मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ५ वा

स्कंध १० वा - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५१
इकडे गोकुळीं जातकर्मादिक । अत्यानंदें नंद करीतसे ॥१॥
ज्योतिर्विद ज्ञाते विप्र पाचारिले । समारंभें केलें मंगल स्नान ॥१२॥
सर्व अलंकार लेऊनि पुढती । जातकर्मादि तीं प्रथम करी ॥३॥
देव-पितरांची पूजा, नांदिश्राद्धें । करुनि आनंदें सिद्ध दाना ॥४॥
सालंकृत धेनु अर्पिल्या विप्रांस । संख्या दोन लक्ष, हर्षभरें ॥५॥
भरजरी वस्त्राच्छन्न रत्नयुक्त । तिळांचे पर्वत सप्त संख्य ॥६॥
वासुदेव म्हणे धेनु-धन-दानें । जाणा जातकर्मे गर्भशुद्धि ॥७॥

५२
अपवित्र भूमि काल जातां शुद्ध । स्नानें देह शुद्ध होई राया ॥१॥
क्षालनें तें वस्त्र, संस्कारांनीं गर्भ । इंद्रियासी तप शुद्ध करी ॥२॥
विप्रशुद्धि यज्ञें, धन-धान्य दानें । मन संतोषानें शुद्ध होई ॥३॥
वासुदेव म्हणे जीवात्म्याची शुद्धि । ब्रह्मविद्येनेंचि सहज होई ॥४॥

५३
आशीर्वाद देती विप्र । भाट बंदी तैं मागध ॥१॥
स्तुतिपाठ गाती हर्षे । गवई गाती मधुर गीतें ॥२॥
झटती चौघडे सर्वत्र । शृंगारिलें तैं गोकुळ ॥३॥
सडे चंदनाचे द्वारीं । ध्वज पताका झालरी ॥४॥
घरोघरीं ऐसी शोभा । तेल हळद धेनुअंगा ॥५॥
हार,माला मयुरपिच्छें । सजती वृष, धेनु, वत्सें ॥६॥
वासुदेव म्हणे झुली । शोभताती धेनूंवरी ॥७॥

५४
बहुमोल वस्त्रादिक उपायनें । गोप आनंदानें आणिताती ॥१॥
यशोदेसी पुत्र, ऐकूनि हे वार्ता । गोपींचिया चित्ता परमानंद ॥२॥
ओंटी भरायासी जावया सदनीं । नटूनि थटूनि सज्ज होती ॥३॥
कुंकुम काजळ कुंडलें कर्णांत । तैसेचि बहुत अलंकार ॥४॥
बहुमोल वस्त्रें ल्याल्या बहुरंगी । करीं जडावाचीं कंकणें तीं ॥५॥
पृथु श्रोणि, कुचकुंभही कंपित । शोभल्या मार्गांत ऐशा गोपी ॥६॥
वेण्यांतूनि त्यांच्या पुष्पांचा वर्षाव । लोल अलंकार शोभा देती ॥७॥
वासुदेव म्हणे स्मरणही ऐसें । होतां हृदय हें भरुनि येई ॥८॥

५५
प्रेमें येऊनियां गोपी सदनीं नंदाच्या ॥
आशीर्वाद देती कृष्णा, राजा हो आमुचा ॥१॥
पालन पोषण करीं आनंदें प्रजेचें ॥
तैल हरिद्रा उदक शिंपिती कौतुकें ॥२॥
एकमेकींवरी ऐसीं शिंपूनि उदकें ॥
हर्षभरें गौळिणी त्या गाती गोड गीतें ॥३॥
गोपही तया आनंदें दहीं दूध पाणी ॥
शिंपूनियां एकमेकां फांशिताती लोणी ॥४॥
नाचती आनंदें एकमेकां ढकलीती ॥
दह्या-दुधाच्या कर्दमीं ओढिती पाडिती ॥५॥
वासुदेव म्हणे कृष्णजन्माचा आनंद ॥
ऐकूनियां घडीभरी चित्त होई गुंग ॥६॥

५६
उदार नंदानें तयां सत्कारिलें । अर्पूनियां वस्त्रें अलंकार ॥१॥
सूत मागध तैं विद्योपजीवी जे । तयांतेंही नंदें सन्मानिलें ॥२॥
रोहिणी ते सालंकृत तया ठाईं । गोपिकांसी देई हळदीकुंकूं ॥३॥
ईश्वरकृपेनें पुत्रोत्कर्षास्तव । नंदानें अपूर्व धर्म केला ॥४॥
आनंदी आनंद तदा गोकुळांत । अभिवृद्धि होत धन-धान्याची ॥५॥
क्रीडाभुवन तें जाहलें लक्ष्मीचें । श्रीकृष्णवास्तव्यें क्षेत्र होई ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्णप्रेमामृत । प्राशूनियां तृप्त होऊं आतां ॥७॥

५७
पुढती एके दिनीं नंद मथुरेसी । कर द्यावयासी सहज जाई ॥१॥
नंद-वसुदेवप्रीति अलौकिक । वसुदेवा वृत्त कळलें तदा ॥२॥
नंदभेटीसी तो पातला प्रेमानें । आलिंगिती प्रेमें एकमेकां ॥३॥
सन्मानूनि नंदें बैसविलें त्यासी । कुशल पुशिती प्रेमभरें ॥४॥
राम-कृष्णस्मृति वसुदेवा होई । भरुनियां येई कंठ त्याचा ॥५॥
वासुदेव म्हणे पुढती नंदासी । वसुदेव कथी ऐका काय ॥६॥

५८
दादा, वार्धक्यानें पुत्राशा नव्हती । परी ईश्वराची कृपा झाली ॥१॥
तेणें तुज पुत्र लाभला ऐकूनि । समाधान मनीं झालें माझ्या ॥२॥
महा आवर्तांत पिपीलिकाप्राण । अत्यानंद त्यांसी व्हावा जेंवी ॥४॥
तेंवी भवावर्ती भेटतां तूं मज । नंदा, अत्यानंद जाहलासे ॥५॥
वासुदेव म्हणे वसुदेव प्रेमें । बोलला नंदातें पुढती ऐका ॥६॥

५९
जलप्रवाहांत काष्ठ । तृणालागीं, मिळतां वेग ॥१॥
स्थैर्य लाभे न तयांसी । पुनर्भेट अशक्यचि ॥२॥
तेंवी व्यवहारप्रवाहीं । मित्रभेट ते जाणावी ॥३॥
दर्शनही तें दुर्लभ । व्यवहारा ऐसा वेग ॥४॥
असो, वससी तूं जेथ । तेथ नसे कीं न्यूनत्व ॥५॥
निरोगित्व तृण, लता । असती विपुल कीं नंदा ॥६॥
वासुदेव म्हणे वत्स - । धेनु, कल्याणनिमित्त ॥७॥

६०
नंदा, पुत्र माझा प्रिय बलराम । मातेसवें क्षेम कथीं त्याचें ॥१॥
पुत्रासम त्याचें करिसी पालन । रोहिणीनंदन प्रिय तुज ॥२॥
त्रिवर्गे ते आप्त-इष्ट जरी सुखी । तरीच ते होती सौख्यप्रद ॥३॥
मजपासूनि हें सौख्य न कोणासी । लाभलें, मनासी तेणें खेद ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसी वसुदेवोक्ति । ऐकूनि तयासी वदला नंद ॥५॥

६१
बहु पुत्र तुझे वधिले कंसानें । खेद मज तेणें वाटें मनीं ॥१॥
वांचली ते गेली निघूनि आकाशीं । कां न अंतरासी दु:ख तुझ्या ॥२॥
वसुदेवा, दैवाधीन सुख-दु:ख । पुत्रादि वियोग, दैवानेंचि ॥३॥
परी आनुकूल्य लाभतां दैवाचें । विनष्ट जें भासे लाभे तेंही ॥४॥
यास्तव न करीं दु:ख वसुदेवा । ऐकूनि वसुदेवा तोष वाटे ॥५॥
म्हणे तो गोकुळीं चालले उत्पात । जा आतां त्वरित सदनीं नंदा ॥६॥
वासुदेव म्हणे सत्वरी तैं नंद । जुंपूनि शकट मार्ग क्रमी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP