स्कंध १० वा - अध्याय ४२ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
५००
राजमार्गे ऐसे पुढती ते जातां । कुब्जा नामें तयां युवती भेटे ॥१॥
चंदनादि उटया घेऊनि ते दासी । कंसमंदिरासी जात होती ॥२॥
कंठ, वक्षस्थल, कटिभागीं वक्र । असूनियां वक्त्र रुचिर होतें ॥३॥
यास्तवचि कुब्जा नाम ते पावली । स्मित वनमाळी करुनि म्हणे ॥४॥
सुंदरी, तूं कोण, कोणाची हे उटि । घेवोनि कोणासी जासी कोठें ॥५॥
अर्पितां हे उटि आम्हां, त्वत्कल्याण । निश्चय हा जाण मनामाजी ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकूनियां कुब्जा । कथी अधोक्षजा निजवृत्त ॥७॥
५०१
सौकुमार्य, रुप, हास्य, मधुवाणी । कुब्जा अवलोकूनि मोह पावे ॥१॥
शाम-गौर अंगीं पीत-रक्त उटि । चर्चितां शोभती राम-कृष्ण ॥२॥
कृपाळु श्रीकृष्णदर्शनाचें फल । घडो हा विचार करी मनीं ॥३॥
मग स्वचरणीं दावूनि चरण । हनुवटी धरुन उचली कृष्ण ॥४॥
तदा ती क्षणांत पावे सरलत्व । लावण्य अपूर्व शोभूं लागे ॥५॥
कामातुर तदा होऊनि ते बोले । आसक्त मी झाल्यें तुझ्यावरी ॥६॥
विरह न आतां साहवे गोविंदा । सदनीं मुकुंदा, येईं माझ्या ॥७॥
वासुदेव म्हणे इच्छा हे प्रबल । धांव निरंतर पुढती घेई ॥८॥
५०३
रामादिकांच्या समक्ष । धरुनि कृष्णाचा पदर ॥१॥
प्रार्थी तयाप्रति कुब्जा । तदा हास्य अधोक्षजा ॥२॥
म्हणे पाहूनि आतिथ्य । चित्तीं पावलों संतोष ॥३॥
ओळखही तुझ्यावीण । एथें मम नसे अन्य ॥४॥
परी कार्य उरकूनि । पावें तुझिया सदनीं ॥५॥
ऐसें इच्छियेलें कुब्जे । मज कार्यार्थ जाऊंदे ॥६॥
ऐशा गोड शब्दें कृष्ण । करी तिचें समाधान ॥७॥
वासुदेव म्हणे देव । करी यापरी नवल ॥८॥
५०४
पुढती मार्गांत धनिक बहुत । राम-कृष्णां भेट अर्पिताती ॥१॥
पुष्पमाला, उटया, तांबूल अर्पिती । आदरें पूजिती राम-कृष्णां ॥२॥
पाहूनि तयांसी कामातुर स्त्रिया । बेभान जाहल्या लावण्यें त्या ॥३॥
कृष्णरुपीं चित्त विधूनियां जाई । ताटस्थ्य त्यां येई चित्रासम ॥४॥
वासुदेव म्हणे मोहक मुरारी । जाई तेथें करी खेळ ऐसे ॥५॥
५०५
कंसधनुर्यागभूमीची चौकशी । करी हृषीकेशी पुढती हर्षे ॥१॥
जाऊनियां तेथें पाही श्रेष्ठ चाप । इंद्रधनुष्यास लाजवी तें ॥२॥
सुपूजित तेंवी संरक्षित होतें । जिंकूनि दूतांतें हरिलें कृष्णें ॥३॥
वामकरानें तें उचली सहज । लीलेनेंचि त्यास लावी गुण ॥४॥
इक्षुदंडासम पुढती ओढून । टाकिलें मोडून क्षणार्धांत ॥५॥
दणाणूनि जाती तदा दशदिशा । ऐकूनियां कंसा भय वाटे ॥६॥
वासुदेव म्हणे गोपींचा तो प्राण । आतां खेळ अन्य करी पहा ॥७॥
५०६
धनुर्भंग ऐसा पाहूनियां दूत । होऊनियां क्रुद्ध धांव घेती ॥१॥
राम-कृष्णांप्रति सैनिक । तदा चापखंड घेती दोघे ॥२॥
झोडपूनि त्याचि खंडें बहु दूत । यमसदनास धाडियेले ॥३॥
ऐकूनि तें कंस धाडी बहु सैन्य । यमाचें सदन तेंहीं गांठी ॥४॥
पुढती ते वीर मथुरा नगरी । पाहूनि स्वस्थळीं प्राप्त झाले ॥५॥
वासुदेव म्हणे तदा सायंकाळ । सकलां विषय तोचि होई ॥६॥
५०७
खचितचि कोणी म्हणती हे देव । करिती आश्चर्य विक्रमानें ॥१॥
राम-कृष्ण सुखें करुनि भोजन । हर्षित होऊन वरिती निद्रा ॥२॥
निवेदिती शुक राया, लीलामात्रें । विक्रम हे केले ऐकूनियां ॥३॥
भयाभीत कंस पावे निद्राभंग । दुश्चिन्हें तयास होती बहु ॥४॥
स्वप्नामाजी प्रेमें आलिंगी तो प्रेत । वाहन गर्दम होई त्याचें ॥५॥
रक्तपुष्पमालाधारी तो विवस्त्र । एकाकीचि तैल मदीं अंगा ॥६॥
वासुदेव म्हणे जागृतही कंस । दुश्चिन्हें सर्वत्र पाही बहु ॥७॥
५०८
मस्तकविहीन पाही प्रतिबिंब । पाही ते द्विविध दीपज्योति ॥१॥
सछिद्र आपुली अवलोकी छाया । न दिसती तया पादचिन्हें ॥२॥
अंगुलिप्रक्षेपें आयुर्घंटाध्वनि । न येईचि कर्णी तयांप्रति ॥३॥
वृक्षांवरी तया दिसे पीतवर्ण । ऐसें त्या मरण स्पष्ट दिसे ॥४॥
अन्यदिनीं मल्लयुद्धादि योजना । आणूनियां मना रमला मूढ ॥५॥
वासुदेव म्हणे आज्ञेसम दूत । सुसज्ज मंडप करिती यत्नें ॥६॥
५०९
झाडूनियां तेंवी सारवूनि स्थान । पुष्पित करुन शोभविलें ॥१॥
जागोजाग पुष्पमाळा विराजल्या । गुड्या उभारिल्या तोरणेंही ॥२॥
प्रेक्षकांकारणें आसनें मांडिलीं । तैसीं निनादलीं वाद्यें बहु ॥३॥
दुंदुभींचा नाद स्वस्थानीं शोभले । मध्यें विराजले कंसराज ॥४॥
सभोंवती त्याचें प्रधानमंडळ । दुश्चिन्हें अंतरे कांपे त्याचें ॥६॥
चाणूर, मुष्टिक तेंवी कूट, शल । वाद्यनादें मल्ल येती बहु ॥७॥
नंदादि गोपही अर्पूनियां भेटी । स्वस्थानीं बैसती येऊनियां ॥८॥
वासुदेव म्हणे कौतुक हरीचें । पहावयां ऐसे जमले जन ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : December 28, 2019
TOP