१६९
वंदितों हे वंद्या देवा, मेघ:श्यामा । करीं दध्योदनग्रास तुझ्या ॥१॥
भरजरी पीतांबर गुंजागुच्छ । मयूराचें पिच्छ शिरीं शोभे ॥२॥
पांवा शिंग वेत्रयष्टि तुझ्या करीं । कोमल शोभलीं पादपद्में ॥३॥
मज दीनावरी अनुग्रहार्थ हें । दाविलें गोजिरें रुप मज ॥४॥
भक्तानुग्रहार्थ घेसी बहु रुपें । महिमा कोणातें न कळे तव ॥५॥
सगुणही लीला न कळती कोणा । मग त्या निर्गुणा कोण जाणे ॥६॥
वासुदेव म्हणे अज्ञचि भाग्याचे । उद्धरी तयांतें हरिकथा ॥७॥
१७०
देवा, संतसंगें ऐकूनि त्वत्कथा । मन काया वाचा त्वदर्पित - ॥१॥
करुनियां, अज्ञ साधूनियां भक्ति । त्वत्स्वरुपप्राप्ति साधिती ते ॥२॥
त्यागूनियां भक्ति घोंकिते जे शास्त्र । कुटिती ते तूस त्यजूनि धान्य ॥३॥
यास्तव त्यजूनि योग याग तप । कथाश्रवणांत रमती ज्ञाते ॥४॥
भक्तीविण बोध कदाही न तव । सगुण प्रत्यय सुलभ नसे ॥५॥
अधिष्ठानरुप जाणती संयमी । दुर्भागी ते जनीं विषयासक्त ॥६॥
वासुदेव म्हणे विरंचीचें मत । सगुण दुर्लभ निर्गुणेंसी ॥७॥
१७१
विश्वरुपा बहु जन्मीं ते गणितां । भूरज:कणांचा अंत शक्य ॥१॥
मेघतुषार वा किरण परमाणु । गणनाही मानूं शक्य कोणा ॥२॥
परी त्वद्गुणांची गणना व्यापका । अशक्य अच्युता, वाटे मज ॥३॥
तात्पर्य, त्वज्ञान दुर्लभ जाणूनि । रमेल स्वकर्मी निरपेक्ष ॥४॥
प्राप्त सुख-दु:ख लेखूनियां सम । सेवेंत निमग्न होईल जो ॥५॥
पितृसेवारता लाभे त्याची ठेव । तेंवी सायुज्यत्व प्राप्त त्यासी ॥६॥
वासुदेव म्हणे ब्रह्मदेव ऐसी । बोले कृष्णाप्रति नम्र वाचा ॥७॥
१७२
ईश्वरा, नियंता कर्ता तूं अविनाशी । त्रैलोक्य मोहिसी स्वमायेनें ॥१॥
ऐशा तुजलाही मूढपणें मोह । पाडावा हा भाव धरिला मनीं ॥२॥
यद्यपि तापद इतरां स्फुलिंग । तथापि अग्नीस काय त्याचें ॥३॥
रजोगुणोद्भव तैसा मी स्वयेंचि । आधार सृष्टीसी मानियेलें ॥४॥
अहंभावेंचि त्या केला अपराध । प्रार्थितो मी तुज क्षमा करीं ॥५॥
अष्टधा प्रकृति या सप्त वितति । देह माझा, त्यासी मूल्य काय ॥६॥
रोमरोमीं तुझ्य अनंत ब्रह्मांडें । सामर्थ्य बापुडें माझें तेथ ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसें प्रार्थी ब्रह्मा । करीं मज क्षमा जगन्नाथा ॥८॥
१७३
मातेच्या उदरीं हालवी चरण । बालक, ताडन नव्हेचि तें ॥१॥
तैसा अपराध मानूं नको माझा । बालक मी तुझा कमलोद्भव ॥२॥
सर्वाधार अंतर्यामी तूं प्रेरक । त्वत्कृपाकटाक्ष सकलांवरी ॥३॥
क्षीरसिंधुस्थित नारायण तूंचि । लीलामात्रें होसी विश्वरुपा ॥४॥
केवळ तयानें पावलासी मज । शोधितां असंख्य वर्षे शीण ॥४॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा कथी माया । दाविसी, केशवा सकल तूं हें ॥५॥
१७४
सत्य जरी रुपें मानावीं तीं तुझीं । संसाराची बेडी तरी तुज ॥१॥
यशोदेसी विश्व दाविलें वदनीं । मायाचि हे जनीं तेणें सिद्ध ॥२॥
आदर्शांत त्याचि प्रतिबिंब तयाचें । अशक्य, हे तैसे सकळ भ्रम ॥३॥
सात्पर्य, सकळ देवा, तव माया । मजही या ठाया दाविलीस ॥४॥
क्रीडनकांसवें सकलही गोप । तेंवी तूंचि वत्स जाहलासी ॥५॥
आतां दध्योदनग्रासयुक्त एक । दिससी तूं मज, सकळ माया ॥६॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा मायिकचि । सकल हे कृति म्हणे देवा ॥७॥
१७५
मायिकचि सत्य मानिती जे तया । भाससी तूं देवा विविधरुपें ॥१॥
ब्रह्मा विष्णु शिव उत्पत्यादि कर्ते । वामन, राम ते अवतारही ॥२॥
देवांत वामन, भार्गव ऋषींत । राम-कृष्ण स्पष्ट नरांमाजी ॥३॥
वराह तूं होसी पशूंमाजी देवा । मस्त्य-कूर्मभावां धरिसी जळीं ॥४॥
नीच योनि तेंवी याचना बळीचीं । पळूनियां जासी कंसभयें ॥५॥
वासुदेव म्हणे लीला हे सकल । मांडितांचि खेळ करी प्रभु ॥६॥
१७६
ब्रह्मा म्हणे देवा, असत्यही सत्य । अनित्यही नित्य सुख-दु:ख ॥१॥
जडही चेतन विश्व हें अनंता । त्वदाधारें लोकां भासतसे ॥२॥
उपाधिरहिता ज्ञानेंचि त्वत्प्राप्ति । बाधित देहादि होती ज्ञानें ॥३॥
आत्मज्ञानें मोक्ष हाही एक भास । अज्ञानेंचि मोक्ष-बंध शब्द ॥४॥
सूर्यचि या ठायीं दिवस न रात्र । केवळ प्रकाश सर्वकाळ ॥५॥
तैसाचि अखंड शुद्ध ज्ञानरुप । देवा, तूं न बंध-मोक्ष तेथें ॥६॥
वासुदेव म्हणे देहाध्यासें अज्ञ । शोधी नारायण अन्यत्रचि ॥७॥
१७७
विवेकीचि मात्र या जड देहांत । चैतन्याचा बोध करुनि घेती ॥१॥
सर्पभ्रम नष्ट जाहल्यांवांचूनि । रज्जुज्ञान जनीं न होईचि ॥२॥
तैसें देहादींचें अनित्यताज्ञान । होई तैंचि जाण आत्मबोध ॥३॥
मुमुक्षूसी याचि देहीं ऐसा बोध । होणें आवश्यक कल्याणार्थ ॥४॥
ऐसा बोध जया तोचि लाभे मुक्ति । शक्य न अन्यासी इतर मार्गे ॥५॥
वासुदेव म्हणे भक्तीविण ज्ञान । तुच्छचि तें जाण कथी ब्रह्मा ॥६॥
१७८
अतर्क्य महिमा कळे भक्तीनेंचि । तेथ न शास्त्राची मातब्बरी ॥१॥
ब्रह्मा म्हणे देवा, या वा अन्य जन्मीं । दासानुदास मी व्हावें वाटे ॥२॥
क्षुद्रही तो जन्म जेथें तव सेवा । घडेल तो देवा, देईं मज ॥३॥
भक्तीविण मज देवत्वही तुच्छ । वाटे धन्य भक्त सामान्यही ॥४॥
वासुदेव म्हणे भक्तीचा महिमा । मुक्त कंठें ब्रह्मा वर्णी स्वयें ॥५॥
१७९
धन्य धन्य गाई गोपी धन्य गोकुळींच्या ॥
जयाच्या भक्तीनें तृप्त होई यज्ञभोक्ता ॥१॥
प्राशूनि जयांचें दुग्ध वत्स - गोपरुपें ॥
देसी ढेंकरा प्रतिदिनीं देवा, तूं संतोषें ॥२॥
मित्र होऊनी जयांच्या सन्निध खेळसी ॥
थोरवी गाऊं मी किती त्या गोपबाळांची ॥३॥
हस्त-पादादि इंद्रियें सेविती जीं तुज ॥
इंद्रियदेवतांचें त्या वर्णूं केंवि भाग्य ॥४॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा यथार्थ वर्णन ॥
करुनि म्हणे हे धन्य गोकुळींचे जन ॥५॥
१८०
दर्शनें या नेत्र, ऐकूनि त्वत्कथा । येई कृतार्थता श्रवणांलागीं ॥१॥
निर्माल्यगंधानें घ्राणेंद्रिय धान्य । एकेक हें कर्म भाग्यदायी ॥२॥
यास्तव देवता त्या त्या इंद्रियांच्या । पावूनि संतोषा धन्य होती ॥३॥
परी सकलही इंद्रियें हे तुज । अर्पिताती गोप महद्भाग्यें ॥४॥
यास्तव माधवा, मृत्युलोकीं मज । व्रजांतचि एक जन्म देई ॥५॥
भाग्यवंतांची या तेणें पादधूलि । घेऊनियां भाळीं हर्षेन मी ॥६॥
वासुदेव म्हणे धन्य धन्य वाणी । रंगे जे वर्णनीं गोविंदाच्या ॥७॥
१८१
देवा, तुझे चरनरज । देव शोधिताती नित्य ॥१॥
ऐसा श्रेष्ठ तूं असूनि । जाहलासी एथ ऋणि ॥२॥
गोप-गोपींचा तूं पुत्र । देवा, होसी इष्ट मित्र ॥३॥
काय वर्णूं त्यांचें भाग्य । मोक्ष तयां करस्थित ॥४॥
परी इतुक्यानें केंवी । देवा, होसील उतराई ॥५॥
भक्तवेषेंचि ते दैत्य । अघासुरादि कृतार्थ ॥६॥
तेंचि फल या भक्तांतें । देतां न दिसे योग्य मातें ॥७॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा । वर्णी भक्तांचा महिमा ॥८॥
१८२
सर्व सर्व देवा, ज्यांनीं अर्पिलें तुजसी ॥
काय मुक्तीचि केवळ देसी तूं तयांसी ॥१॥
मग दुर्जन-सज्जनीं भेद काय देवा ॥
स्पष्टपणें अंतरींचा आशय कथावा ॥२॥
कोणी म्हणेल संन्यासी तेही मुक्त होती ॥
सर्वसंग त्यागें राग-द्वेष जे त्यागिती ॥३॥
परी तयांहूनि देवा, गोपींचें या प्रेम ॥४॥
राग - द्वेषही तयांसी भक्तीचें साधन ॥५॥
ग्राह्य त्याज्य न तयांसी सकलही वृत्ति ॥६॥
अर्पूनि तुजसी नित्य दंग प्रेमरंगीं ॥५॥
म्हणसील देवा, याचसाठी अवतार ॥
परी मायामयचि हा नव्हेचि साचार ॥६॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा विनवी यापरी ॥
देवा, ऋणि तूं भक्तांचा नित्य ऐशापरी ॥७॥
१८३
तात्पर्य ईश्वरा, आकळे न तव । व्यापका चरित्र मजलागीं ॥१॥
कललें तें मज कोणी जो हे प्रौढी । मिरवील जगीं मिरवोही तो ॥२॥
कर्तव्य न आम्हां कांहींचि तयासी । कुंठितचि मति होई मम ॥३॥
ब्रह्मांडनायका, तुझ्यापुढें माझ्या । काय सामर्थ्याचा पाड असे ॥४॥
अहं-ममभाव अर्पितो यास्तव । चरण हे तव वंदूनियां ॥५॥
यादवसूर्या, कंसादिकां भय । वैभवसागरचंद्र तूंचि ॥६॥
पाखंडमताचा चंद्र सूर्य तूंचि । वंद्य ब्रह्मांडासी नमन घेईं ॥७॥
वासुदेव म्हणे प्रदक्षिणा त्रय । घाली पद्मोद्भव तयावेळीं ॥८॥
१८४
वंदूनि कृष्णासी स्वस्थलासी ब्रह्मा । निघूनियां जातां वृंदावनीं ॥१॥
संवत्सरापूर्वी वत्सशोधाप्रति । दध्योदन हातीं घेऊनियां - ॥२॥
गेला होता कृष्ण कथूनि गोपांसी । वृत्तांत पुढती तोचि घडे ॥३॥
शोधूनियां वत्सें पातला श्रीकृष्ण । आनंद पावून वदती गोप ॥४॥
सत्वरीचि कृष्णा, आलासी हें बरें । अद्यापि भक्षिलें नाहीं शीत ॥५॥
ये ये बैस, करीं भोजन सुखानें । मोहित मायेनें होते गोप ॥६॥
वासुदेव म्हणे माय श्रीहरीची । न कळे अन्यासी जन्मोजन्मीं ॥७॥
१८५
संवत्सर गोपां वाटे अधक्षण । प्रभाव हा मायेचाचि ॥१॥
हास्यविनोदानें भोजन तें होई । कृष्ण तय दावी अघचर्म ॥२॥
पुष्पें काव तेंवी मयूरपिच्छांनीं । शोभला त्या वनीं कृष्णनाथ ॥३॥
पांवा शिंगनाद करीत आनंदें । वत्स-गोपांसवें गीत गात - ॥४॥
निघाला सदनीं जावया हर्षानें । स्वागत प्रेमानें करिती गोपी ॥५॥
गोपबाळ मोदें भेटूनि मातांसी । हर्षे निवेदिती अघवृत्त ॥६॥
वासुदेव म्हणे परीक्षिति शुकां । अत्यादरें ऐका पुशी काय ॥७॥
१८६
सद्गुणीही पुत्र अन्याचा न रुचे । मूढही तो रुचे आपुलाचि ॥१॥
ऐसी जनरिती असूनियां मुने । विपरीत कैसेंझ घडलें एथ ॥२॥
वेषांतरित त्या बाळांवरी प्रेम । कैसें पूर्वीहून करिती गोपी ॥३॥
पुत्रांहूनि प्रेम कैसें कृष्णावरी । निवेदा तें तरी मुनिश्रेष्ठा ॥४॥
वासुदेव म्हणे निवेदिती शुक । ऐकावा सिद्धान्त वेदान्तींचा ॥५॥
१८७
राया, प्राणिमात्र आत्म्यावरी प्रेम - । करी, तया गौण पुत्र मित्र ॥१॥
आत्मकामार्थचि प्रेम इतरांचें । देहही सुखाचें साधनचि ॥२॥
देहात्मवादीही जाणती न परी । प्रेम आत्म्यावरी करिती बहु ॥३॥
आसन्नमरण होतांही जीवित । इच्छिताती लोक सर्वकाळ ॥४॥
छेदूनिही हस्तपाद जीविताची । आशा न कोणाची सुटे कदा ॥५॥
कारण आत्म्याचें प्रेम देहाहूनि । अलौकिक जनीं न कळतांही ॥६॥
वासुदेव म्हणे यापरी मुनींद्र । कथिती सिद्धान्त पुढती ऐका ॥७॥
१८८
आत्मप्रेम राया, ऐसें अलौकिक । सर्वात्मा तो जेथ नटला रुपें ॥१॥
यास्तवचि प्रेम अत्यंत गोपीचें । जडणार कैसें नाहीं सांगें ॥२॥
याचि अर्थे ज्ञाता स्थावर-जंगम । कृष्णचि जाणून प्रेम करी ॥३॥
व्यापक सिद्धान्त आणिला प्रत्यया । भक्तांची माधवा दया बहु ॥४॥
ऐसे जे अनन्य तयासी शरण । तयां पुनर्जन्म मरण नसे ॥५॥
पदांबुजनौकाश्रितां न संसार । होती भवपार लीलेनें ते ॥६॥
अन्यवर्षी पूर्वकर्मवृत्त ऐसे । कथिलें गोपांतें बालकांनीं ॥७॥
करितां भक्तीनें श्रवण पठण । तन्मय तो जाण मुक्त होई ॥८॥
वासुदेव म्हणे कौमर्य यापरी । खेळ नानापरी करुनि गेलें ॥९॥