मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय १६ वा

स्कंध १० वा - अध्याय १६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२०४
मुनीश्वर शुक बोलले रायासी । शुद्धता जलासी यावयातें ॥१॥
कालिया नागातें दयासागरानें । निज सामर्थ्यानें घालविलें ॥२॥
राव म्हणे मुने, कालियाचे वृत्त । निवेदा समस्त कृपावंता ॥३॥
कृष्णकथामृतें अतृप्त मी सदा । लीला त्या निवेदा मजलागीं ॥४॥
वासुदेव म्हणे व्यासप्रेममूर्ति - । शुक, निवेदिती परिसा वृत्त ॥५॥

२०५
राया, कालिंदीच्या विस्तीर्ण प्रवाहीं । एका खोल डोहीं वसे नाग ॥१॥
सळसळां जळ उसळे विषानें । त्या र्‍हदोल्लंघनें मरती पक्षी ॥२॥
उदकस्पर्शित वायूनेंही वृक्ष । पशु-पक्षी दग्ध होती विषें ॥३॥
ऐसी ते दुष्कृति पाहूनि नागाची । शासन त्या इच्छी यादवेंद्र ॥४॥
निजवस्त्रें कटी बांधूनियां घट्ट । शोभवी कदंब चढूनि कृष्ण ॥५॥
मातृमोचनार्थ कलश सुधेचा । नेतां गरुडाचा आश्रय तो - ॥६॥
पूर्वी वृक्ष झाला त्या सुधास्पर्शानें । विष न बाधलें नागाचें त्या ॥७॥
वासुदेव म्हणे भाग्य कदंबाचें । पादस्पर्श ज्यातें गोविंदाचा ॥८॥

२०६
गोविंद कदंबस्थित ठोकी दंड । कल्याण उदंड भक्तांतें तैं ॥१॥
विषारी डोहीं त्या तो जगज्जीवन । भक्तकल्पद्रुम उडी ठोकी ॥२॥
आघातें त्या लाटा चारशत हस्त । उसळल्या तेथ तीरावरी ॥३॥
रक्त-पीतवर्ण उदक विषारी । येई तीरावरी महावेगें ॥४॥
ऐशा त्या डोहांत गजासम क्रीडा । पाहूनि कालिया क्रोध पावे ॥५॥
कृष्णावरी तदा धांवला तो वेगें । शामसुंदरातें दंश करी ॥६॥
मर्मस्थळीं दंश करुनि वेढिलें । सर्वांग टाकिलें आंवळूनि ॥७॥
वासुदेव म्हणे निश्चेष्ट तैं कृष्ण । गोप घाबरुन करिती शोक ॥८॥

२०७
घाबरुनि गोप जाहले मूर्च्छित । उभ्या हंबारत दीन धेनू ॥१॥
दुश्चिन्हें गोकुळीं जाहलीं त्या वेळीं । धरित्री कांपली, उल्कापात ॥२॥
एकाकी श्रीकृष्ण बळिरामाविण । वनांत जाऊन धेनू चारी ॥३॥
हाय तया विघ्न पातलेंसे वाटे । नंद-यशोदेतें तदा दु:ख ॥४॥
कृष्णावीण प्राण कासावीस त्यांचे । दुर्विचार त्यांतें पीडा देती ॥५॥
अतर्क्य हरीची लीला न जाणती । शोधार्थ धांवती गोप-गोपी ॥६॥
वासुदेव म्हणे फोडिती ते टाहो । बलराम कां हो, म्हणे ऐसें ॥७॥

२०८
होता नि:शंकित राम । परी बोले न वचन ॥१॥
मर्दन तें कालियाचें । दावूं प्रत्यक्ष भक्तांतें ॥२॥
इच्छूनियां ऐसी लीला । करी तदा घनसांवळा ॥३॥
जाणूनि हे बळिभद्र । होता शांत आणि स्वस्थ ॥४॥
दु:खाकुल गोप-गोपी । कृष्णशोधार्थ धांवती ॥५॥
ध्वजांकुश पद्म वज्र - । चिन्हांकित पुलीनस्थ ॥६॥
येती सत्वरी त्या ठाईं । कृष्ण बुडाला ज्या डोहीं ॥८॥
वासुदेव म्हणे दृश्य । पाहूनि तें सकळां शोक ॥९॥

२०९
कालिया नागानें कृष्णासी वेष्टिलें । मूर्च्छित त्या केलें आंवळूनि ॥१॥
कृष्णा ! कृष्णा ! ऐशा मारितचि हांका । पाहवी बालकां मूर्च्छायुक्त ॥२॥
हंबां ! हंबां ! ऐशा धेनु हंबरती । दृश्य तें कोणासी दु:खद न ॥३॥
गोप-गोपिकांचा प्राणचि श्रीकृष्ण । दृश्यें त्या बेभान गोप-गोपी ॥४॥
प्रेम, मंदहास्य, भाषण मधुर । आठवूनि ऊर दाटे त्यांचें ॥५॥
सकलही दिशा शून्य होती त्यांसी । काय यशोदेची स्थिति वर्णूं ॥६॥
डोहांतचि देह टाकाया ती सिद्ध । वासुदेव रुद्धकंठ होई ॥७॥

२१०
पुत्रशोकभारें वेडावे यशोदा । आंवरिती तदा यत्नें गोपी ॥१॥
पूतनावधादि अलौकिक कृत्यें । आठवूनि तीतें देती धीर ॥२॥
नंदादि गोपही होती कासावीस । डोहांत जाण्यास धांव घेती ॥३॥
तदा बळिराम म्हणे भिऊं नका । नाहीं यदुनाथा लवही भय ॥४॥
सत्वरीचि आतां होईल तो मुक्त । त्यागूनियां शोक लीला पहा ॥५॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । आंवरी गोपांतें बलराम ॥६॥

२११
शोकाकुल गोप-गोपी । पाहूनियां कृष्ण चिंती ॥१॥
दु:ख निवारावें यांचें । मर्दूनियां कालियातें ॥२॥
चिंतूनियां यागश्वर । फुगवी आपुलें शरीर ॥३॥
तेणें वेदना नागासी । वेढे सहजचि सोडी ॥४॥
क्रोधें होऊनियां तांठ । राही फूत्कार करीत ॥५॥
श्वासोच्छ्‍वासासवें त्याच्या । येती विषाच्या झुळुका ॥६॥
जिव्हा अग्निज्वालेसम । तप्तलोहचि नयन ॥७॥
महा विषमय दृष्टि । जिभा लळलळां चाटी ॥८॥
वासुदेव म्हणे दुष्ट । ऐसा होई क्रोधाविष्ट ॥९॥

२१२
मस्तकीं सर्पाच्या करावें उड्डाण । हेतु हा धरुन गरुडापरी ॥१॥
सभोंवतीं त्याच्या वेगें फिरे कृष्ण । क्रोधें संभ्रमण तैसें नागा ॥२॥
भ्रमतां भ्रमतां श्रांत होई नाग । परी होतां शक्य उभवी फणा ॥३॥
अंतीं वांकवूनि तयाच्या मस्तकीं । उभा जगजेठी राही हर्षें ॥४॥
सकल कलांचे माहेर तो तेथें । आरंभी आनंदें रम्य नृत्य ॥५॥
आरक्त कमलासम ते चरण । मणि रक्तवर्ण शोभवी त्यां ॥६॥
कालियामस्तकीं पाहूनि तें नृत्य । जाहले हर्षित देवादीही ॥७॥
वासुदेव म्हणे मृदगांदि वाद्यें । वाजवीत तेथें येती देव ॥८॥

२१३
पुष्पवर्षाव करुनि प्रेमें । नैवेद्य अर्पूनि ॥१॥
स्तवन मांडिलें प्रभूचें । तदा ग्लानता नागातें ॥२॥
शत मस्तकें तयाचीं । लवलीं होतीं परी क्रोधी ॥३॥
दंशास्तव करी यत्न । फणा क्रोधें उभारुन ॥४॥
उभवी एकेक जे फडा । मारी तेथ कृष्ण लत्ता ॥५॥
ऐशा ठेंचतांचि फणा । रक्त तयाच्या वदना ॥६॥
वासुदेव म्हणे अंतीं । येई मूर्च्छना सर्पासी ॥७॥

२१४
कालियाचा दर्प हरितां हरिसी । आदरें पूजिती देवादिक ॥१॥
शेषशायी नारायण तदा भासे । गोप-गोपिकांतें तयावेळीं ॥२॥
ठेंचूनियां फणा ताणूनियां अंग । अति विकलांग होई नाग ॥३॥
नाका-तोंडातूनि गेलें बहु रक्त । आतां मरणोन्मुख जाहला तो ॥४॥
अंतीं जगताचा जाणूनियां स्वामी । तयाच्या चरणीं शरण जाई ॥५॥
कष्टमय त्याची पाहूनि ते स्थिति । भयाभीत होती स्त्रिया त्याच्या ॥६॥
वासुदेव म्हणे कालियाच्या स्त्रिया । धांवूनि त्या ठाया प्राप्त होती ॥७॥

२१५
वेणी-फणीही न आठवे तयांसी । सुटका पतीची अपेक्षूनि ॥१॥
अस्ताव्यस्त त्यांचे केश अलंकार । बालकें समोर होतीं त्यांच्या ॥२॥
जोडूनियां कर पदीं लोटांगण । घालूनि, स्तवन आरंभिती ॥३॥
वासुदेव म्हणे दयासागरासी । प्रार्थितां अपराधी तरती बहु ॥४॥

२१६
अवतार तुझा प्रभो, नारायणा । दुष्टनिर्दलनास्तव असे ॥१॥
अपराधी तेणें पतीतें शासन । करुनि, त्या धन्य धन्य केलें ॥२॥
शासनेम त्या दुष्ट होती दोषहीन । पूर्वकर्मे जन्म सर्पाचा या ॥३॥
लक्ष्मीनेंही ज्याच्या चरणलाभार्थ । आचरिलें तप दीर्घकाल ॥४॥
पतितासी त्याचि चरणांचा स्पर्श । लाभला हें भाग्य वाटे बहु ॥५॥
सुकृत तयाचें वाटे बहु थोर । लाभ हा साचार तेणें तया ॥६॥
सर्वव्यापक तूं प्रभो, सर्वाधार । घेईं नमस्कार आमुचा हा ॥७॥
वासुदेव म्हणे सर्वकारणासी । स्त्रिया वंदिताती वारंवार ॥८॥

२१७
नागस्त्रिया भावें वंदिती प्रभूसी । सर्वाधार तूंचि म्हणती देवा ॥१॥
उत्पत्ति, स्थिति तैं संहारकारका । खेळचि हा तुझा सकल विश्व ॥२॥
नाना स्वभावांचे निर्मूनियां प्राणी । क्रीडसी त्या स्थानीं अत्यानंदें ॥३॥
क्रीडासाहित्य ते सर्व जरी तव । सात्विक ते प्रिय तुजसी तरी ॥४॥
परी असंतुष्ट दुष्टही तुझेचि । स्वभावासमचि कर्म त्यांचें ॥५॥
स्वभावासदृश कर्म होतां दोष । काय त्यां जीवांस सांगें देवा ॥६॥
त्यांतही ते जरी होती अपराधी । एकवार त्यांसी क्षमा योग्य ॥७॥
वासुदेव म्हणे कालियाच्या स्त्रिया । यापरी माधवा स्तविती बहु ॥८॥

२१८
तामसस्वभावें मूढ अपराधी । देवा, पति त्यासी क्षमा करीं ॥१॥
शांतिस्वरुपा, तूं हो आतां दयाळ । कालिया व्याकुळ जाहलासे ॥२॥
कासावीस त्याचे प्राण हे केशवा । कटाक्ष फेंकावा तयावरी ॥३॥
स्त्रिया आम्हीं, देवा नित्य पराधीन । जाणूनि सज्जन करिती दया ॥४॥
यास्तव आमुतें देईं चुडेदान । करील पालन तवाज्ञेचें ॥५॥
वासुदेव म्हणे ईशाज्ञापालक । होई दु:खमुक्त निश्चयानें ॥६॥

२१९
परीक्षिता, शुक बोलले यापरी । स्तवितां अंतरीं तोष कृष्णा ॥१॥
कालियासी तदा दिधलें सोडून । सदय होऊनि पुढती उभा ॥२॥
ऐसा कांहीं वेळ लोटतां नागासी । हळु हळु शुधि प्राप्त होई ॥३॥
पुढती जोडूनि करांसी बोलला । दयेच्या सागरा, कृपा करीं ॥४॥
सर्प आम्हीं दुष्ट तामसी पीडक । स्वभाव सहज आमुचा हा ॥५॥
वासुदेव म्हणे स्वभावाचा त्याग । जाणावा अशक्य सामान्यासी ॥६॥

२२०
देवा, माता, पिता, इंद्रियें, शरीर । स्वरुपादि बल स्वाभाविक ॥१॥
स्वभावदोष तो कृपालेशावीण । त्यागूं शके कोण ऐसा जगीं ॥२॥
विरंचीही माया उल्लंघूं शकेना । बापुडया जीवांना केंवी शक्य ॥३॥
शांत उग्रभाव अर्पिसी ते तूंचि । सकल प्राण्यांसी जन्मासवें ॥४॥
मारावें कीं देवा, तारावें मजसी । चिंतीं मनीं तूंचि देवा, आतां ॥५॥
वासुदेव म्हणे दीन तो कालिया । पदीं नम्र झाला ऐशापरी ॥६॥

२२१
देव बोलले नागासी । आतां त्यागीं या स्थानासी ॥१॥
घेऊनियां आप्तगोत । गांठीं रमण्कद्वीप ॥२॥
जल निर्विष हें व्हावें । जनां उपयोगा यावें ॥३॥
सायं प्रात:काळीं नित्य । आठवील जो हें त्यास ॥४॥
होऊं नये सर्पबाधा । हेंही ध्यानीं असो सदा ॥५॥
स्नान तर्पण या डोहीं । करितां पापमुक्ति होई ॥६॥
पादस्पर्शे माझ्या तुज । नसे गरुडाचें भय ॥७॥
मान्य करुनि ते आज्ञा । सर्प गेला निजस्थाना ॥८॥
वासुदेव म्हणे जल । झालें मधुर निर्मल ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP