स्कंध १० वा - अध्याय ३६ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
४२१
रायाप्रति शुक कथिती आश्चर्य । ऐकें झालें काय एक्यावेळीं ॥१॥
गोकुळांत एक अरिष्ट नामक । घोर दैत्यश्रेष्ठ प्राप्त झाला ॥२॥
भयप्रद वृष होतसे तो एक । पाहूनिच गोप भयाकुल ॥३॥
पर्वतचि दिसे तयाचें वशिंढ । चालतां तो कंप भूमीलागीं ॥४॥
उभारुनि पुच्छ उकरी तो भूमि । नाद जो गगनीं धुमे ऐसा ॥५॥
डिरकाळ्या त्याच्या ऐकूनियां गर्भ - । धेनूंचे त्वरित गळूनि जाती ॥६॥
वासुदेव म्हणे भूमि निजश्रृंगें । उकरितां वाटे पृथ्वीनाश ॥७॥
४२२
नेत्र त्याचे खदिरांगार । दृष्टि न करवे स्थिर ॥१॥
वत्सांसवें त्या पाहूनि । धेनू पळूनि जाती वनीं ॥२॥
पाहूनियां ते अवस्था । कृष्ण बोलला त्या दुष्टा ॥३॥
मूढा, पातलों मी थांब । दुर्बलांचा तूं कंटक ॥४॥
भिऊं नकारे गोपांनो । माझ्या जिवलग मित्रांनो ॥५॥
दुष्टा, मजवरी येईं । सर्व शक्ति आपुली दावीं ॥६॥
हरायासी दुष्टदर्प । उभा सर्वदा मी एथ ॥७॥
वासुदेव म्हणे दंड । ठोकी तदा यदुनाथ ॥८॥
४२३
बोलूनियां ऐसें मित्रस्कंधीं एक । ठेवूनियां हस्त उभा राहे ॥१॥
अंगावरी दुष्ट धांवला तैं क्रोधें । विदारी मेघांतें पुच्छाघातें ॥२॥
घेऊनियां झेंप येई कृष्णावरी । हेतु शृंगावरी घ्यावें तया ॥३॥
काळाच्याही काळा पुढती तें बल । होईल निष्फल न कळे तया ॥४॥
येतां तो धांवूनि मारावया शृंगें । धरिलीं श्रीरंगें शृंगें त्याचीं ॥५॥
सहज तयासी ढकलितां मागें । अष्टादश पदें पडला दूर ॥६॥
वासुदेव म्हणे होतांही फजित । धरिती न लाज दुष्ट मनीं ॥७॥
४२४
निर्लज्ज ते नीच पुन: पुन: तेंचि । दुष्कर्म वरिती दुष्टभावें ॥१॥
अरिष्टासुरही टाकीताचि धांपा । वधाया गोविंदा धांव घेई ॥२॥
घामाघुम तेंवी होतां क्रोधतप्त । पाहूनि मुकुंद कोडग्यासी ॥३॥
पिरगाळूनियां शृंगें त्या उताणा । पाडूनि यदुराणा लीला करी ॥४॥
उरावरी त्याच्या ठेवूनियां पाद । उपटिलें एक शिंग त्याचें ॥५॥
तयाचि शृंगानें झोडपितां दुष्ट । ओकूनियां रक्त मरुनि गेला ॥६॥
हर्षे तदा देव वर्षिती सुमनें । करिती स्तवनें स्वर्गामाजी ॥७॥
वासुदेव म्हणे मूर्तिमंत मोद । पाहूनि सद्गद होती गोपी ॥८॥
४२५
निवेदिती शुक नारद । राया, कंसभेट घेती सुखें ॥१॥
मुनि महाज्ञानी बोलले कंसासी । परिणाम ज्यांसी सकळ ज्ञात ॥२॥
देवकीसी कन्या जाहली अष्टम । प्रवादचि जाण निश्चायें तो ॥३॥
वसुदेवें केली तव प्रतारणा । गोकुळींचा कान्हा पुत्र त्याचा ॥४॥
कन्या यशोदेची गेली जे गगनीं । वृत्तांत हा ध्यानीं असो तुझ्या ॥५॥
रोहिणीचा पुत्र तोचि बलराम । पुत्रप्रेमें कर्म वसुदेवाचें ॥६॥
नंद तो परम मित्र वसुदेवाचा । राम-कृष्णें दैत्यां वधिलें सर्वां ॥७॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें क्रुद्ध । जाहला अत्यंत कंसदैत्य ॥८॥
४२६
खेंचूनियां खड्ग वसुदेववध । करावया सिद्ध होई दुष्ट ॥१॥
निवारिती तदा नारद तयासी । ऐसा अविवेकी म्हणती न तूं ॥२॥
पितृवधें पुत्र जातील पळूनि । ठेवितां कोंडूनि येतील ते ॥३॥
मग तयांप्रति वधीं तूं सुखानें । निवेदूनि ऐसें गेला मुनि ॥४॥
देवकी-वसुदेवां तत्काळचि कंस । होवो बंदिवास म्हणे आधीं ॥५॥
कोंडूनि तयांतें, केशीदैत्याप्रति । राम-कृष्णां वधीं म्हणे जारे ॥६॥
वासुदेव म्हणे घट पातक्याचे । भरल्याविण नसे प्रायश्चित्त ॥७॥
४२७
मुष्टिक, चाणूर आदि मल्लांतेंही । सुचवूनि ठेवी दुष्ट कंस ॥१॥
राम-कृष्ण माझे वैरी मथुरेसी । येतांचि तयांसी वधणें योग्य ॥२॥
बलवान मोठे मल्लयुद्धप्रिय । जाणूनियां कार्य करणें इष्ट ॥३॥
आखाडे नगरीं योजा जागोजाग । सिद्ध मल्लस्तंभ ठेवा तेथें ॥४॥
प्रेक्षकां बैसाया स्थळही असावें । सर्वत्रचि व्हावें इतुकें कार्य ॥५॥
वासुदेव म्हणे कुवलयापीड । गजही सुसज्ज करिती दैत्य ॥६॥
४२८
करुनियां ऐसी सिद्धता शिवाची । येतां चतुर्दशी पूजा व्हावी ॥१॥
ऐसें योजूनियां शिवसंतोषार्थ । कंस, धनुर्याग करुं म्हणे ॥२॥
पुढती अक्रूरा पाचारुनि कंस । सत्कारुनि त्यास वदला दुष्ट ॥३॥
मित्र हितकर्ता अससी तूं माझा । यादवांत ऐसा मित्र नसे ॥४॥
युक्तिकुशल तूं कार्य असे एक । महत्वाचें तूंच करणें योग्य ॥५॥
करिसील तरी थोर उपकार । सन्मित्रा, होतील मजवरी ॥६॥
वासुदेव म्हणे अक्रूरासी कंस । बोले गोड शब्द काय ऐका ॥७॥
४२९
करुनियां ऐसी सिद्धता शिवाची । येतां चतुर्दशी पूजा व्हावी ॥१॥
ऐसें योजूनियां शिवसंतोषार्थ । कंस, धनुर्याग करुं म्हणे ॥२॥
पुढती अक्रूरा पाचारुनि कंस । सत्कारुनि त्यास वदला दुष्ट ॥३॥
मित्र हितकर्ता अससी तूं माझा । यादवांत ऐसा मित्र नसे ॥४॥
युक्तिकुशल तूं कार्य असे एक । महत्वाचें तूंच करणें योग्य ॥५॥
करिसील तरी थोर उपकार । सन्मित्रा, होतील मजवरी ॥६॥
वासुदेव म्हणे अक्रूरासी कंस । बोले गोड शब्द काय ऐका ॥७॥
४२९
विष्णुसहाय्यानें इंद्र । झाला जेंवी कृतकार्य ॥१॥
तैसें साह्य करीं मातें । स्मरण राहो त्वत्कृतीचें ॥२॥
कृष्णहस्तें मृत्यु माझा । मित्रा, देवांनीं योजिला ॥३॥
तेणें क्षणही मनास । समाधान तें नाहींच ॥४॥
बंधुद्वय रात्रंदिन । दिसती कृतांतासमान ॥५॥
आवश्यक तेणें कांहीं । मार्ग शोधणें तें होई ॥६॥
वासुदेव म्हणे सिद्ध । सर्व योजना ते गुप्त ॥७॥
४३०
आतां अक्रूरा, ते मथुरेसी येतां । मत्त गज वधिल क्षणीं ॥१॥
सुटलाचि जरी गजशुंडेंतूनि । ठेविले योजूनि पुढती मल्ल ॥२॥
निश्चयें ते त्यांचा करितील वध । परी मथुरेंत येवोत ते ॥३॥
मित्रा, तें सत्कृत्य तुझ्याविण कोण । करील जाणून साह्य होईं ॥४॥
नंदादींही यावे घेऊनि अहेर । चतुरा, उपाय योजीं ऐसा ॥५॥
तयांचाही वध योग्य कृष्णासवें । वसुदेवादी ते पुढती दीन ॥६॥
मित्रा, मग तयां वधीन लीलेनें । वासुदेव म्हणे काय बुद्धि ॥७॥
४३१
कंस म्हणे मित्रा, उग्रसेनाचाही । शिरच्छेद पाहीं योग्य वाटे ॥१॥
असूनिही वृद्ध तया राज्यलोभ । तद्बंधु देवक तोही वध्य ॥२॥
ऐसे सकलही शत्रु ते वधूनि । भोगीन अवनी निष्कंटक ॥३॥
इतुकेंही करुनि उरतील कोणी । क्षुद्रां तयांसी मी जुमानींना ॥४॥
मगधाधिपति श्वशुर तो माझा । शंबरादि, माझा आधार ते ॥५॥
तयांच्या साह्यानें जिंकीन अवनी । अमराभिमानी वधूनि नृप ॥६॥
वासुदेव म्हणे मनोराज्य गोड । करिताती मूढ नित्य ऐसें ॥७॥
४३२
कंस म्हणे माझे हेतु हे सकल । निश्चयें होतील पूर्ण परी ॥१॥
साह्य तूं मजसी होणें आवश्यक । बुद्धिबळें सिद्ध करीं हेतु ॥२॥
जाऊनि गोकुळीं मधुर बोलून । आणीं राम-कृष्ण मथुरेमाजी ॥३॥
ऐकूनि अक्रूर बोलला कंसासी । योजना हे तुझी बहु गोड ॥४॥
परी भरवंसा कायरे सिद्धीचा । इतुकीच शंका मज एक ॥५॥
कारण मानव योजीतसे एक । होई भलतेंच परी जनीं ॥६॥
अनुभव ऐसा वारंवार येई । सिद्धचि मी पाहीं तव कार्यातें ॥७॥
निवेदिती शुक सकल योजना । आंखूनि स्वस्थाना अवघे जाती ॥८॥
वासुदेव म्हणे लीला श्रीहरीची । नाटक रंगवी कैसें पाहूं ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : December 28, 2019
TOP