मराठी पदें - पदे २५६ ते २६०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद २५६
अरे मी कैसा । जो भाविल त्याला तैसा ।
अभक्ता मी न दिसे दिवसा । भक्ताचा तरि पूर्ण कुवासा ।
पांडव गेले जरि वनवासा । भोजन निशिम दिलें दुर्वासा । पहाता ॥१॥
शिशुपाळा मी वाटे वैरी । त्याची इच्छा त्याशिच मारी ।
कौरव मेले अहंकारीं । मजला मित्र उदासीन अरि नाही सहसा ॥२॥
बसता कल्पतरूचे छाये । जो जें कल्पिल तैंसें होय ।
सुरतरु नेणें दोन्ही सोय । प्रिय अप्रिय विवर्जित आहे मी तरि ऐसा ॥३॥
नास्तिकासि मी कोठें नाहीं । अस्तिकासि भेदत्वें राही ॥
ज्ञानियासि तव सर्वाठायीम । स्वयें निरंजन नेणें कांहीं । द्वैतविलासा ॥४॥
पद २५७
आतां काशासाठीं खेद । जनिं उरला नाहीं भेद ॥धृ०॥
अवघा एकचि चित्सिंधु । कोणा वंदू कोणा निंदू ॥१॥
काय घ्यावें आणि टाकावें । कोठें यावें कोठें जावें ॥२॥
ब्रह्मरूप चराचर । ब्रह्मरूप नारीनर ॥३॥
भवभ्रम गेला शीण । अद्वयरूप निरंजन ॥४॥
पद २५८
आत्मनिवेदन केलें रे तेणें मीपण गेलें ॥धृ॥
देहद्वयाप्रति प्रक्रुती कारण प्रत्यग पूर्णीं मिळालें ॥१॥
कर्मक्रिया सुखदु:खादि सर्वहि वस्तुनें केलें रे ॥२॥
दृश्यमृगांबु हे असतांचि नाहीं अद्वय एकचि ठेलें रे ॥३॥
नित्य निरंजन संपूर्ण हे जन रघुविरप्रसादें जाले रे ॥४॥
पद २५९
विजयी होईल राम । पूर्ण काम । जनकजे शोक त्यजावा ॥धृ॥
दाशरथीचा दूत मी हनुमान । जाळिन लंकाधाम ॥१॥
अठरापद्म चमु सहसुग्रीव आला मेघश्याम ॥२॥
वानरदळ आणि दैत्यकुळासी होईल किं संग्राम ॥३॥
निरंजन रघुनाथ प्रतापी मारिल रावनकाम ॥४॥
पद २६०
नरहरिराया करि पूर्ण कृपेची छाया ॥धृ०॥
देवा पडतों तुझिया पाया । अवरि अवरि हे तव माया ॥
श्रमलों ईचा योगें वाया । रडता मोकळुनि धाया ॥१॥
भवतापानें भाजति लाह्या । शीतळ नाहीं ठाव बसाया ।
अंतर बाहिर जळती काया । तुजविण करु मी काय उपाया ॥२॥
तुझिया स्वाधिन तुझिया जाया । आह्मासि दाखविति भवभया ।
बांधुनि घालित देहत्रया । गुंतविति स्त्रिपुत्र स्नेहा ॥३॥
दुस्तर हा भवसिंधु तराया । शिणल्या अनेक साधनि बाह्या ।
निरंजन इच्छित गुण गाया । तवपदिं देई ठाय बसाया ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP