मराठी पदें - पदे २१६ ते २२०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद २१६
सारधि पार्थाचा भगवान् । कौरव छळितां द्रौपदिवस्त्रेम झालासे परिधान ॥धृ॥
दुर्वासातें भोजन दिधलें खाऊनि भाजीपान ॥१॥
निजहस्तानें घोडे धुतले होउनि गाडीवान ॥२॥
निरंजनपद देउनि शेवटिं केला आत्मसमान ॥३॥
पद २१७
तारी या भवभ्रमी माय लक्षुमी क्षेत्र करवीरवासीनि ॥धृ॥
तूं सदानंद चिच्छक्ति । भक्तजन भक्ति ।
साधु विरक्ति । ज्ञानीजय मुक्ति ।
व्यक्त अव्यक्ति आससी व्यापूनी ॥१॥
हे ब्रह्मादिके तव बाळे । बहु लडिवाळ ।
तुझिया लीळे । खेळती खेळ ।
उत्पति स्थिती मोडुनि ॥२॥
उन्मनी तों निजगूज । जगद्रुम बिज ।
अनादि अज । रक्षि ममलाज पर - मनभ - सौदामिनी ॥३॥
तूं जगन्माय कनुवाळ । दंडुनि काळ ।
करिसि प्रतिपाळ । तोडि भवजाळ । प्रेम दे निरंजनीं ॥४॥
पद २१८
गोविंदा रामा येरे गोपाळा रामा येरे ॥धृ॥
करितां संसारसाधन । बहूत जालासे मजला शीण ।
कंठिं आले पंचप्राण ओढति सांवरा रे ॥१॥
ऐकुनि गजेंद्राची ध्वनी । धावलासि चक्रपाणी ॥
तैसा लागवेगें करुनि येई तूं बा रे ॥२॥
दरुपदीच्या वस्त्रहरणीं । वस्त्रें जालासि ते क्षणिं ॥
तैसा माझिये धावणी वेगीं धाव रे ॥३॥
जनीं वनीं निरंजनीं । तुझा वास अक्षइपणीं ॥
नलगें तूंतें येणीं जाणीं प्रगटे येथेंचि त्वरें ॥४॥
पद २१९
तो हा योगि सर्वत्र जगीं मान्य । तयाहूनि ईश्वर नाहीं अन्यहो ॥धृ॥
चिन्मयरूप सर्वही विश्व पाही । जैसें सोनें नगाचा अंतरबाही ॥१॥
दयाशांति बाणली ज्याचें आंगीं । पूर्णानंदें डुल्लत अंतरंगीं ॥२॥
इष्टानिष्ट न स्फुरे ज्याचे मनीं । देहबुद्धि न स्मरे अहंपणीं ॥३॥
गुरुकृपें लेउनि ज्ञानांजन । शुद्धबुद्ध जाहला निरंजन ॥४॥
पद २२०
हे मना । सांडि दुर्वासना । सावध होई सजना । होसिल केविलवाणा ॥
यमाचें भय दुर्धर मोठें नको धरूं अडराना ॥१॥
हे चित्ता । सोडिं विषयचिंता । मिथ्यागृह सुतकांता । त्यागुनि रिघे सुपंथा ।
श्रीगुरुवचनीं भाव धरुनि दृढ सेवित जा एकांता ॥२॥
हे बुद्धि सांडुनि दृष्य उपाधि । आत्मपदातें शोधी । साधी ऐक्यसमाधि ॥
सागरमिळणी सारितेचे परि होउनि राहे चिदाब्धि ॥३॥
हे आहं । न वदे देह कदाहं । न ह्मणे कोहं कोहं । मानी हंस:सोहं ॥
नीरंजनपद पावुनि बरवें अपमानातें करि नाहं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP