मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ४० वा

स्कंध १० वा - अध्याय ४० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४८०
अक्रूर म्हणे हे देवा, अनुग्रह । करीं, शरणागत जाणूनि मी ॥१॥
चराचरामाजी कार्ये जीं अनंत । होसी त्यां प्रेरक तूंचि एक ॥२॥
कृपेविण तव कोणीही न कांहीं । करुं शके पाहीं निश्चय हा ॥३॥
आद्यंतरहित तूंचि अविनाशी । नाभिकमलामाजी विरंची जो - ॥४॥
तेणें हें सकळ निर्मियेलें विश्व । महतत्त्वादिक कर्ता तूंचि ॥५॥
न जाणेचि तव महिमा ब्रह्माही । जाणतील केंवी इतर मग ॥६॥
मायामोहित न जाणूं शके तुज । प्रभो, तुझा तूंच रुपज्ञाता ॥७॥
दुर्घटचि ज्ञान तरी तव प्राप्ति । अशक्य भक्तासी नसे कांहीं ॥८॥
वासुदेव म्हणे उपासना हाचि । मार्ग आक्रूरासी रुचला बहु ॥९॥

४८१
उपासनामार्ग असती बहुत । सकल सत्ताधीश म्हणती योगी ॥१॥
स्थूल-सूक्ष्मशक्ति सकलही तूंचि । जाणूनि चिंतिती ब्रह्मनिष्ठ ॥२॥
वेदमार्गें बहु आचरिती यज्ञ । कर्ममार्गे जन जाती कोणी ॥३॥
सर्वसंगत्यागें चिन्मयस्वरुप । होऊनियां शांत ध्याती ज्ञानी ॥४॥
पंचरात्रमार्गे वैष्णव ते जाती । पाशुपतमार्गी रमती शैव ॥५॥
अन्यदेवताही कोणी भजताती । अंतीं पावताती सकळ तुज ॥६॥
प्रत्यक्षाप्रत्यक्ष सर्वही सरिता । आश्रय सिंधूचा घेती जेंवी ॥७॥
वासुदेव म्हणे सकलही मार्ग । प्राप्त होती तुज देवा, अंतीं ॥८॥

४८२
त्रिगुण मायेचे खेळ ब्रह्मयादिक । होतां ते निवृत्त लाभसी तूं ॥१॥
व्यापूनिही विश्वा, स्पर्शे न तें तुज । माया करी नाच नवल ऐसें ॥२॥
सच्चित्सुखज्ञानापुढती मायेचा । प्रभाव न कदा चाले कांहीं ॥३॥
सर्वान्तर्यामी तूं राहूनियां साक्षी । तेणेंचि तुजसी विकार न ॥४॥
अमर्याद तुझें बल देवांहूनि । वंदन चरणीं घेईं माझें ॥५॥
वासुदेव म्हणे मायातीत ईश । कार्य देवादिक मायेचें त्या ॥६॥

४८३
वर्णवे न देवा, विराटस्वरुप । अग्नि तव मुख, चरण पृथ्वी ॥१॥
सूर्यचि त्वन्नेत्र, आकाश ते नाभि । दशदिशा तेचि कर्ण तव ॥२॥
सत्यलोक तेंचि मस्तक, इंद्रादि । बाहु, तेंवी कुक्षि सकल सिंधु ॥३॥
पंचप्राण वायु, वृक्ष-वनस्पति । रोम, तैं शोभती केश मेघ ॥४॥
अस्थि-नखें गिरि, देवा, दिन-रात्र । स्पष्ट उघडझांप, तव नेत्रांची ॥५॥
गुह्येंद्रिय ब्रह्मा, वृष्टि तेंचि वीर्य । कथी वासुदेव अक्रूरोक्ति ॥६॥

४८४
असंख्यात जीव जगीं । स्वैर विहार करिती ॥१॥
शक्ति तयांची अत्यल्प । कोणाचा न कोणा बोध ॥२॥
सर्वज्ञ तूं परी देवा । जाणतोसी सकल जीवां ॥३॥
सान-थोर इंद्रादिक । जेंवी सागरांत मत्स्य ॥४॥
किंवा मशकोदुंबरी । तेंवी क्षुद्रता त्यां खरी ॥५॥
तुझें अनंत सामर्थ्य । तुज शरण येणें योग्य ॥६॥
मत्स्यादिक अवतार । तव लीलाचि केवळ ॥७॥
अवतारलीला गाती । तेचि तरुनियां जाती ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसा । जनीं प्रभाव ईशाचा ॥९॥

४८५
प्रलयसागरी होऊनियां मत्स्य । रक्षी जो विश्वास नमन तया ॥१॥
हयग्रीवरुपें मधु-कैटभातें । वधी जो तयातें नमन माझें ॥२॥
मंदराद्रि, पृष्ठीं घेई कूर्मरुपें । वंदन तयातें असो सदा ॥३॥
वराह, नृसिंह रुपें हीं जयाचीं । नमस्कार त्यासी असो माझा ॥४॥
व्यापियेलें विश्व होऊनि वामन । सर्वदा वंदन असो तया ॥।५॥
उन्मत्त क्षत्रियसंहारक रामा । करितों वंदना तुजसी भावें ॥६॥
दुष्ट दशकंठ वधिला श्रीरामें । नमस्कार प्रेमें करितों तया ॥७॥
वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्नादि । नमस्कार त्यांसी करितों भावें ॥८॥
दैत्या दानवांसी मोहकर्ता बुद्ध । दुष्टसंहारक कलंकीही ॥९॥
वासुदेव म्हणे अक्रूर त्यां वंदीं । धरुनियां चित्तीं नम्रभाव ॥१०॥

४८६
देवा, तव मायामोहित हा जीव । चिंतूनि विषय विसरे तुज ॥१॥
दूर दूर तेणें तो तुझ्यापासूनि । पुत्र, दारा, मनीं एक त्याच्या ॥२॥
स्वप्नतुल्य सत्य मानूनि पसारा । हे कृपासागरा, भ्रमलों मीही ॥३॥
मानीव तुच्छ हे असूनि विषय । अव्हेरिलें सत्य शाश्वत तें ॥४॥
शैवालाच्छादित निर्मल उदक । त्यागूनियां मूढ अज्ञानानें -॥५॥
मृगजळ इच्छी, तैसी माझी स्थिति । त्यागूनि तुजसी रमलों एथें ॥६॥
काय हें अज्ञान, मज अविवेकें । ग्रासिलें, फलांतें इच्छी मन ॥७॥
वासुदेव म्हणे संयम मनाचा । न होईचि, साचा, अक्रूरोक्ति ॥८॥

४८७
पद्मनाभा, अद्य पातली पर्वणी । दुर्लभ चरणीं शरण आलों ॥१॥
शेषशयना, हें दर्शन नयनें । लाभतें कृपेनें भाग्य ऐसें ॥२॥
संसारविमुक्तिसमय जैं येई । तदाचि हे होई कृपा देवा ॥३॥
यास्तव विश्वेशा, शरण मी तुज । ज्ञानमय रुप से तुझें ॥४॥
कर्तुं वा अकर्तुं अन्यथा वा कर्तुं । देवा, समर्थ तूं एकमात्र ॥५॥
अंतर्बाह्य सर्व विश्व हें भरुनि । उरलासी जनीं तूंचि एक ॥६॥
तुझ्याचि स्वरुपीं वसती हीं भूतें । तूंचि इंद्रियांतें संयमीसी ॥७॥
वैकुंठनायका, शरण मी तुज । संरक्षूनि मज मुक्त करीं ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसी आक्रूरोक्ति । वसो हरिपदीं नम्र भाव ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP