मराठी पदें - पदे १२१ ते १२५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १२१
भक्तिविण जिणें त्याचें पाहूं नये तोंड ।
जाला भूमिभार वृथाप्रसवली रांड ॥धृ॥
विषया ध्यास मनीं वाहे निरंतर ।
मुक्तीची वासना नाहीं एक पळभर ॥१॥
जीवा पलीकडे वाटे जासि संसार ।
जाती कुळ अभिमान उचलूनी भार ॥२॥
वैदिक शाहाणा मीच पंडित आगळा ।
चातुर्याचा अहंकार वाहे वेळोवेळा ॥३॥
वाचे नये राम त्याची शुद्धी नाही मती ।
निरंजनीं भेटीं नाहीं त्याजला कल्पांतीं ॥४॥
पद १२२
आपराध क्षमा आतां केला पाहिजे, देवा केला पाहिजे ।
अबद्ध सुबद्ध गुण वर्णीले तुझे ॥धृ॥
न कळेचि टाळ विणा वाजला कैसा, देवा वाजला कैसा ।
अस्ताव्यस्तपनें नाद केला भलतैसा, देवा केसा भलतैसा ॥१॥
नाहीं तालज्ञान नाहीं कंठ सुस्वर, देवा कंठ सुस्वर ।
जाला नाहीं बरा वाचे वर्णउच्चार, देवा वर्णउच्चार ॥२॥
भाव नाहीं पोटीं नाहीं प्रेमपाझर, देवा प्रेमपाझर ।
कीर्तनीं बैसतां मन चिंती संसार, देवा चिंती संसार ॥३॥
निरंजन ह्मणे आह्मी वेडेबागुडे, देवा वेडेबागुडे ।
गुणदोष न लावावा सेवकाकडे, देवा सेवकाकडे ॥४॥
पद १२३
रामराया राघोबा रामरामा । तुझे ठायीं राहूं दे माझा प्रेमारे ॥धृ॥
नको मज संतती दाराधन । यांचे संगें त्रासलें माझें मन हो ॥१॥
नको यक्ष सत्कीर्ती लोकाचारी । नको मज सन्मान घरींदारीं रे ॥२॥
नको मज अयुष्य देऊं वाड । जिवित्वाची मजला नाहीं चाड रे ॥३॥
नको मज सर्वथा तुजवीण । सत्य बोले त्रिवाचा निरंजन रे ॥४॥
पद १२४
मोहिलें मन नंदाच्या नंदनें । भुललें तेणें हो घरालागिं येणें ॥धृ॥
पाणी हें पात्र घेउनिया पाणी । भरूं मी गेलें यमुनेचें पाणी ।
निबिड वृक्षाखालीं मधूवनीं । देखिला तेथें हो उभा चक्रपाणी ॥१॥
सहजिं तेणें केला वेणूरव । गाइलें सर्वश्रुतीचें वैभव ।
संगित नाना वाद्यांचा गौरव । पातले तेणें हो मज अष्टभाव ॥२॥
घेउनि निजस्कंदीं म्यां घागरीं । ऐकत उभी राहिलें वीळभरी ॥
सर्वथा नाहीं आले देहावरी । विसरुनि गेलें हो येयाचे मंदीरीं ॥३॥
सावळा हरी निरंजनवासी । श्रीधर सुरवर सौख्यरासी ।
गोधनासवें पातला घरासी । त्याचिया संगीं आलें अनायासीम ॥४॥
पद १२५
तैसा मायिक हा संसार । तैसा मायिक हा सं० ॥धृ॥
मृगजळ जैसें भावतरंगीं । दावित उदकाकार ॥१॥
रज्जूवरते पुच्छफणासह । भासत सत्य विखार ॥२॥
शुक्तीचे स्थळीं रजता भावित । सेवुनिया अविचार ॥३॥
निरंजन हा रघुविर वचनें । मानित देह असार ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP