स्कंध १० वा - अध्याय २६ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
३०९
निवेदिती शुक राया, गोप नंदाप्रति ॥
पाहूनि हरीचीं कृत्यें आनंदें बोलती ॥१॥
नंदा, कृष्णलीला ऐसी पाहूनि एकेक ॥
क्षणोक्षणीचि आमुचें गुंग होई चित्त ॥२॥
जन्म गोपांमाजी यातें कैसा हें कळेना
सप्त वर्षांचा बालक तोली गोवर्धना ॥३॥
गजशुंडेमाजी पद्मगिरी तैं शोभला ॥
जन्मापासूनीच याच्या अलौकिक लीला ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसें बोलूनियां गोप ॥
आठविती कृष्णलीला एकामागें एक ॥५॥
३१०
नेत्रही न पूर्ण उघडाया शक्ति । तदा पूतनेसी वधिलें येणें ॥१॥
तीन मासांचाचि असतां शकट । वधूनि कौतुक दावियेलें ॥२॥
संवत्सरांतचि तृणावर्तवध । दाबूनियां कंठ केला येणें ॥३॥
नंदा, उखळीसी बांधितां याप्रति । तुज स्मरतें कीं, घडलें जें तें ॥४॥
वनामाजी बक पिंजूनि टाकिला । करील या लीला अन्य कोण ॥५॥
वत्सासुराघातें पाडिलीं कपित्थें । तेंवी रामहस्तें गर्दभ तो ॥६॥
प्रलंबही रामाकरवीं वधिला । अग्नीही भक्षिला आम्हांस्तव ॥७॥
घोर कालियासी दावियेला धाक । कृष्णाचें कौतुक केंवी कथूं ॥८॥
कोठें बालकृष्ण, कोठे गोवर्धन । ईश्वरचि कृष्ण खचित वाटे ॥९॥
वासुदेव म्हणे ऐशापरी गोप । सद्भाव नंदास निवेदिती ॥१०॥
३११
गोपांप्रति नंद म्हणे द्यावें लक्ष । वदले जें गर्ग महामुनि ॥१॥
ऐकतां तें कृष्ण कोण तें कळेल । लवही नुरेल शंका मनीं ॥२॥
आजवरी बहु अवतार याचे । आतां कृष्णरुपें प्रगट झाला ॥३॥
गुण-कर्मासम बहु याचीं नामें । नंदा अंतर्ज्ञानें जाणतों मी ॥४॥
गोप-गोपींप्रति देईल हा सौख्य । वारील असंख्य घोर विघ्नें ॥५॥
प्रत्यक्ष हा ईश आश्चर्य न मानीं । जनांत पाहूनि नवल कर्मे ॥६॥
वासुदेव म्हणे गर्गोक्त माहात्म्य । निवेदूनि धन्य होई नंद ॥७॥
३१२
निवेदिती मुनि राया, हें ऐकूनि । संतोषले मनीं सकल गोप ॥१॥
नंद, कृष्णातेंही प्रेमें गौरवून । ईश्वरचि कृष्ण म्हणती स्वयें ॥२॥
अशक्य कांहींचि नसे ईश्वरासी । यास्तव तयासी भजणें योग्य ॥३॥
देवेंद्राचा दर्प हरिला कृष्णानें । पर्वत लीलेनें धरुनि करीं ॥४॥
राया, तोचि कृष्ण कृपा मजवरी । तेंवी तुजवरी करो नित्य ॥५॥
वासुदेव म्हणे प्रार्थूनियां शुक । रम्य कथामृत कथिती ऐका ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : December 18, 2019
TOP