मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय २ रा

स्कंध १० वा - अध्याय २ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१८
परीक्षितीलागीं निवेदिती शुक । प्रलंब, मुष्टिक, बाण, भौम ॥१॥
दैत्य, तेंवी दैत्यनृपाळ बहुत । जरासंधाश्रित कंसासवें ॥२॥
पीडीतां यादवां, जाती देशोदेशीं । राहिले तेथेंचि अक्रूरादि ॥३॥
पुत्रषट्‍कवध होतां स्वयें शेष । देवकीगर्भांत जन्म घेई ॥४॥
साक्षात्‍ जगन्नाथ येतां गर्भामाजी । हर्षली देवकी परी खिन्न ॥५॥
वासुदेव म्हणे अपत्यविनाश । चिंतूनि मातेस दु:ख होई ॥६॥

१९
चिंतूनियां मनीं योगमायेप्रति । धाडी गोकुळासी योगेश्वर ॥१॥
म्हणे गाई, गोप त्यास्थळीं बहुत । स्थान आल्हादक रम्य बहु ॥२॥
रोहिणीआदि त्या वसुदेवस्त्रिया । वसती त्या ठाया गुप्तपणें ॥३॥
शेषगर्भ स्थापीं रोहिणीउदरीं । आकर्षण करीं गर्भाचें त्या ॥४॥
स्वयें देवकीच्या मी येतों उदरीं । सुजनांचे करीं पूर्ण हेतु ॥५॥
दुर्गा, अंबिका या नामें कलीमाजी । आनंदें तुजसी पूजितील ॥६॥
वासुदेव म्हणे संकर्षण नाम । गर्भासी त्या जाण म्हणती विष्णु ॥७॥

२०
आज्ञेसम माया आकर्षूनि गर्भा । उदरीं स्थापी त्या रोहिणीच्या ॥१॥
देवकीचा गर्भ पावला पतन । मानूनियां खिन्न मथुरावासी ॥२॥
पित्याच्या हृदयीं प्रवेशे परमात्मा । अभयपद जाणा भक्तांप्रति ॥३॥
रात्रंदिन तेणें वसुदेवचित्तीं । स्थिरावली मूर्ति श्रीहरीची ॥४॥
भासला भास्कर तदा वसुदेव । कंसालागीं भय वाटे त्याचें ॥५॥
वासुदेव म्हणे ईशकृपा होतां । भय कोण भक्ता दावी जनीं ॥६॥

२१
ध्यानमात्रें करीं धारण गर्भाचें । कथी देवकीतें वसुदेव तैं ॥१॥
करितां तैसेंचि पालटली कांती । सच्चिन्मय दिप्ति कारागारीं ॥२॥
बंदिवासें जनां नाहीं तें कललें । अनुभवा आलें देवकीच्या ॥३॥
अपूर्व आनंदसागरीं ती मग्न । दिप्ति ते पाहून कंस भ्याला ॥४॥
उदरीं पातला म्हणे हिच्या देव । प्राण तो हरील खचित माझे ॥५॥
गुहेमाजी निद्रा घेई जेंवी सिंह । तैसाचि गर्भांत वास याचा ॥६॥
अपूर्व हें तेज स्पष्ट करी हेंचि । वासुदेव चित्तीं चिंती तया ॥७॥

२२
कंस म्हणे आतां योजूं कोणता उपाय ॥
नाशास्तव माझ्या येई दुर्बल तो काय ॥१॥
वाटे देवकीच्या वधें वांचतील प्राण ॥
जिवंतही क्रूर, जनीं असे प्राणहीन ॥२॥
अवला भगिनी तेही त्यांत गर्भवती ॥
वधितांची सर्व नाशा पावेन निश्चिती ॥३॥
चिंतूनियां ऐसें म्हणे वधूं बाळासीच ॥
ध्यानीं मनीं एक आतां तोचि तया ध्यास ॥४॥
बैसतां उठतां येतां जातां सर्वकाळ ॥५॥
वासुदेव म्हणे कंस पाही घननीळ ॥५॥

२३
देवही ते देवकीची । ध्यानें अवस्था जाणिती ॥१॥
शिव, विरंची, नारद । येती देवकीसन्निध ॥२॥
अहो, गर्भस्थ प्रभूची । देव करिताती स्तुति ॥३॥
श्रेष्ठव्रता, श्रेष्ठसत्या । देवा, आदि मध्य अंत्या ॥४॥
निर्मूनियां सर्व भूतें । वास करिसी तूंचि तेथें ॥५॥
विश्व तुझ्यांतचि लीन । अंतीं पावतें हें जाण ॥६॥
शास्त्र सन्मार्गही तूंचि । दावितोसी भक्तांप्रति ॥७॥
सर्व सद्‍गुणनिधाना । नम्र आम्हीं घे वंदना ॥८॥
वासुदेव म्हणे देव । म्हणती करीं अनुग्रह ॥९॥

२४
निर्मिलासी देवा, प्रपंचवृक्ष हा । प्रकृतीचि तया एक आळें ॥१॥
सुख-दु:ख बीज दलें तया दोन । सत्त्व रज तम मुळें त्याचीं ॥२॥
धर्म, अर्थ, काम, मोक्ष ऐसे चार । वृक्षासी साचार मधुर रस ॥३॥
ज्ञानेंद्रियें पंच ज्ञानसाधनें तीं । स्वभाव तयासी षड्रिपूंचा ॥४॥
सप्त धातु तींच सप्तांगें त्वचेचीं । अष्टधा प्रकृति शाखा तया ॥५॥
मुखादिक नवद्वारें त्याची ढोली । दश प्राण त्यासी पत्रें दश ॥६॥
जीव शिव पक्षी तयावरी दोन । विस्मित ऐकून वासुदेव ॥७॥

२५
आदिवृक्षाचा त्या आदि अंत तूंचि । ब्रह्मा विष्णुआदि निमित्तें त्या ॥१॥
विश्वाचें कल्याण सज्जनरक्षण । दुष्टनिर्दलन करिसी तूंचि ॥२॥
याचि कार्यास्तव नानारुपें घेसी । उपकार बुद्धि न वर्णवे ॥३॥
प्रभो, अंबुजाक्षा सर्व शक्तिमंता । लाभे नृपानौका भक्तांसी ज्या ॥४॥
गोष्पदासम त्यां हा भवसागर । ऐसी कृपानाव अपूर्व ते ॥५॥
वासुदेव म्हणे सर्वार्पणभाव । करी भवपार तत्रस्थासी ॥६॥

२६
कुलीनता तप अध्ययनाहूनि । भक्तीचि या जनीं श्रेष्ठ असे ॥१॥
अन्य उपाय ते बहु कष्टप्रद । भक्तीचि वरिष्ठ शुद्धिदात्री ॥२॥
अभिमान ग्रासी जेंवी तपस्व्यासी । तैसी न भक्तीची स्थिति कदा ॥३॥
भक्त तुझ्या ध्यानीं सर्वदा निमग्न । संकटें तुडवून पायांतळीं ॥४॥
विहिताचरणें ब्रह्मचारीआदि । करिते त्वद्भक्ति याचसाठीं ॥५॥
वासुदेव म्हणे अवताराविण । अलौकिक कर्म कोण दावी ॥६॥

२७
अवतारलीला पाहूनियां चित्तीं । ठसे ईशभक्ति निश्चयानें ॥१॥
अवतारलीला ऐकेही न कदा । मुकेल तो सदा भक्तिभावा ॥२॥
भक्तीनेंचि मुक्ति भेद तो अज्ञानें । प्रत्यक्ष दर्शनें तापनाश ॥३॥
सगुण-निर्गुणचिंतनें सार्थक । झाला हेतु साध्य अवतारेंचि ॥४॥
आतां मंगल तीं पाऊलेंचि मात्र । दिसावीं हा हेत उरला मनीं ॥५॥
भाग्योदय तोही होईल त्वरित । संशय मनांत नसे आतां ॥६॥
हे अजा, अव्यया खेळचि हा केला । आजवरी लीला बहुत तव ॥७॥
तैसेंचि तूं आतां करीं दिव्यकर्म । पातलों शरण कृपा करीं ॥८॥
वासुदेव म्हणे देवकीसी देव । देऊनि अभय स्वर्गी गेले ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP