मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय १७ वा

स्कंध १० वा - अध्याय १७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२२२
राव म्हणे गुरो, कालियावृत्तान्त । निवेदा समस्त मजलागीं ॥१॥
निवेदिती मुनि रमणकद्वीपीं । सर्पांची वसती पुरा होती ॥२॥
विनतासुतासी प्रति अमप्रति । बळी ते अर्पिती नियमें सर्व ॥३॥
पाळीपाळीनें हा चालला नियम । कालिया लंघून नियम गेला ॥४॥
स्वयेंही न बळी अर्पितां, अन्यांनीं । अर्पिला, जाऊनि तोचि भक्षी ॥५॥
वासुदेव म्हणे पाहूनि तें कर्म । गरुड क्षोभून धांव घेई ॥६॥

२२३
अंगावरी विनतासुत । येतां कालियाही क्रुद्ध ॥१॥
चवताळूनि दंश करी । गरुड तया पंख मारी ॥२॥
तदा जर्जर कालिया । येई सत्वरी डोहीं या ॥३॥
पुरा सौभरि मुनींची । भूमि होती हे तपाची ॥४॥
वधावे न येथें मत्स्य । ऐसा सौभरिदंडक ॥५॥
परी तेथें वैनतेय । वधी एक प्रमुख मत्स्य ॥६॥
त्याच्या परिवारदु:खें । होई खेद सौभरींतें ॥७॥
वासुदेव म्हणे ज्ञाते । दु:खी अन्याच्याही दु:खें ॥८॥

२२४
शापिलें मुनींनीं तदा गरुडासी । येतां ‘या स्थानासी मरण तुज’ ॥१॥
कालियासी मात्र ज्ञात होता शाप । यास्तव तो एथ प्राप्त झाला ॥२॥
असो, ऐसा दुष्ट घालवूणि दूर । उदकाबाहेर येई कृष्ण ॥३॥
आभरणें तया बहु कालियानें । अर्पिली तीं प्रेमें ल्याला होता ॥४॥
पाहूनि तयासी गोप-गोपिकांतें । प्राणचि आलासें सौख्य होई ॥५॥
मूर्च्छित ते सर्व सत्वरी उठूनि । आनंदें जाऊनि भेटले त्या ॥६॥
वासुदेव म्हणे चुंबनालिंगन । अधिकारासम कृष्ण देती ॥७॥

२२५
नंद-यशोदेचा मोद । मावेनाचि गगनांत ॥१॥
हांसूनियां बळिराम । देई कृष्णा आलिंगन ॥२॥
धेनुवत्सेंही हर्षित । वृक्षही ते टवटवीत ॥३॥
मृत्यूचिया दाढेंतूनि । कृष्ण वांचला म्हणूनि ॥४॥
पुरोहिताच्या वचनें । नंद करी बहु दानें ॥५॥
अंकीं घेऊनि यशोदा । पाही पुत्रवदनचंद्रा ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा । हर्ष गोप-गोपिकांचा ॥७॥

२२६
श्रांत तयादिनीं सकलही गोप । वास्तव्य ती रात्र करिती तेथें ॥१॥
मोकळ्या पुलिनीं पावले आनंद । होता ग्रीष्मकाळ तयावेळीं ॥२॥
मध्यरात्रीं गाढ निद्रिस्थ असतां । घर्षणें वृक्षांच्या वणवा पेटे ॥३॥
सकलही दिशा व्यापिल्या अग्नीनें । असह्य तो जाणें दाह गोपां ॥४॥
अंतीं सुटकेचा मार्ग न दिसतां । प्रार्थिती अच्युता सकळ गोप ॥५॥
वासुदेव म्हणे हरीविण कोण । संकटीं रक्षणकर्ता असे ॥६॥

२२७
कृष्णा, रामा, दाह पावतसों आम्हीं । तुम्हांविण कोणी आधार न ॥१॥
भयविनाशका, सोडूनि तुजसी । सांग कोणाप्रति विनवूं आतां ॥२॥
मृत्यूचें न आम्हां कृष्णा, भय वाटे । असह्याचि भासे विरह परी ॥३॥
कृष्णा, त्वच्चरण हेंचि आम्हां सौख्य । पाहूनि ते आर्त गोप सर्व ॥४॥
सदय होऊनि कृष्ण करी लीला । क्षणांत गिळिला सकल अग्नि ॥५॥
वासुदेव म्हणे विश्वसंहारका । काय त्या अग्नीचा पाड तरी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP