मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ३४ वा

स्कंध १० वा - अध्याय ३४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४०२
शुक निवेदिती नृपा । गोप इच्छिती एकदां ॥१॥
सरस्वतीच्या तीरासी । जावें शंभूच्या यात्रेसी ॥२॥
गाडया जुंपूनि क्षणांत । धरिला आनंदें तो मार्ग ॥३॥
येती अंबिकेच्या वनीं । झाले सुस्नात त्या स्थानीं ॥४॥
प्रेमें शंकर-पार्वती । पूजूनियां धन्य होती ॥५॥
देती ब्राह्मणांसी दानें । अर्पिती त्या षड्रसान्नें ॥६॥
नंद-सुनंदादि गोप । तदा राहिले व्रतस्थ ॥७॥
उदक प्राशूनि केवळ । वास त्याचि तीरावर ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसे । गोप भक्त ईश्वराचे ॥९॥

४०३
ऐसे ते गोपाळ होतां निद्रामग्न । भुजंग येऊन ग्रासी नंदा ॥१॥
भयाकुळ नंद मारी तदा हांका । कृष्णा, प्राण माझा संकटांत ॥२॥
ऐकूनियां गोप जाहले जागृत । पाहती नंदास गिळी सर्प ॥३॥
भयाभीत तदा होऊनि जळकीं - । काष्ठें त्या ताडिती क्रोधावेशें ॥४॥
परी तो नंदासी सोडीनाचि सर्प । अंतीं भगवंत धांव घेई ॥५॥
वासुदेव म्हणे भक्तरक्षणार्थ । अव्यक्त तो व्यक्त रुप घेई ॥६॥

४०४
येतांचि चरणें स्पर्शिलें सर्पासी । तदा त्या स्थळासी नवल होई ॥१॥
दिव्य कांतिमंत अलंकारयुक्त । जाहला प्रगट पुरुष तदा ॥२॥
जोडूनियां कर कृष्णाच्या पुढती । उभा राहतांचि पुशी कृष्णा ॥३॥
कोणरे, तूं ऐशा निंद्य योनीमाजी । पतन तुजसी केंवी झालें ॥४॥
वासुदेव म्हणे विनम्र भावानें । कथियेलें तेणें तेंचि ऐका ॥५॥

४०५
प्रख्यात मी देवा, विद्याधर एक । सुदर्शन मज नाम असे ॥१॥
रुप-धनमदें पावलो हे दशा । अंगिरा ऋषींचा नदला शाप ॥२॥
बैसूनि विमानीं हिंडतां आनंदें । कुरुप मुनीतें हंसलों गर्वे ॥३॥
उन्मत्त ती क्रिया पाहूनि शापिलें । योनींत लोटिलें ऐशा मज ॥४॥
राया, पश्चात्ताप आतां त्या कर्माचा । होऊनि तो वाचा वदला नम्र ॥५॥
देवा, तें शासन योग्यचि मजसी । होतें, त्या पुण्येंचि तव लाभ ॥६॥
क्षमिलें न मज हाचि महालाभ । विद्याधर वृत्त ऐसें कथी ॥७॥
वासुदेव म्हणे पुढती तो स्तुति । करी श्रीकृष्णाची भक्तिभावें ॥८॥

४०६
शरणागतांचा तूं त्राता । भक्तवत्सला भगवंता ॥१॥
भवभयग्रस्त जीवां । उद्धरिसी तूंचि देवा ॥२॥
तुझ्या चरणस्पर्शेचि । अद्य मम शापमुक्ति ॥३॥
देवा, सुमंगलधामा । सदा स्वरुपनिमग्ना ॥४॥
येती अनन्य शरण । करिसी तयांचें कल्याण ॥५॥
देवा, शरण मी तुज । करीं प्रभो, अनुग्रह ॥६॥
वासुदेव म्हणे नम्र । होई पदीं विद्याधर ॥७॥

४०७
निवेदिती वृत्त शुक हें नृपासी । सुदर्शन ऐसी करुनि स्तुति ॥१॥
प्रदक्षिणा घाली कृष्णासी तो प्रेमें । सादर वंदनें निघूनि जाई ॥२॥
केवळ चरणस्पर्शे हा प्रभाव । पाहूनि आश्चर्य करिती गोप ॥३॥
पुढती गोकुळीं जावया हे सिद्ध । विषय मार्गांत हाच तयां ॥४॥
वासुदेव म्हणे यापरी गोकुळीं । रामासवें करी लीला कृष्ण ॥५॥

४०८
निवेदिती मुनि राम-कृष्णावरी । गोपींच्या अंतरीं प्रेम बहु ॥१॥
एकदां ते दोघे घेऊनि गोपींसी । वनामाजी जाती क्रीडेस्तव ॥२॥
वेळ ती रात्रीची सुप्रसन्न चंद्र । चांदणें धवल पसरें वनीं ॥३॥
प्रफुल्लित वृक्ष, झंकार भृंगांचा । मंद सुगंधाचा वायु ॥४॥
हर्षे तया वनीं येती राम-कृष्ण । वस्त्रें शुभ्रवर्ण उभयांलागीं ॥५॥
चंदनाची उटी माळा मौक्तिकांच्या । तुलसीमालेचा डौल बहु ॥६॥
वासुदेव म्हणे आनंदें त्या दोघे । गायनीं रंगले मधुर कंठें ॥७॥

४०९
ऐकूनि तें गान गोपी जाहल्या तल्लीन ।
देहाचेंही राहिलें न तयांलागी भान ॥१॥
वस्त्रें वायुवेगें त्यांचीं जाहलीं शिथिल ।
वेण्यांतूनि कां न पुष्पें तींही गळतील ॥२॥
वेडावलें मन गानें सुचेनाचि कांहीं ॥
स्थळकाळ परिस्थिति स्मरण न राही ॥३॥
अकस्मात तया स्थानीं नामें शंखचूड ।
मत्तपणें येई एक कुबेराचा दूत ॥४॥
बलात्कारें उचलूनि नेई तो गोपींसी ।
निर्भय निर्लज्ज जाई उत्तर दिशेसी ॥५॥
वासुदेव म्हणे गोपी होऊनि सावध ।
घाबरती जेंवी धेनु आक्रमितां व्याघ्र ॥६॥

४१०
आक्रोशें त्या गोपी राम-कृष्णांप्रति । सोडवा म्हणती संकटीं या ॥१॥
अभय तयातें देती राम-कृष्ण । घेती उपटून ताडवृक्ष ॥२॥
राया, विश्वाधार आधार जयांसी । भय तयांप्रति कासयाचें ॥३॥
स्पर्शू न शके त्यां प्रत्यक्ष काळही । तेथें इतरांची कथा काय ॥४॥
राम-कृष्ण येती धांवूनि, हें यदा । दिसलें गुह्यका वनामाजी ॥५॥
तदा तो तत्काळ गोपींसी सोडून । करी पलायन परम वेगें ॥६॥
वासुदेव म्हणे चुकवूनि देवा । आश्रय इच्छावा अन्य कोठें ॥७॥

४११
गोपीरक्षणार्थ राही बळराम । धांवला श्रीकृष्ण मागें त्याच्या ॥१॥
ईशेच्छा कोणाच्या येईनाचि ध्यानीं । गांठिलेरं जावूनि शंखचूडा ॥२॥
मुष्टिघातें छेद केला मस्तकाचा । मणि मस्तकींचा काढी कृष्ण ॥३॥
तेजोमय मणि बळिरामाप्रति । आणूनियां अर्पी अत्यानंदें ॥४॥
वासुदेव म्हणे काय वस्तु कोठें । ज्ञान तें प्रभूतें अंतर्ज्ञानें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP