठा । सिंहनाद करी ॥५॥
प्रल्हादाते कुरवाळुनिया । स्थापुनि दैत्यपुरी ।
निरंजनपद देउनि अक्षयिं । निर्भय छत्र धरी ॥६॥
पद २६७
मन उन्मन झालें । बोलणें सर्व निमालें ॥धृ॥
एकपणें निजबोध ठसावुनि । अनुभव घेणें उडालें ॥१॥
स्मरणाचे विस्मरण विसराची आठवण पूर्विंच होउनि ठेलें रे ॥२॥
आत्म अनात्म विवेचन जाउनि द्वैताद्वैत भान गेलें रे ॥३॥
नित्य निरंजन अनित्यावांचुन सहज समाधित डोले रे ॥४॥
पद २६८
अजि गोकूळिं कृष्ण प्रगटला । नंदयशोदे हर्ष दाटला ।
सर्व देवां आनंद वाटला । यदुवंशाचा खेद आटला ॥धृ॥
नसुनि देवकिला प्रसुतवेदना । पुढें देखियलें निजनंदना ।
बंदिशाळेमधिं तेज माइना । पाहुनि वसुदेव करी प्रार्थना ॥१॥
ह्मणे श्रीकृष्ण लक्ष्मीपति । बाळ होतों मी लहान आकृति ।
नेउनि घाली मज गोकुळप्रति । पुढें मारिन मी कंस दुर्मति ॥२॥
अनकदुंदुभिनें कृष्ण उचलिला । तुटुनि बेडिसह द्वारशृंखला ।
वरि छाया करु शेष पातला । मधुनि यमुनेनें मार्ग दीधला ॥३॥
नित्य निरंजन निर्गुण स्थिती । ब्रह्मईशादि ज्यासि वंदिति ।
श्रुतिशास्त्रादि ज्यासि वर्णिति । त्यासि गोपी निजपाई न्हाणिती ॥४॥
पद १६९
कृष्ण वेणु वाजवी वृंदावनीं । तेणें रवें तल्लिन जाले प्राणी रे ॥धृ॥
विमानाच्या स्वर्गती स्थिर जाल्या । देवस्त्रिया मोहीत होउनि ठेल्या ।
गाइ कृष्णासमिप येत्या जाल्या । कर्णपूटें वेणूचा रव प्याला ॥१॥
वत्सें दुग्धपानातें विसरले । मुखिं दुग्ध होतें तें श्रवते जालें ।
पक्षि शद्ब टाकोनि वृक्षीं ठेले । ऋषिकर्म करितां विसरले ॥२॥
वृक्षालागि आनंद अश्रु आले । मयुरांनीं नृत्यासि आरंभीलें ।
हरणांनीं नेत्रासि त्राहाटिले । गोवर्धनें रोमांच उभारिलें ॥३॥
कामज्वरें व्यापिल्या पुलिंदिनी । स्थिर जाले यमुनेचें पाणी ।
मेघमाळा जाहल्या छत्रावाणी । जग जालें तल्लिन निरंजनिं ॥४॥
पद २७०
निजरुप भुललासि काइरे बावळ्या ॥
गुरुगुज हें ऐकुनि येइरे ॥धृ०॥ जेथें श्रुतिचें बोलणें सरे ॥
ज्यातें जाणतां जाणिव विरे । भेद अभेंद ह्मणणें पुरे ॥
अनुभव सरोनि शेवटिं जें उरे । बावळ्या ॥१॥
जैसें स्फटिक शिळेचे ठायीं । जळ सहसा प्रविष्ट नाहीं ॥
तैसी माया न शिरे जे ठायीं । तें हें तुझें रूप निश्चल पाहिरे ॥२॥
जेथें नाहीं भानाभान । जगत् शून्याचें अधिष्ठान ॥
ज्याला शून्य ह्मणती बुद्धीहीन । आहे नाहीं विण जे परिपूर्णं रे ॥३॥
जीव बोधार्थ श्रुति आपण । ज्यास ह्मणती निरंजन ॥
भूमा आनंद सच्चिद्धन । हेचि हेचि रघुविर गुरूची खुण रे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP