मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे ११६ ते १२०

मराठी पदें - पदे ११६ ते १२०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद ११६
गुरुराया वाटतें माझे मनिं । सांगतों मी तें घ्यावें आयकोनी हो ॥धृ॥
उघडितां अज्ञान कपाटासी । ज्ञानयोगें देखिलें स्वरूपासी हो ॥१॥
ज्ञानाज्ञान मनाचे दोन्ही धर्म । माझें रूप निर्मळ तें निर्धर्म ॥२॥
जैसें ज्ञान तैसेंचि अज्ञान । मज नको दोन्हीचें घेणें देणें हो ॥३॥
मी तो सिद्ध सर्वदा निरंजन । साधकासी पाहिजे ज्ञानाज्ञान ॥४॥

पद ११७
पाहिला श्रीहरि उन्मनीचे घरीं । पाहतां पाहणें दूरि जालें गे माय ।
निश्चळ निर्मळ स्वरूप सोज्वळ त्रिगुणाचा मळ नाहीं गे माय ।
निर्गुणत्वें सदा राही गे माय । अद्वैताची स्थिती वाहे गे माय ।
त्याजविना नसे कांहीं गे माय । भास आभासासी अलिप्त दोहींसी
आनंदाची रासी पाही गे माय १ जागृती ना स्वप्न सुषुप्ति व्यवहार नाहीं शून्याकार जेथें गे माय ॥
उन्मनि सुंदरि तेथें गे माय । योगी इच्छिताती जीते गे माय ।
तुर्या ह्मणताती तीतें गे माय । श्रुतीच्या गौरवें गुरुवाक्यासवें पावलों निजपदातें गे माय ॥२॥
पाहूं जातां हारी जालों तदुपरि द्वैताची बोहरी जाली गे माय ।
जविदशा सर्व गेली गे माय । दीप्तींत दीप्ति मिळाली गे माय ॥
वासना मुळी जळाली गे माय । मीच सर्वापरी अंतरिं बाहेरि माया विद्या नाहीं जाली गे माय ॥३॥
अज्ञानाचा सव लोटियलें ज्ञानवृत्या भानाभान गेलें गे माय ।
मनाचें उम्मन जहालें गे माय ॥ बोलणें सर्व निमालें गे माय ।
तृप्तीचे ढेकर आले गे माय । रघुवीरप्रसादें शुद्ध निरंजन ब्रह्मानंदें सदा डोले गे माय ॥४॥

पद ११८
साजणि ग धन्य जालें श्रीहरिच्या नामस्मरणें ।
त्रैताप हरले माझे संसार उठलें धरणें ॥धृ॥
वाचेनें हरिगुण गातां शीतळ जाली काया ।
दैवतें इष्टानिष्ट करिताति सर्वहि माया ।
सर्वहि भूतें धरिति कृपेची शीतळ छाया ॥१॥
सद्भावें हरिपदिं जडतां तुटले भवबंधन दोरे ।
मृगजळवत माया जाली समूळ चुकले फेरे ॥
दृष्टीसी दिसतें संये जगनग हें ब्रह्मचि सारे ॥२॥
श्रीहरि रघुविररूपें दयाकर मजवरि जाले ।
अधिकार नसतां मजसि निरंजन पद हें दिल्हें ।
अनंत ब्रह्मांडाचें राज्य हें घरा आलें ॥३॥

पद ११९
आत्मा शुद्ध रे आत्मा शुद्ध रे । जाणती शहाणे ते प्रबुद्ध रे ॥धृ॥
त्रिगुणाचा मळ नाहिं जेथें रे ।
मायाविद्या निरसिल्या तेथें रे ॥१॥
जीवशिव उभयांचे भेद रे ।
स्वरुपीं पाहतां ते आभेद रे ॥२॥
सत्यानंद चिदाकाश आत्मा रे ।
तो हाची जीवात्मा परमात्मा रे ॥३॥
निरंजन ह्मणे ऐसा आत्मा रे ।
जाणे तो ह्मणावा प्राप्त आत्मा रे ॥४॥

पद १२०
सखया रे मारुति राया रामाप्रति सांगे वार्ता ।
ठेवुनिया कंठीं प्राण मार्गाप्रति पाहे सीता ॥धृ॥
गंगातटिं मृगयेसाठीं धावुनिया तुम्ही गेला ।
होणार न चुके पुढिलें लक्षुमण म्यां धाडिला ।
गोसावी होउनि मेला दशकंधर तेथें आला ।
वाहोनी स्कंदावरुतें अणलें हो मज लंकेला ॥१॥
ब्रम्ह्याच्या शापाभेणें न लावुनि मातें हात ।
मी भार्या नोहे ह्मणुनी कराया पाहे घात ।
राक्षसिणी खायासाठी वासुनिया येती दांत ।
नानापरि भय दाखविति ठेवुनिया अशोकांत ॥२॥
रामाचें चिंतन करितां षडमास होत आले ।
श्रीरामावांचुनि सखया जळप्राशन नाहीं केलें ।
प्रियकर मनमोहन माझे कैसे मज विसंबिले ।
पापाचें संचित कैसें या काळीं मातें फळलें ॥३॥
रामाप्रति जाउनि आतां प्रणिपात माझा सांगे ।
जोडुनि कर माझ्याकडुनि पायाप्रति जाउनि लागे ।
निरंजन राहुनि तूह्मी भरावें मजवरि रागें ।
घेउनिया जावें मजसीं येउनि या लागवेगें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP