२७७
निवेदिती शुक तया अपराण्हीं । क्षुधाकुल वनीं होती गोप ॥१॥
मागती ते कांहीं कृष्णाप्रति तदा । स्मरण गोविंदा स्त्रीभक्तांचें ॥२॥
विप्रस्त्रियांवरी व्हावा अनुग्रह । वदला यास्तव गोपालांसी ॥३॥
आंगिरसयज्ञ जवळीच विप्र । करिताती, तेथ जावें सुखें ॥४॥
स्वर्गलाभास्तव ज्ञात्यांचा त्या यज्ञ । निवेदावें नाम बलरामाचें ॥५॥
आम्हांस्तव अन्न मागावें तयांसी । ऐकूनि तैसेंचि करिती गोप ॥६॥
वासुदेव म्हणे यज्ञस्थानीं गोप । येऊनि विप्रांस वंदिताती ॥७॥
२७८
साष्टांग नमूनि म्हणती आम्हीं गोप । धाडिलें आम्हांस राम-कृष्णें ॥१॥
सन्निधचि दोघे चारिताती गाई । क्षुधा तयां देई पीडा बहु ॥२॥
मागती ते अन्न, विप्रहो, तुम्हांसी । येईल मनासी तरी द्यावें ॥३॥
दीक्षितान्नें दोष नसे या यज्ञांत । राम-कृष्णां तोष द्यावा तरी ॥४॥
वासुदेव म्हणे गोपवचनासी । विप्र दुर्लक्षिती स्वर्गेच्छेनें ॥५॥
२७९
तुच्छ स्वर्गसौख्यास्तव ते कष्टती । परी न जाणती सर्वाधारा ॥१॥
मूढ अभिमानी विप्र अहंमन्य । नव्हतें त्यां ज्ञान श्रीकृष्णाचें ॥२॥
राम-कृष्णांसी ते लेखिती सामान्य । यास्तव अमान्य करिती शब्द ॥३॥
होय, नाहीं, कांहीं बोललेचि नाहीं । निराश त्या ठायीं गोप तदा ॥४॥
अंतीं सर्व वृत्त कथिती कृष्णासी । धीर देई त्यांसी यदुनाथ ॥५॥
देव म्हणे धैर्य सोडूं नये कदा । प्रयत्न सर्वदा करणें योग्य ॥६॥
विप्रस्त्रियांसी जा निवेदा हें वृत्त । लाभेल तुम्हांस अन्न तेथें ॥७॥
वासुदेव म्हणे स्त्रियांचीं त्या भक्ति । जाणूणि श्रीपति वदला ऐसें ॥८॥
२८०
मित्रहो, विप्रांच्या स्त्रिया मजवरी । करिती अंतरीं प्रेम बहु ॥१॥
लोकोत्तर भक्ति जाणावी तयांची । मनानें एथेंचि वास त्यांचा ॥२॥
ऐकूनि तें गोप जाती तयास्थानीं । विप्रस्त्रिया त्यांनीं अवलोकिल्या ॥३॥
विविधालंकारभूषित त्या होत्या । गोप वंदिती वनीं त्यां अत्यादरें ॥४॥
प्रार्थिती आमुची ऐकूनि घ्या वाणी । सन्निधचि वनीं कृष्ण आला ॥५॥
पाठविलें तेणें आम्हांसी या स्थानीं । क्षुधार्त तो वनीं दूर येतां ॥६॥
गोपमेळा असे तयाच्या सन्निध । अन्न द्या तयास हेचि इच्छा ॥७॥
वासुदेव म्हणे विप्रस्त्रियांप्रति । यापरी कथिती वृत्त गोप ॥८॥
२८१
समीप पातला हरी ऐकूनि हें वृत्त ॥
विप्रस्त्रिया अत्यानंदें संभ्रमित चित्त ॥१॥
कृष्णदर्शनासी होत्या उत्सुक त्या मनीं ॥
इष्ट वृत्तातें वेधिलें मानस गोपांनीं ॥२॥
चतुर्विध अन्नपात्रें करुनियां सिद्ध ॥
सरिता धांवती जेंवी भेटाया सिंधूस ॥३॥
निवारितांही आप्तांनीं तयां बहुपरी ॥४॥
कथा ऐकूनियां बहु आकृष्ट त्या नारी ॥५॥
वासुदेव म्हणे शामसुंदर मूर्तीचें ॥
दर्शन घडावें हेचि इच्छा, होती त्यांतें ॥५॥
२८२
पती आप्त जरी निवारिती त्यांतें । ढळे न तयांचें चित्त परी ॥१॥
घेऊनियां अन्न कालिंदीतटाकीं । पातल्या भेटीची उत्कंठा त्यां ॥२॥
पल्लवित वृक्षातळीं अशोकाच्या । प्रेमें पाहती त्या राम-कृष्णां ॥३॥
सभोंवती त्यांच्या होते गोपबाळ । करिती संचार इतस्तत: ॥४॥
वासुदेव म्हणे रुप तें कृष्णाचें । वर्णिती शुक जें ऐका तेंचि ॥५॥
२८३
पिंवळा पीतांबर वनमाला कंठीं । मस्तकीं शोभती मयुरपिच्छें ॥१॥
सर्वांगासी गेरु कर्णांत पल्लव । सांवळी सुंदर मूर्ति ऐसी ॥२॥
जणु विश्वकंद घेई नटवेष । भासलें स्त्रियांस तयावेळीं ॥३॥
गोपस्कंधीं एका होता हस्त एक । भ्रमवी अंबुज अन्य हस्तें ॥४॥
कर्णांतही त्याच्या खोंचिलीं कमळें । कपोलीं कुरळे रुळती केश ॥५॥
मुखारविंदींही मंदहास्य छटा । अनुपम शोभा त्या रुपाची ॥६॥
वासुदेव म्हणे श्रवणेंचि धन्य । होत्या, त्यां दर्शन घडलें अद्य ॥७॥
२८४
कृतार्थ नयन पाहूनि प्रभूसी । रुप सांठविती हर्षे चित्तीं ॥१॥
दीर्घकाल मनोमय आलिंगनें । त्रिविधतापांतें करिती दूर ॥२॥
श्रांत जीवा गाढ निद्रेनें विश्रांति । आलिंगनें शांति तेंवी तया ॥३॥
सर्वांसी त्यजूनि पातल्या या ज्ञानें । सुहास्य वदनें वदला कृष्ण ॥४॥
ललनानों, तुम्हीं जाहलांती धन्य । पातलांती श्रम घेऊनियां ॥५॥
दर्शनेच्छा तुम्हां जाणा हें भूषण । करा निवेदन कार्य कांहीं ॥६॥
वासुदेव म्हणे निवारुनि पाश । पातल्या, प्रभूस हर्ष तेणें ॥७॥
२८५
कृष्ण बोलला स्त्रियांसी । अद्वितीय ऐसी भक्ति ॥१॥
पाहूनियां तोष वाटे । ज्ञात्यालागीं हेंचि रुचे ॥२॥
कल्याणार्थ निरपेक्ष । होती तेचि जनीं श्रेष्ठ ॥३॥
चिन्मय मी सर्वव्यापी । प्रेम माझें ज्ञात्यांसीचि ॥४॥
सर्व प्रीतीचें मी मूळ । देह पुत्र, वित्त, कुळ ॥५॥
विप्रस्त्रियांनो, कृतार्थ । जाहलांती तुम्हीं अद्य ॥६॥
आतां यज्ञमंडपांत । जाऊनि व्हा कर्मरत ॥७॥
गृहिणीविण गृहस्थासी । नसे कर्मामाजी सिद्धि ॥८॥
वासुदेव म्हणे कृष्ण । ऐसें बोलला वचन ॥९॥
२८६
ऋषिपत्न्या कृष्णवचन ऐकूनि । दु:खित होऊनि वदल्या तया ॥१॥
ऐसें हे निष्ठुर भाषण श्रीकृष्णा । तुजसी शोभेना दयावंता ॥२॥
संपादितो भक्त शाश्वत पदासी । ऐसें वेदामाजी कथिलेंसी त्वां ॥३॥
ऐकूनि तें आलों या स्थळीं धांवूनि । आपुलीचि वाणी सत्य करीं ॥४॥
स्वकीय न कोणी देवा, आतां प्रिय । यास्तव आश्रय केला तुझा ॥५॥
त्वत्पादपंकजांतूनि जी गलित । तुलसीमाला तीच लाभों आम्हां ॥६॥
भूषवो ते केश आमुचे ही इच्छा । वासुदेव वाचा पुढती कथी ॥७॥
२८७
जाऊनियां आम्हां काय लाभ आतां । स्वीकार आमुचा करील कोण ॥१॥
सकलही आप्त त्यागितील आम्हां । सहजचि अन्यां मग न दोष ॥२॥
षड्रिपुमर्दना, यास्तव आम्हांसी । सदया, चरणांची घडो सेवा ॥३॥
स्वर्गही न आम्हां रुचे आतां देवा । सर्वस्व केशवा, तूंचि आम्हां ॥४॥
वासुदेव म्हणे यास्तव अव्हेर । न करीं साचार कथिती स्त्रिया ॥५॥
२८८
ऐकूनियां कृष्ण बोलला तयांसी । चिंता न निंदेची धरा कांहीं ॥१॥
कर्मासी ज्या माझें लाभे अनुमोदन । दोष तया कोण लावी जगीं ॥२॥
देवही नभांत स्तवन करिती । रुचे न तुम्हांसी दूर जाणें ॥३॥
परी देहसंगें सुख न शाश्वत । माझ्या ठाईं चित्त लीन करा ॥४॥
तेणेंचि चिन्मयस्वरुपाची प्राप्ति । होईल तुम्हांसी निश्चयानें ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें स्त्रिया । गेल्या निजस्थळा आनंदानें ॥६॥
२८९
यज्ञमंडपामाझारी । स्त्रिया येतांचि माघारीं ॥१॥
कोणीही न तयां दोष - । देतां, होई पुढिल कार्य - ॥२॥
विप्र करिती, आनंदानें । यज्ञकार्य पूर्ण केलें ॥३॥
अन्न न्यावयासी सिद्ध । होतां घडलें एक वृत्त ॥४॥
राया, एका विप्रस्त्रीसी । कोंडूनियां ठेवी पति ॥५॥
कृष्णकथा तिज ज्ञात । होती पूर्वीचि गृहांत ॥६॥
चिंतनेंचि करुनि ध्यान । दिधलें तिनें आलिंगन ॥७॥
त्यागूनियां म्हणे ऐसी । तन्मयता अपूर्वचि ॥८॥
२९०
गोपांसवें वनीं चतुर्विध अन्न । सेवूनियां कृष्ण तुष्ट झाला ॥१॥
गोप-गोपी धेनू ऐशा करी तुष्ट । वाणी क्रिया रुप साधनें या ॥२॥
विप्रही पुढती पश्चात्तापदग्ध । धन्यता स्त्रियांस देती हर्षे ॥३॥
धिक्कार आपुल्या करिती ज्ञानाचा । नाहीं अधोक्षजा ओळखिलें ॥४॥
विरोधाही गेल्या झुकारुनि स्त्रिया । धन्य जन्मूनियां जाहल्या त्या ॥५॥
अनिवार माया आला हा प्रत्यय । गुरु आम्हीं विप्र मूढ झालों ॥६॥
केवळ भक्तीचि उद्धारक यांसी । व्यर्थ संसारादि असूनि आम्हां ॥७॥
वासुदेव म्हणे विप्र ते यापरी । चिंतिती अंतरीं निज दोष ॥।८॥
२९१
सत्यचि या स्त्रिया आम्हांहूनि धन्य । संदेह मनीं न उरला कांहीं ॥१॥
गृहधनासक्त पुरुष हे मूढ । जाणती न हित आपुलेंही ॥२॥
गोपमुखें आम्हां याचूनि कृष्णानें । सावधचि केलें उपकार हा ॥३॥
निरपेक्ष सदा संतुष्ट श्रीहरी । सर्व पूर्ण करी भक्तकाम ॥४॥
प्रयोजन तया नसतां याचिलें । कल्याणार्थचि हें निर्विवाद ॥५॥
चंचलही लक्ष्मी स्थिर ज्याच्या पदीं । मायाचि तयाची याचना हे ॥६॥
देश काल चरु पुरोडाशादिक । सकलही तोच नटला एक ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसा पश्चात्ताप । करिताती विप्र निजांतरीं ॥८॥
२९२
योगेश्वर हरि यदुवंशामाजी । अवतीर्ण आजी जाहलासे ॥१॥
ऐकूनिही ऐसें झालों मोहमग्न । कांताद्वारा धन्य परीं जन्म ॥२॥
सहवासें यांच्या जाहलों कृतार्थ । भक्तिसौख्यलाभ तेणें आम्हां ॥३॥
नारायणा, आतां घेईं नमस्कार । भ्रमतों साचार त्वन्मायेनें ॥४॥
स्वरुपासी तव अंतरलों तेणें । तुज अवमानिलें न जाणितां ॥५॥
क्षमा करीं देवा, जाणूनि अज्ञान । विनम्र होऊन वदले विप्र ॥६॥
संशय न येवो कंसासी म्हणोनि । दर्शनासी वनीं गेले नाहीं ॥७॥
वासुदेव म्हणे ऐशा कृष्णलीला । गातां धन्य झाला जन्म माझा ॥८॥