मराठी पदें - पदे ३१ ते ३५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद ३१.
त्याला सुख नाहीं सुख नाहीं जागृत ज्याचे साही ॥धृ॥
वेदशास्त्र बहु शिकला । लोकीं इच्छितसे मानाला ॥१॥
जपतप साधन केलें । परि मन सिद्धी इच्छित ठेलें ॥२॥
बाहेर साधु झाला । अंतरिं इच्छी धनदाराला ॥३॥
निरंजन कवी झाला । जरि तो चढला अभिमानाला ॥४॥
पद ३२.
त्याचा गुरु हिरवा गुरु हिरवा आपल्या ह्मणवी बरवा ॥धृ॥
मीच एकला ज्ञानी वरकड जग सारें अज्ञानी ॥१॥
ह्मणवुनिया वेदांती लोकीं भांडत टाकुनि शांती ॥२॥
योगयाग म्यां केला पापी ह्मणवितसे लोकांला ॥३॥
निरंजन सुखि झाला दु:खी ह्मणती जन रे त्याला ॥४॥
पद ३३.
त्याला शुभ अवघें शुभ अवघें । आपुले स्वरुपीं जागे ॥धृ॥
सद्गुरूची आज्ञा घे । लोकीं वेड्यावाणी वागे ॥१॥
वस्तु पडली ठायां । वाचे शुद्ध नये बोलाया ॥२॥
प्रसादवानी वदला । त्याला लघुगुरु काशाला ॥३॥
संशय मनिंचा हरला । ध्यातो निरंजन सद्गुरुला ॥४॥
पद ३४.
त्याला दु:ख कैचें । समान पहाणें ज्याचें ॥धृ॥
कोणी पायां पडला । कोणी येउनि ताडुनि गेला ॥१॥
कोणी पुसती आज्ञा । कोणी करिती शब्दअवज्ञा ॥२॥
कोणीं केली निंदा । कोणी स्तुति केली स्वच्छंदा ॥३॥
सांडुनि खेद - विषादा । रमतो निरंजन स्वच्छंदा ॥४॥
पद ३५.
कपालेश्वर पंचाक्षर हे उच्चारा वाणी ।
अखंड हृदयीं ध्यातां पळती दुरिताच्या श्रेणी ॥धृ॥
कलुषहरण भवतारण निज शिरिं धर्ता शशिअंक ।
कमलासन वंदितसे ज्याचे चरणींचा पंक ।
कमलनयन कमलापति ध्यातो हृदयीं नि:शंक ॥१॥
पांघरलासे गजचर्मांबर वरि वेष्टुनि सर्पा ।
पाशुपत सेवुनि रचनीचर पाववितो दर्पा ।
पाळितसे निजदास निरंतर दंडुनिया पापा ॥२॥
लेवुनिया रुंडाचें भूषन निजस्वरूपीं डोले ।
लेपुनिया भस्माचें मर्दन सर्वांगा केलें ।
लेख नसे दुरिताचा तें निज नामें तारिलें ॥३॥
स्वरुपीं निर्मित झालें ज्याच्या हें सारें विश्व ।
स्वच्छंदें जग सारे केलें गजमानव - अश्व ।
स्वप्रकाश सर्वांतरि कर्ता तोचि दीर्घ र्हस्व ॥४॥
रक्षुनि निजभक्तांतें करितो दुष्टां संहार ।
रतिपतिचा शासनकर्ता शिव कर्पुरगौर ।
रमताहे निरंजन जनिं वनिं गाउनि रघुवीर ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP