स्कंध १० वा - अध्याय ४९ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
५९२
निवेदिती शुक राया, हस्तिनापुरासी ॥
पातला अक्रूर आज्ञा घेऊनि हरीची ॥१॥
देवालयें प्रासाद तीं विप्रांचीं सदनें ॥
साक्ष विक्रमाची ऐसें भक्तराज म्हणे ॥२॥
धृतराष्ट्र, भीष्म, तेंवी विदुर कुंतीसी ॥
द्रोण, कर्ण, दुर्योधनां भेटला मुत्सद्दी ॥३॥
कांहीं मास राहूनियां जाणे पूर्ण वृत्त ॥
दुष्ट पुत्रांच्या तंत्रानें वागे धृतराष्ट्र ॥४॥
ज्ञात सद्गुण तयांसी होती पांडवांचे ॥
मत्सरही कौरवांचा कळला तयातें ॥५॥
वासुदेव म्हणे यत्नें पांडवविनाश ॥
आरंभिला ऐसें कुंती कथी अक्रूरास ॥६॥
५९३
पाहूनि अक्रूरा रुद्धकंठें कुंती । म्हणे स्मरिती कीं आप्त आम्हां ॥१॥
कृष्ण-बलराम आठविती काय । आमुतें यादव आप्त-इष्ट ॥२॥
वृकांमाजी जेंवी हरिणी त्यापरी । वेळ आम्हांवरी घोर आली ॥३॥
अक्रूरा, आनाथ बालक हे दीन । रक्षील त्यां कोण अन्य आतां ॥४॥
रक्षील कां सांगे श्रीहरी तयांसी । कृष्णांतें निवेदी कुंती दु:ख ॥५॥
विश्वपालका हे गोविंदा, संकटीं । आम्हांप्रति रक्षीं धर्ममूर्ते ॥६॥
वासुदेव म्हणे चिंतूनि कृष्णासी । शरण तयासी जाई कुंति ॥७॥
५९४
राया, माहेराचें येऊनि स्मरण । कुंतीचे लोचन भरुनि येती ॥१॥
अंतीं गहिंवर आंवरे न तिज । अक्रूर, विदुर तेही दु:खी ॥२॥
पुढती ते तिज देऊनियां धीर । सामान्य न पुत्र म्हणती तव ॥३॥
यमधर्मादिक देव ते प्रत्यक्ष । यास्तव तूं खेद न करीं मनीं ॥४॥
वासुदेव म्हणे धृतराष्ट्रभेटी । अक्रूर पुढती घेई स्वयें ॥५॥
५९५
राजसभेमाजी भीष्मादिक वीर । बोलला अक्रूर पुढती त्यांच्या ॥१॥
कृष्णाचा निरोप धृतराष्ट्राप्रति । राया कुलकीर्ति वाढवीसी ॥२॥
पंडुनिधनें तूं जाहलासे राजा । आश्रय धर्माचा करीं यत्नें ॥३॥
कौरव-पांडव लेखूनियां सम । वागतां कल्याण सकलांचें ॥४॥
विपरीत जरी वागसील राजा । इह लोकीं निंदा, नरक अंतीं ॥५॥
वासुदेव म्हणे श्रेष्ठ तत्त्वबोध । बोलला अच्युत तोही ऐका ॥६॥
५९६
कौरव-पांडवभेद ते मूढता । सहवास कोणाचा नसे नित्य ॥१॥
राया, देहातेंही त्यागी हा जीवात्मा । पुत्र, दारा, धना, पुशी कोण ॥२॥
जन्म-मरणही एकाकी जीवासी । कर्मफल भोगी एकाकीचि ॥३॥
जन्मतां मरतां सांगाती न कोणी । पाप-पुण्यधनी जीव एक ॥४॥
पोशिंदा मी ऐसा अभिमानकर्ते । पोष्य ते पापाचे प्रवर्तक ॥५॥
यास्तव सर्व हें मानूनियां स्वप्न । पांडवांसी सम लेखीं राया ॥६॥
वासुदेव म्हणे देहभावासक्त । न होईं, अच्युत वदला नृपा ॥७॥
५९७
धृतराष्ट्र म्हणे अक्रूरा, हा बोध । ऐकूनि आनंद वृद्धि पावे ॥१॥
बोध हा सर्वदा ऐकावासा वाटे । परी मज बाधे पुत्रस्नेह ॥२॥
अनावर माया वाटे ईश्वराची । लंघील तयाची इच्छा कोण ॥३॥
भूभारहरणा अवतार त्याचा । व्यापूनियां विश्वा अलिप्त तो ॥४॥
मार्गही तयाचे या जनीं अतर्क्य । करवितो तोच विविध कर्मे ॥५॥
फलेंही तयांचीं भोगवितो तोचि । दुस्तर तयाची नकळे माया ॥६॥
निवेदिती शुक अभिप्राय ऐसा । जाणिला नृपाचा अक्रूरानें ॥७॥
वासुदेव म्हणे राम-कृष्णांप्रति । जाऊनि तो कथी मथुरेमाजी ॥८॥
इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताच्या दशम स्कंधाचा पूर्वार्ध समाप्त.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
N/A
References : N/A
Last Updated : December 28, 2019
TOP