मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ४४ वा

स्कंध १० वा - अध्याय ४४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५२०
निवेदिती शुक करुनि संकल्प । राम-कृष्ण सिद्ध युद्धालागीं ॥१॥
मल्लयुद्धाप्रति जाहला प्रारंभ । ओढिताती हस्त एकमेक ॥२॥
पांयासी विळखे, जानूचें ताडन । आघात दारुण मस्तकांचे ॥३॥
लोटिती क्षणांत दोघे एकमेकां । तेंवी भ्रमवितां नवल वाटे ॥४॥
आंवळिती तेंवी आपटिती कोणी । उचलिती क्षणीं एकमेकां ॥५॥
कंठीं आंवळूनि ढकलिती क्षणीं । युद्धांत रंगूनि जाती ऐसे ॥६॥
वासुदेव म्हणे पराकाष्ठा ऐसी । शत्रु जिंकण्याची, करिती यत्नें ॥७॥

५२१
विषम मल्ल ते पाहूनियां स्त्रिया । दु:खी बहु झाल्या अंतरांत ॥१॥
म्हणती हीं बाळें कोठें सुकुमार । कोठें हे कठोर मल्ल दोघे ॥२॥
वांचतील केंवी प्राण या बाळांचे । अधर्म्य हें भासे युद्ध आम्हां ॥३॥
केंवी न वारिलें नृपासी मंत्र्यांनीं । युद्धावलोकनीं रमले केंवी ॥४॥
अन्याय हा केंवी रुचे सभासदां । त्याज्य ऐसी सभा सुजनां वाटे ॥५॥
धर्मज्ञें न ऐशा सभेप्रति जावें । बैसतां अन्यायें पाप माथां ॥६॥
वासुदेव म्हणे सामान्यही जन । अन्याय पाहून दु:खी होती ॥७॥

५२२
कोणी म्हणती हा श्रांत । वदन घर्मबिंदुयुक्त ॥१॥
कमलकलिकाचि भासे । जलबिंदुयुक्त साचें ॥२॥
म्हणती कोणी क्रुद्धनेत्र । परी करी स्मितहास्य ॥३॥
बळिरामही हा कैसा । शोभवितो वीरसभा ॥४॥
धन्य गोकुळ म्हणती । जेथें देव हे क्रीडती ॥५॥
गोप गोपिकाही धन्य । नित्य लीला त्या पाहून ॥६॥
वासुदेव म्हणे ज्ञाते । ओळखिती सद्‍गुणांतें ॥७॥

५२३
बोलताती कोणी आम्हीं भाग्यहीन । संकटीं दर्शन ऐशा आम्हां ॥१॥
खचितची पूर्वपुण्य त्या गोपींचें । पाहिलें कृष्णातें नित्य त्यांनीं ॥२॥
नित्य नूतनत्व वाटे या रुपासी । अतृप्तचि दृष्टि सर्वकाल ॥३॥
अनुपम बाई सौंदर्य दोघांचें । पाहिलें न ऐसें रुप आम्हीं ॥४॥
वासुदेव म्हणे यापरी ललना । त्या शेषशयना वर्णिताती ॥५॥

५२४
बोलती यापरी स्त्रिया आपसांत । शत्रुवध तोंच चिंती कृष्ण ॥१॥
वसुदेव-देवकी त्या संभाषणें । दु:खाकुलमनें खिन्न होती ॥२॥
पुत्रप्रेमें तयां लेखिती सामान्य । मुष्टयाघातें राम-कृष्ण दैत्यां ॥३॥
ताडूनि, तयांचा घालविती धीर । चाणूर प्रहार करी कृष्णा ॥४॥
परी गजावरी सुमनवर्षाव । व्हावा तो प्रकार श्रीकृष्णाचा ॥५॥
धरुनि तैं बाहु कृष्णानें सत्वरी । फिरविलें वरी गरगरां त्या ॥६॥
अंतीं आपटितां गेला त्याचा प्राण । वज्रमुष्टि राम ताडीतसे ॥७॥
तदा मुष्टिकही पावूनियां कंप । ओकूनियां रक्त मरुनि जाई ॥८॥
वासुदेव म्हणे जनांस्तव क्रीडा । करुनियां दुष्टां वधिलें अंतीं ॥९॥

५२५
‘कूट’ नामें मल्ल येतां रामावरी । वामकरें करी चूर्ण त्याचें ॥१॥
कृष्णावरी ‘शल’ धांवूनियां येतां । ताडूनि त्या लत्ता वधी कृष्ण ॥२॥
‘तोशलकालागीं’ पिंजिलें क्षणांत । पाहूनि तें मल्ल पळती सर्व ॥३॥
पाचारुनि गोपां, पुढती राम-कृष्ण । मल्लक्रीडा जाण आरंभिती ॥४॥
राजवाद्यनाद तेंवी स्वनूपुरें । रंगूनि, खेळले गोप बहु ॥५॥
कौतुक त्या वेळीं वाटलें सकलां । कंस मात्र झाला भयाकुल ॥६॥
वासुदेव म्हणे मृत्यु मूर्तिमंत । पाहूनि कोणास सौख्य होई ॥७॥

५२६
पाहूनि पराक्रम । कंस बोलला गर्जून ॥१॥
‘वाद्यनाद करा बंद’ । दूतहो, द्या इकडे लक्ष ॥२॥
नगराबाहेरी हे पोर । द्यावे घालवूनि दूर ॥३॥
सकल द्रव्य गोपालांचे । हरण करावें तें साचें ॥४॥
नंद आश्रय शत्रूसी । घडो बंदिवास त्यासी ॥५॥
चोरुनियां स्वपुत्रातें । संरक्षी, त्या वसुदेवातें ॥६॥
‘वधा तत्काळ या क्षणीं’ । पिता फितुर म्हणोनी - ॥७॥
परिवारासवें त्याचा । नाश करा, न चिंतितां ॥८॥
वासुदेव म्हणे दुष्ट - । भाव समयीं होती स्पष्ट ॥९॥

५२७
(कंसवध)
ऐकूनि तें क्रोध पावूनियां कृष्ण । करी तैं उड्डाण सिंहासनीं ॥१॥
तदा क्रोधें कंस फिरवी तरवार । झेंप सर्पावर पडली परी ॥२॥
गरुडासमचि धरी तो कंसातें । किरीट शिरातें त्यजूनि जाई ॥३॥
धरुनि तैं शिखा रंगभूमीवरी । ओढिला सत्वरी कंस कृष्णें ॥४॥
बैसूनियां बक्षीं ताडूनि वधिला । हाहा:कार झाला तयावेळीं ॥५॥
रात्रंदिन कंसा होता तोचि ध्यास । तेणें कृष्णरुप होई कंस ॥६॥
वासुदेव म्हणे वैरेंही दुर्जनें । जाती उद्धरुन ईश्वराच्या ॥७॥

५२८
कंक-न्यग्रोधादि बांधव कंसाचे । धांव घेती क्रोधे कृष्णावरी ॥१॥
तदा उचलूनि परिघ रामानें । वधिलें तयांतें क्षणामाजी ॥२॥
बांधवांसमेत कंसवध होतां । स्वर्गीच्या देवता तुष्ट होती ॥३॥
दुंदुभिनिनादें होई पुष्पवृष्टि । आनंद पावती सुजन तेणें ॥४॥
वासुदेव म्हणे दुष्टवध होतां । दु:ख त्यांच्या कांता करिती बहु ॥५॥

५२९
धांवूनियां स्त्रिया येती । पतिप्रेता कवटाळिती ॥१॥
निंदूनियां पतिकर्म । राम-कृष्णांचें स्तवन ॥२॥
करुनि, म्हणती यांचा द्वेष । करितां, सौख्य न कोणास ॥३॥
बोध करुनि त्यां कृष्ण । करवी त्याचें अंत्यकर्म ॥४॥
वासुदेव म्हणे आतां । ऐका पुढील वृत्तांता ॥५॥

५३०
निवेदिती शुक राया, वधूनि कंसासी ॥
मायबापांलागीं राम-कृष्ण सोडवीती ॥१॥
चरणीं मस्तक त्यांच्या ठेविती आदरें ॥
प्रेमभावें तयांप्रति साष्टांग वंदिलें ॥२॥
पाहूनि तें अलौकिक कर्म बालकांचें ॥
पुत्रभावना न शिवे त्यांच्या हृदयातें ॥३॥
आलिंगन न देतांचि जोडिताती कर ॥
म्हणताती बाळें साक्षात्‍ भासती ईश्वर ॥४॥
वासुदेव म्हणे उभी जोडूनियां कर ॥
राहिलीं पुढती, न हा वाटो चमत्कार ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP