मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २७६ ते २७९

मराठी पदें - पदे २७६ ते २७९

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २७६
पूजियला हो आह्मि योगिवृंदवंद्य सतत दत्तगुरू ॥धृ॥
कृतयुगिं मुनि अत्रि घरीं । विधि हरिहर दत्तवरी ।
त्रिगुणात्मक मूर्ति बरी । अनुसूया ह्रत्पद्मीं ।
प्रगट जाली हो ॥१॥
कोटि चंद्र समप्रकाश । मोह ध्वांत करुनि नाश ।
निजसुख दे अविनाश । शरणागत सुजनजनाहो ॥२॥
षड्भुजीं षडअयुध वरि । शंखचक्र उर्ध्वकरीं ।
डमरु त्रिशूळ मध्य धरी । कमडंलु अधोभागि मत्तमाळा ॥३॥
भागीरथि स्नान करी । भिक्षाटन कोल्हापुरीं ॥
भोजन करि माहूरीं । शेषाचलि शयन करुनि गिरनारी ॥४॥
योगस्थिति द्विभुज होत । सर्वांगीम भस्म खचित ।
जडवत् क्षिति शयन करित । क्वचित बाल क्वचित उन्मत्तपरी हो ॥५॥
अचल स्थिति ब्रह्मधामिं । सर्वव्यापि स्मर्तृगामि ।
निरंजन परम स्वामि । मनकुसुमें अर्चियला हो ॥६॥

पद २७७
भवार्णवीं बुडतों मि तारी रे माधव ।
अशातृष्णा मोहतम वारी रे माधव ।
दुखालय अशाश्वत देह रे ० । चिरस्थायि वृथा हा संदेह रे ० ॥२॥
पुत्रमित्रकलत्रादि सर्व रे मा ० । माझे ह्मणवुनि व्यर्थ केला गर्व रे मा ० ॥३॥
धनविद्याप्रतिष्टेच्या ठाईं रे । घालविलें वय पूर्तीं नाहीं रे मा ० ॥४॥
दानपुण्य कांहीं नाहीं घडलें रे । स्वकर्म करितां उणें पडलें रे ॥५॥
विरक्ति आणि भक्ति नाहीं घडली रे । सज्जनाचि हेळणा म्यां केली रे ॥६॥
लोक मज ह्मणताति साधू रे । अंतरिं जागति काम क्रोधू रे ॥७॥
जन्मांतरिं काय पुण्यें केलीं रे । सद्गुरुचि पूर्ण कृपा जाली रे ॥८॥
रघुविरें मज निरंजन केलें रे । पापतापदैन्य विलया गेलें रे माधवा ॥९॥

पद २७८
गोवळा गोपाळ वृंदावनिं वेणुं वाहे ।
मोहिलें हें मन नादाधारें मूळा जाय ॥
शबलांश सांडुनि शुद्धांसि मोहरलें मन ।
नादाचे उगमीं कैसें जहालें सुलीन ॥१॥
वाच्यांश सांडुनि लक्ष लक्षीसि तो स्वयें ।
लक्ष आणि लक्षीता हेहि तेथें नुरे द्वय ॥२॥
निरंजन नि:शब्द नादाचें जन्मस्थान ।
नाद आणि जाहाला जयरामकृष्णार्पण ॥३॥

पद २७९
सूक्ष्म गुरुमार्ग गुरुमार्ग । चढतां एकवीस स्वर्ग ।
हातीं घेउनियां ज्ञानखर्ग । घ्यावा अलक्षदुर्ग ॥धृ॥
हृदयीं प्रगटति तीन वाटा । दोन गेल्या नीटा ।
एक गेलीसे अव्हाटा । भेदुनि ब्रह्मकपाटा ॥सूक्ष्म०॥१॥
सप्तसिंधूचें आवरण । त्या दुर्गाकारण ।
तेथें जाईल बा ! कोण । योगींद्रावांचून ? ॥सूक्ष्म०॥२॥
धारा शस्त्राच्या तीक्षण । त्या दुर्गाकारण ।
त्यांहुनि करिती बा गमन । ब्रह्मनिष्ठ जाण ॥सूक्ष्म०॥३॥
सुईच्या रंध्राहुनि लहान । त्या दुर्गाची खूण ।
त्यांतुनि करिती बा गमन । आत्मनिष्ठ जाण ॥सूक्ष्म०॥४॥
जेथें रिघ नांहीं मुंगीला । ठाव कैंचा पक्ष्याला ।
मीन माघारा परतला । कपीशेष राहिला ॥सूक्ष्म०॥५॥
सद्गुरु एकांतासि नेतो । हस्त शिरीं ठेवितो ।
तनुमन घेऊनियां जातो । जिव मारुनि जिववीतो ॥सूक्ष्म०॥६॥
प्रभु निरंजन समर्थ । आमुचा सद्गुरुनाथ ।
तयानें दाखविला निजपंथ । बोलविला सिद्धांत ॥सूक्ष्म०॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP