मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे १५६ ते १६०

मराठी पदें - पदे १५६ ते १६०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद १५६
आजी धन्य हो तेचि संसारीं । सखा मानितो जयालागीं हरी हरी ।
हरीपायीं ठेवूनिया मन । नित्य युक्तत्वें करुनिया ध्यान ।
करि सेवा श्रद्धायुक्त जाण । प्रिय भावितो ज्यासी भगवान ॥१॥
करुनि इंद्रियग्राम स्वाधीन । सदा सर्वत्रीं बुद्धी समपण ।
सर्वभूतांच्या हितालागीं जाण । रत होवोनि सदा नुर्गुण ॥२॥
नाहीं कोणाचा जयालागीं द्वेष । मोह नाहीं अहंकार लेश ॥
सुखदु:खानें नव्हे जया क्लेश । असे ज्या लागीं क्षमाशीळ देश ॥३॥
शत्रुमित्र मान अवमान । स्तुति निंदा ज्यास समसमान ॥
स्थिरबुद्धि नाहीं निकेतन । त्यासि सद्भक्त ह्मणे निरंजन ॥४॥

पद १५७
नरतनु फाटकी बा दाखवितों उकलून । काय तुह्मी भुलला ती धडफुडीह्मणवून ॥धृ॥
पंचविस ठिगळांची देहगोधडी बा रे ।
मागिल संचिताचे तिला लाविले दोरे ॥
प्रारब्ध सुखदु:खरंग दिले काळे गोरे ॥१॥
क्रियमाण सुवाव्यानें शिवोनिया वारंवार ॥
उपयोगी ह्मणेनिया सांभाळितसां फार ।
जरा व्याधी तिजलागीं लागलीसे कसर ॥२॥
चांगली दिसती हे परि अंतरीं खोटी ।
कामक्रोध मोह लोभ विंचू सर्प तिच्या पोटीं ।
आशा तृष्णा कल्पना पिसा ढेकुण दाटी ॥३॥
जुनाट गोधडीचा सांडुनीया अभिमान ।
चित्जडग्रंथी भेद करुनिया घ्या धन ।
रघुविरगुरुकृपें तुह्मी व्हारे निरंजन ॥४॥

पद १५८
वैराग्य भाग्य आलें । दारिद्र्य नाहीं जालें ॥धृ॥
नाना विषयांचे भोग । मज दिसताती रोग ।
जाला बासना वियोग । मन निश्चळ ठेळें ॥१॥
सर्व त्रैलोक्याचें राज्य । तृणतुल्य वाटे मज ।
इच्छा निमाली सहज । काम नाहीं राहिलें ॥२॥
प्राप्त जालें आत्मसुख । तेणें गेलें सर्व दु:ख ।
जाला संसार विन्मुख । आपनासी पाहिलें ॥३॥
जाली भाग्याची हे सीमा । नाहीं याजसी उपमा ।
तुच्छ वाटताहे रमा । निरंजन बोले ॥४॥

पद १५९
मनुजा राम सदा वद रे ॥धृ॥
भ्रमदायक जग सर्वही मानुनि । माया आस दरे ॥१॥
कामादिक रिपु दंडुनि अंतरिं । सांडी दुर्मद रे ॥२॥
सावळि सुंदर मूर्ति हरीची । ध्याइ मनीं आदरें ॥३॥
रघुविर अक्षयीं देईल तूंतें । निरंजनपद रे ॥४॥

पद १६०
काय तुह्मी भुलला रे धनदारा पाहुनी ।
पुधिल दु:ख बाबा कानीं घ्यावें आयकुनि ॥धृ॥
अंतकाळीं नाहीं कोणी सोडविता येवोनी ।
दिसाल मग तुह्मी हीन दिनाच्यावाणी ।
यमदूत ओढतील काळपाशीं बांधुनि ।
कठिण वाट बा रे चालवीति जाचोनि ॥१॥
कंटक तीव्र मोठे तप्त भूमी वरोनी ।
चालवीति वेगें वेगें आंग जातें फाटोनि ।
कावळे कुतरे ते मांस खाती तोडोनी ।
याहुनी पुढें मोठी यमपुरीं जाचणी ॥२॥
करीताति शस्त्रमारा अग्निस्तंभा बांधोनी ।
झोडोनि पाडिताती विंचूसर्प डसवोनी ।
पर्वता वरोनिया खालीं देती ढकलोनी ॥३॥
बहुत दु:खें ऐसीं पडतील भोगणी ।
याजसाठीं रामराम वाचे गा रे निशिदिनीं ।
सोडवील अंतकाळीं सर्व श्रमापासुनी ।
हितकर माना सारे निरंजनाची वाणी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP