मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय १२ वा

स्कंध १० वा - अध्याय १२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१३७
निवेदिती शुक आहार एकदां । वनांत करावा इच्छी कृष्ण ॥१॥
यास्तव प्रभातीं उठूनि सत्वरी । सोडूनि आपुलीं वत्सें सर्व ॥२॥
शिंग वाजवूनि पाचारी मित्रांतें । गोप त्या संकेतें सिद्ध होती ॥३॥
घेऊनि निशाणें वेणु आणि वेत्र । कृष्णासमवेत जाती वनीं ॥४॥
गोड गोड बहु शिदोर्‍यांचीं शिंकीं । घेऊनियां स्कंधीं हर्षभरें ॥५॥
सहस्त्रावधि ते व्रजांतूनि वनीं । जाती मोद मनीं वासुदेवा ॥६॥

१३८
चरती धेनूंसवें वत्स । क्रीडामग्न होती गोप ॥१॥
कोणी गुंजा कांचमणी । कोणी कनकभूषणीं ॥२॥
सजले होत अत्यानंदें । वरी गुच्छही खोचिले ॥३॥
पुष्पें फळें तेंवी पर्णे । वनामाजी त्यां भूषणें ॥४॥
कोणी मयूरपिच्छांनीं । सजले कावही फांसूनि ॥५॥
कोणी शिदोर्‍या लपविती । शिंगें पांवेही पळविती ॥६॥
वासुदेव म्हणे क्रीडा । वर्णवे न त्यांची शुकां ॥७॥

१३९
सुगावा लागतां शोधार्थ जवळी । येतां देते दुरी फेंकूनियां ॥१॥
धांवतां ते मागें अन्येंचि उचलून । अन्यत्र फेंकून देतां दु:ख ॥२॥
रडकुंडीप्रति येतां ज्याची त्याची । आणूनियां देती हंसूनि वस्तु ॥३॥
कदा वनामाजी कृष्ण दूर जातां । पहावया शोभा, पाहूनि त्या ॥४॥
पैज मारिती त्या शिवेन मी आधीं । आलिंगूनि त्यासी रमती तेथें ॥५॥
वासुदेव म्हणे विचित्र स्वभाव । बालकांचे काय वर्णावे ते ॥६॥

१४०
कोणी मुरली वाजविती । कोणी शिंगेंचि फुंकिती ॥१॥
भ्रमर गुंजारवासम । काढिताती कोणी स्वन ॥२॥
ऐकूनियां पिकशब्द । काढिताती तोचि नाद ॥३॥
गगनपंथें उडतां पक्षी । त्यांची साउली पहाती ॥४॥
तिच्यासवेंचि धांवूनि । हर्ष पावताती कोणी ॥५॥
हंसगति मंद मंद । अनुकरणीं कोणी दंग ॥६॥
कोणी करिती बकध्यान । बकासन्निध बैसून ॥७॥
वासुदेव म्हणे नृत्य । कोणी दाविती शिखीस ॥८॥

१४१
मर्कटांचीं पुच्छें धरुनियां करीं । जाती वृक्षावरीं आधारें त्या ॥१॥
वांकुल्या तयासी कोणी दाविताती । अंग खाजविती तयांसम ॥२॥
कोणी तयांसम करुनि उड्डाण । लंघिताती जाण वृक्षशाखा ॥३॥
तीरावरी कोणी दर्दुरांसमान । डुंबताती जाण उदकामाजी ॥४॥
प्रतिबिंब कोणी पाहूनियां जळीं । वांकडी आपुलीं करिती तोडें ॥५॥
प्रतिध्वनि कोणी ऐकूनि आपुला । करिती कलहा क्रोधावेशें ॥६॥
वासुदेव म्हणे यथार्थत्वें कोण । करील वर्णन लीलांचें त्या ॥७॥

१४२
ब्रह्मवेत्त्यांसी जो भासे स्वयंप्रभ । सगुण स्वरुप भक्तां दावी ॥१॥
सामान्यांसी भासे सामान्य स्वरुपें । ऐसें रुप ज्याचें अलौकिक ॥२॥
कृष्णासवें ऐशा क्रीडले जे गोप । पावले सार्थक जन्मूनि ते ॥३॥
कष्टूनिही योगी ज्याचे चरणरज । पावती न तोच प्रत्यक्ष ज्यां - ॥४॥
खेळवी, होवूनि सवंगडी त्यांचा । भाग्यासी न तोटा गोपांच्या त्या ॥५॥
वासुदेव म्हणे महत्पुण्याविण । गोपांसम धन्य कोण होई ॥६॥

१४३
शुकमहामुनि करिती कथन । क्रीडा ते पाहून दु:ख दुष्टां ॥१॥
‘अघासुर’ तेथें आला एक दैत्य । तयाचें सामर्थ्य न वर्णवे ॥२॥
देवांतेंही भय वाटे बहु त्याचें । प्राशूनि सुधेतें अमरत्व ज्यां ॥३॥
अघमरण ते इच्छिती यास्तव । कृष्णवधास्तव तोचि येई ॥४॥
पूतना-बकाचा बंधु तो कनिष्ठ । सूडभाव दुष्ट धरी मनीं ॥६॥
भावंडांस्तव ही देतां तिलांजली । होतील मृतचि सर्व गोप ॥७॥
वासुदेव म्हणे मूढ इच्छी एक । परी भगवंत अन्य इच्छी ॥८॥

१४४
चिंतूनि यापरी अजगर होई । विस्तार त्या पाहीं चार कोश ॥१॥
मार्गी येऊनियां राहिला तो स्वस्थ । विस्फारुनि मुख गुहेसम ॥२॥
पर्वतचि देह जिव्हा राजपथ । होता, अधरोष्ठ भूमीवरी ॥३॥
ऊर्ध्व तो भिडला मेघमंडळासी । दाढा त्या भासती गिरिशृंगें ॥४॥
श्वासोच्छ्‍वास उष्ण दुर्गंधसंयुक्त । वणवाचि नेत्र भासताती ॥५॥
विस्मयकारक शोभा ती वनींची । भासली गोपांसी आकृति ते ॥६॥
वासुदेव म्हणे भासे त्यां सादृश्य । वर्णिती तैं गोप अजगरा ॥७॥

१४५
अजगरासम करुनि रुपक । वर्णिती त्या गोप आश्चर्यानें ॥१॥
अन्य निवेदिती नव्हे हें रुपक । सर्पचि प्रत्यक्ष विशाल हा ॥२॥
परी आम्हां भय काळाचेंही नसे । रक्षील आम्हांतें बाळकृष्ण ॥३॥
बोलती यापरी वत्सांसवें गोप । पाहूनि कृष्णास करिती हास्य ॥४॥
वाजवीअ टाळ्या अघाच्या ते मुखीं । आक्रमीत जाती निजपंथ ॥५॥
वासुदेव म्हणे आतां निवारण । अशक्यचि जाण कृष्णातेंही ॥६॥

१४६
सुदैवें कृष्णाची धरुनियां आशा । मिटिलें न मुखा अघासुरें ॥१॥
अभयद कृष्ण चिंती हे प्रारब्धें । वशचि मृत्यूतें अद्य झाले ॥२॥
मजवीण त्राता नसे कोणी यांसी । यास्तव प्राप्तचि संरक्षण ॥३॥
चिंतूनि यापरी योजूनि उपाय । प्रवेशे केशव वदनीं स्वयें ॥४॥
आतां काय होई पहावें म्हणून । देव मेघांतून अवलोकिती ॥५॥
वासुदेव म्हणे देव चिंताकुल । जाहले व्याकुळ अज्ञानानें ॥६॥

१४७
कृष्ण जातां दैत्यमुखीं । देव आक्रोश करिती ॥१॥
हर्षिन्नले कंसादिक । अघबांधवांसमेत ॥२॥
कृष्ण जातांचि वदनांत । दैत्य मिटूं पाहे मुख ॥३॥
वेगें वाढला तैं कृष्ण । भरले अघाचें वदन ॥४॥
अंतीं दाटला घशांत । कासावीस होई अघ ॥५॥
प्राण कोंडूनियां गेले । नेत्र बाहेरी पातले ॥६॥
अंतीं मस्तक फोडूनि । गेले प्राण ते निघूनि ॥७॥
वासुदेव म्हणे दुष्ट । ऐसा जाहला विमुक्त ॥८॥

१४८
अघाच्या उदरीं कोंडूनियां प्राण । गोपही मरुन पडले होते ॥१॥
धेनु, वत्सांसवें गतप्राण होती । वांचवी तयांसी कृपाबळें ॥२॥
अमृतदृष्टीनें साधूनि तें कार्य । पातला बाहेर तयांसवें ॥३॥
अघप्राणज्योति सर्वत्र फांकली । एकत्र ते झाली तयावेळीं ॥४॥
कृष्णमुखामाजी देवांच्या समक्ष । प्रवेशली ज्योत आश्चर्य हें ॥५॥
वासुदेव म्हणे अघासुरवधें । वर्षिती सुमनें हर्षे देव ॥६॥

१४९
अप्सरांचें नृत्य गंधर्वांचें गान । कोंदलें गनन वाद्यनादें ॥१॥
वसिष्ठादि मुनि स्तवन मांडिती । जयजयकार होती स्वर्गी बहु ॥२॥
सत्यलोकीं ब्रह्मा नाद तो ऐकूनि । येई तयास्थानीं पहावया ॥३॥
गौरव हरीच पाहूनि तोषला । विस्मय पावला अंतरांत ॥४॥
वासुदेव म्हणे अघासुर मुक्त । पाहूनियां गोप चकित होती ॥५॥

१५०
पंचमाब्दीं वृत्त केलें हें हरीनें । षष्ठ वर्षी झालें विहित गोपां ॥१॥
सायंकाळीं गोपबाळांनीं कथिलें । घरोघरी झालें नवल तदा ॥२॥
शुकमहामुनि बोलती हा राजा । खेळ श्रीहरीचा नवलकारी ॥३॥
हृदयीं प्रल्हादें प्रतिमा स्थापिली । मोक्षश्री लाभली तेणें तया ॥४॥
मग ज्याच्या मुखीं प्रवेशला स्वयें । कां न फळा यावें भाग्य त्याचें ॥५॥
निवेदिती सूत शौनकादिकांसी । हर्षे परीक्षिती ऐकूनियां ॥६॥
वासुदेव म्हणे अत्यानंदें राव । प्रश्न करी काय तोचि ऐका ॥७॥

१५१
पंचम वर्षीचें वृत्त षष्ठ वर्षी । कथिलें हे कैसी नवलकथा ॥१॥
ईश्वरीमाया, हे असावीसें वाटे । एरव्हीं हें कैसें घडे तरी ॥२॥
अपराधी आम्हीं क्षत्रिय विप्रांचे । महानीचता ते तेणें आम्हां ॥३॥
परी कथामृत पाजूनियां आम्हां । मुने, ही श्रेष्ठता दिधली तुम्हीं ॥४॥
परीक्षितिप्रश्न शुक न ऐकती । गुंग त्यांची मति कृष्णध्यानें ॥५॥
समाधींत मग्न होते ते स्मरणें । कृष्णकथागानें हरलें भान ॥६॥
वासुदेव म्हणे कांहीं वेळ जातां । रायाप्रति कथा कथिती शुक ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP