मराठी पदें - पदे १८६ ते १९०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १८६
भाल नेत्रा रे शिवकर्पुर गौरा ॥धृ॥
पिनाकधर हर गौरीवर नर किन्नर प्रभुवर शुद्धपवित्रा ॥१॥
व्याघ्रांबरधर गजचर्मांबर भूधर प्रियकर निर्मळ गात्रा ॥२॥
धंड रहित ऊदंड गळ्यामधि रुंडमाळ शोभत विचित्रा ॥३॥
जटाजूट निळकंठ भस्मधर निरंजनगुरु रघुविरमित्रा ॥४॥
पद १८८
सत्वरि आतां शरणागत जा रघुराया रे ।
नाहीं तरि हा नरदेहे जातो वायां रे ॥धृ॥
नाहीं कांहीं भरवंसा या देह्याचा रे ।
पळपळ होतो विनाश आयुष्याचा रे ।
परतुनिया ऐसा नरदेहे येइल कैचा रे ॥१॥
भाग्य मोठें ह्मणवुनिया मानवयोगी रे ।
सांपडलीसे हे आत्मसुखाची खाणी रे ।
गेल्या वरुते होइल कीं मोठी हानी रे ॥२॥
भ्रमदायक हे जाणुनिया घरसुतदारा रे ।
श्रमदायक बहु समजुनिया या संसारा रे ।
चुकवा तुह्मी यमाचा थोर दरारा रे ॥३॥
रघुविरचरणा लागुनिया शरण रिघावें रे ।
निशिदिनि वाचे लागुनिया हरिगुण गावे रे ।
सद्गुरुवचनें निरंजन अक्षयिं व्हावे रे ॥४॥
पद १८९
जयजय श्रीरामा जयरामा । देई तवगुणप्रेमा ॥धृ॥
संसाराच्या कामा । नरदेह गेला व्यर्थ रिकामा ॥
विसरुनिया तवनामा । केला घप्पाघोळ हमामा ॥२॥
जाली पातकसीमा । सहसा चुकलों सार्थक नेमा ॥३॥
ऐसें करि वो रामा । गाइ निरंजन तव नामा ॥४॥
पद १९०
आतां उतरी श्रीदत्ता माझें संसार ओझें ।
आंगीं विषयाचें शिरलें वारें । केला घरचार ॥
नित्य पोषितां रांडा पोरें झालों बेजार ॥१॥
वायां अभिमान धरिला थोर । बुडविलें घर ॥
माझें माझें हें ह्मणवुनि सारे जालों मी चोर ॥२॥
नाहीं तवभक्ती कांहीं केली वर्णीली ।
तीर्थयात्राही नाहीं जाली तनु व्यर्थचि गेली ॥३॥
स्वामी तुजवांचुनि कोणी आतां । न दिसे मज पहातां ।
निरंजनाची सोडवि आतां संसारचिंता ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP