मराठी पदें - पदे १९१ ते १९५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १९१
दिसती मजलागीं अवघे राम । स्थावरजंगम ॥धृ॥
भावें सद्गुरुच्या जडतां पायां । हारपली माया ॥
जाली रामचि हे माझी काय । जग अगा बाया ॥१॥
दिसतां नग सारे हेमचि डोळा । नलगे मग गोळा ।
द्यावा मोजुनिया वजनी ताळा । सरसगट सोला ॥२॥
लहरी बुद्बुद थिजलें तूप । अवघें घृत आप ।
तैसें जग पाहतां कारण रूप । अवघें चिद्रूप ॥३॥
नेत्रीं सूदलें ज्ञानांजन । दाखविलें धन ।
मजला केलेंसे निरंजन । रघुविरगुरु येणें ॥४॥
पद १९२
पहा रे उघडुनिया आपुला डोळा । सुंदर घननीळा ॥धृ॥
फिरती रवि दिनकर ज्याच्या कळा । तो हा पुतळा ॥
खेळे नंदाघरिं पाईं वाळा वाजवि खुळखुळा ॥१॥
योगीजन ज्याच्या योगें धाले अंतरिं नीवाले ।
होते निर्गुण ते सगुण जाले अकारा आले ॥२॥
जेणें भक्ताच्या साठीं फार धरिले अवतार ।
वधिले निष्ठुरखळबळी असुर कंस चाणूर ॥३॥
शुद्ध निरंजन चिन्मय नभा अंतरिंचा गाभा ।
नामारूपाची दाउनि शोभा तो विटेवरि उभा ॥४॥
पद १९३
देहबुद्धी जावो माझी श्रीहरि सत्वरी । हें देणें देई मातें श्रीहरि ॥धृ०॥
संपत्ति वैभव मागत नाहीं नको मित्र पुत्र अंतुरी ॥१॥
विषयाहुनि मन येउनि मागें अखंडित वसो निजघरीं ॥२॥
अद्वय निर्मळ रूप तुझें मज स्पष्ट दिसो आंत बाहेरी ॥३॥
नाम तुझें हरि प्रेमळ वचनें वदो निरंजन वैखरी ॥४॥
पद १९४
हरीचे पाय मनिं धरी रे । विषयावरि मन धावुनि जातें त्यातें आवरि रे ॥धृ॥
अभिमानातें सांडुनि सद्गुरुदास्य बरें करि रे ॥१॥
सर्वहि चालुनि येतिल सिद्धी सहजीं तुझ्या घरिं रे ॥२॥
निरंजन तुज सांगत हितगुज गोष्टी हे बरि रे ॥३॥
पद १९५
शिवशंकर भोळा गावा । भक्ताचा पूर्ण विसावा ॥धृ॥
आंगीं भस्माचें लेपन । शोभे पन्नागाचें लेण ।
गळां रुंडाचें भूषण । वरदायक देवा ॥१॥
गंगापार्वतीचा वर । बैसुनि चाले नंदीवर ।
हरहर बोलुनि जटाभार । करितो स्मशानीं वीहार ।
भक्तां संपति देतो फार । न करितां सेवा ॥३॥
ज्याचा निरंजनीं वास । सदा वीषयीं ऊदास ।
स्मरतां उद्धरी तो दास । देउनि निज ठेघा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP