५६१
पाहूनि उद्धवा अक्रूर नव्हे हें । गोपींनीं जाणिलें तत्काळचि ॥१॥
आजानुबाहु तो पीतपीतांबर - । त्याला, रम्यनेत्र कमलासम ॥२॥
कमलमालाही विराजली कंठीं । कांति कुंडलांची वदनीं शोभे ॥३॥
कृष्णासम ऐसा कोण वेषधारी । चिंतितां अंतरीं कळलें दूत ॥४॥
निरोप घेऊनि कृष्णाचा हा येई । तदा एक्याठाईं जमल्या गोपी ॥५॥
पुढती नेऊनि उद्धवासी दूर । भाषण मधुर करिती तया ॥६॥
वासुदेव म्हणे आदरें आसनीं । तया बैसवूनि वदती प्रेमें ॥७॥
५६२
माता-पितरांच्या समाचारास्तव । पाठविलें काय कृष्णें तुज ॥१॥
मातृ-पितृस्नेहें बद्ध ते मुनीही । वाटे तो पाठवी तुज त्या कार्या ॥२॥
कंसवधें कृष्ण मथुरेचा राजा । येथें तींच आतां असती त्याचीं ॥३॥
अन्याचें स्मरण व्हावें ऐसें कोण । गोकुळीं त्या अन्य असे सांगें ॥४॥
वासुदेव म्हणे व्यवहारमीमासां । कथिती गोपिका उद्धवातें ॥५॥
५६३
वीरा, आप्तांविण लोकीं । नांवाचीच असे प्रीति ॥१॥
स्वार्थास्तवचि तें प्रेम । भासमात्र जगीं जाण ॥२॥
कार्य होतांचि मावळे । लंपटाचें प्रेम सारें ॥३॥
गुंजारव पुष्पावरी । भ्रमर किती काळ करी ॥४॥
सेवितांचि मकरंद । क्षीण होई अनुराग ॥५॥
स्वार्थी स्त्रिया वा पुरुष । जनीं वागती ऐसेंच ॥६॥
भोग पूर्ण होतां त्यांची । संपे मर्यादा प्रेमाची ॥७॥
वासुदेव म्हणे वेश्या । त्यागी दरिद्री पुरुषा ॥८॥
५६४
प्रजानुरंजन करील नृपाळ । प्रजा तावत्काळ मानी तया ॥१॥
विद्या संपादूनि शिष्य गुरुप्रति । त्यागूनियां जाती व्यवहार हा ॥२॥
दक्षिणा लाभतां घेऊनि निरोप । जाताती ऋत्विज यजमानाचा ॥३॥
फळें तोंचि पक्षी वृक्षावरी येती । पेटतां, वनासी त्यजिती मृग ॥४॥
गुंडाळी गांठोडें करुनि भोजन । अतिथि, हा जनव्यवहार ॥५॥
रोगमुक्त होतां वैद्याचें न काज । ऐसा परिपाठ सर्वत्रचि ॥६॥
वासुदेव म्हणे होऊनियां आर्त । टोंचूनि कृष्णास वदती गोपी ॥७॥
५६५
भ्रम्ररगीत
शुकमाहमुनि बोलले रायासी । आठविती गोपी कृष्णलीला ॥१॥
तन, मन, वाणी अर्पूनि चरणीं । कृष्णगुणगानीं दंग होती ॥२॥
लज्जा, शिष्टाचार सोडूनियां अंतीं । रुदन करिती मुक्तकंठें ॥३॥
वेडयासम गोपी मोकलूनि धाय । करिती हाय हाय कृष्णास्तव ॥४॥
इतुक्यांत एका पाहूनि भ्रमरा । बोलली सुंदरा एक गोपी ॥५॥
कृष्णसमागमध्यानीं ती निमग्न । वासुदेव ध्यान म्हणे द्यावें ॥६॥
५६६
प्रिय वल्लभाचा दूत म्हणे हा भ्रमर ॥
स्पर्शूनि चरणीं इच्छी व्हावा नमस्कार ॥१॥
साथिदार तूं ठकाचा मज नको स्पर्शूं ॥
तुज पाहूनि प्रमाण अन्य काय शोधूं ॥२॥
सपत्नीवक्षींची माला सेवूनि आलासी ।
तेचि कुंकुमाची उटी आरक्त कल्ल्यांसी ॥३॥
आळवीं त्या पौरस्त्रिया, आम्हीं वनवासी ।
शोभा करितील त्याचि यदुसभेमाजी ॥४॥
भ्रमरा, तूं मकरंद सेवूनि सुमन - ।
त्यागूनियां जासी, तेंवी वंचक तो कृष्ण ॥५॥
प्राशूनि अधरबिंब वार्ताही न घेई ।
अधरामृतानें त्याच्या वेड आम्हां लावी ॥६॥
गांवींही न परी त्याच्या स्थिति ही आमुची ।
तया कृतघ्नाची सेवा लक्ष्मी करी कैसी ॥७॥
वासुदेव म्हणे गोपी मानूनि आश्चर्य ।
निंदिती कृष्णासी प्रेम तयांचें अपूर्व ॥८॥
५६७
बाह्यात्कारी प्रेमा भुलली कमला । वंचना भ्रमरा, न करीं माझी ॥१॥
कृष्णाचें गीत कां आम्हांपुढें गासी । कथीं प्रतिष्ठा ती मथुरेमाजी ॥२॥
वारंवार ज्यांनीं अधरामृतातें । सेविलें स्त्रिया तें ऐकतील ॥३॥
पौरस्त्रियांचा तो पुरवील काम । ऐकतील गान त्याचि तव ॥४॥
म्हणसील जरी विव्हल तो कामें । यास्तव धाडिलें तुजसी तरी ॥५॥
कपटी तो नेत्रकटाक्षें वा हास्यें । कोणाही स्त्रियेतें मोहील तो ॥६॥
आवश्यकता त्या यास्तव न माझी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥७॥
५६८
जया सेविते कमला । तया काय मी अबला ॥१॥
परी भ्रमरा, तयातें । कथीं वचन जा माझें ॥२॥
दीनवत्सल जो तोचि । पावे श्रेष्ठत्व या जगीं ॥३॥
नको नकोही म्हणतां । कांरे स्पर्शिसी मस्तका ॥४॥
साधावया कार्यभाग । बहाणा तूं करिसी चांग ॥५॥
वंचकचि वंचकाचा । दूत जाणतें मी भुंग्या ॥५॥
कितीही तूं नाचलासी । तरी इंगित मजसी ॥७॥
आतां कळलेंरे भ्रृंगा । देईं सोडून या मार्गा ॥८॥
वासुदेव म्हणे गोपी । वदे काय तें ऐकाचि ॥९॥
५६९
म्हणसील ऐसा रोष कां आमुचा । कोण्या अपराधा शासन हें ॥१॥
तरी ऐकें आम्हीं त्यागूनि सर्वस्व । घेतलारे, छंद एक ज्याचा ॥२॥
पति, पुत्र, गृह तेंवी लोकलाज । नव्हे नव्हे स्वर्ग, मोक्षही तो - ॥३॥
त्यजिला, ज्यास्तव तेणें ऐसा घात । करुनि आम्हांस त्यागियेलें ॥४॥
भ्रमरा, हा काय अपराध सान । काय आम्हीं दीन म्हणूनि ऐसें ॥५॥
गोडीनें तयाच्या काय लाभ आतां । दुष्कृत्यें स्मरतां कांटा येई ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकावें नवल । जनांचा स्वभाव प्रगट होई ॥७॥
५७०
व्याधासम दुष्टें वधिलें वालीसी । केलें राक्षसीसी कर्णहीन ॥१॥
वामनावतारीं घेऊनिही पूजा । विरोचनात्मजा बद्ध केलें ॥२॥
ऐशा कृतघ्नासी न घडावें सख्य । गातों गुण तेंच भ्रामारा बहु ॥३॥
गुणगानें लाभ होईच न ऐसें । कळूनि आम्हांतें जडला छंद ॥४॥
आतां नाइलाज जाहला आमुचा । कथावें मधुपा काय तुज ॥५॥
धर्म अर्थ काम उलट क्रमानें । कृष्णकथागानें नष्ट होई ॥६॥
जाणूनिही आतां करवे न त्याग । जडतां लेशमात्र प्रेम त्याचें ॥७॥
असूनि नाहींसे होती राग-द्वेष । संसारीं नि:संग होती भक्त ॥८॥
वासुदेव म्हणे पाखरासम ते । स्वीकारिती सौख्यें भिक्षावृत्ति ॥९॥
५७१
जाणूनिही केंवी भ्रमलांती ऐसें । वदसी आम्हांतें भ्रमरा, परी ॥१॥
रम्यवाद्य-गीतें भुलती हरिणी । दु:ख परिणामीं विद्ध होतां ॥२॥
तैसीच आमुची अवस्था हे भृंगा । भुललो श्रीरंगा कपटें त्याच्या ॥३॥
विव्हळतों आतां येऊनि ते स्मृति । डागण्या आम्हांसी देऊं नको ॥४॥
अन्य कांहीं आतां गोष्ट कथीं भृंगा । नाहींतरी मार्गा आपुल्या धरीं ॥५॥
वासुदेव म्हणे भृंग पुनरपि । आला ऐसें गोपी चिंती मनीं ॥६॥
५७२
भ्रमरा, तूं कांरे आलासी फिरुनि । पाठविलें कोणी तुजसी सांगें ॥१॥
प्रियतमानेंचि धाडिलें म्हणसी । तरी, जें इच्छिसी तेंचि मागें ॥२॥
आग्रह करिसी तिकडे येण्याचा । काय श्रीवल्लभा न्यून तेथें ॥३॥
नित्य वक्षस्थलीं रमा वसे त्याच्या । मजविणें त्याचा न अडे घांस ॥४॥
पुशितें तितुकें कथीं आतां मज । झाला विद्याभ्यास हरिचा काय ॥५॥
वसे कीं तो क्षेम, नंद, गोकुळातें । कदा या दासीतें स्मरतो काय ॥६॥
अगरुचंदनासम सुगंधित । ऐसा कृपाहस्त कदाकाळीं - ॥७॥
आमुच्या मस्तकीं ठेवील तो काय । धन्य वासुदेव गातां गातां ॥८॥
भ्रमरगीत समाप्त
==========
५७३
निवेदिती शुक जाणूनि तें प्रेम । बोलला वचन कृष्णसखा ॥१॥
गोपींनो, हे वृत्ति कृष्णपदीं स्थिर । पाहूनि अंतर तुष्ट माझें ॥२॥
खचितचि तुम्हीं जाहलांती धन्य । करावें नमन तुम्हांप्रति ॥३॥
दान, धर्म, जप, वेदाभ्यास, यज्ञ । इंद्रियदमन योगादिक ॥४॥
करुनि, न साध्य, साधिलें तें तुम्हीं । अपूर्व हें जनीं तुमचें प्रेम ॥५॥
थोरथोरांतेंही दुर्लभ हें प्रेम । अर्पूनि स्वप्राण मेळविलें ॥६॥
वासुदेव म्हणे धन्य धन्य गोपी । श्रीकृष्णस्वरुपीं लीन झाल्या ॥७॥
५७४
म्हणे उद्धव गोपींसी । तुम्हीं कृतार्थ झालांती ॥१॥
विरहमिषें हें नि:सीम । अवलोकिलें तुमचे प्रेम ॥२॥
एसें प्रेम हें अगाध । पाहूनियां मन गुंग ॥३॥
दर्शनें या अनुग्रह । तुमचा मजवरी प्रत्यक्ष ॥४॥
भाग्यवतींनो, निरोप । कथिला कृष्णें मज गुप्त ॥५॥
हितकारी तें वचन । गोपिकांनों घ्या ऐकून ॥६॥
वासुदेव म्हणे आतां । ऐका, पावा कृतार्थता ॥७॥
५७५
गोपींनो, तुम्हांसी माझा कदा न विरह ॥
जळीं, स्थळीं, काष्ठीं माझा वास सर्वकाल ॥१॥
भरुनि मी राहिलोंसें चराचराप्रति ॥
उत्पत्ति, संहार, स्थिति लीला सर्व माझी ॥
जागृत्स्वप्नादि विकार मिथ्या हे सकळ ॥
दोषयुक्त बुद्धीसी तें कळे न साचार ॥३॥
जागृति येतांचि मिथ्या होई जेंवी स्वप्न ॥
सर्व दृश्य मिथ्या तेंवी होतां सत्यज्ञान ॥४॥
ममत्वबुद्धि हे होई विषयचिंतनें ॥
निरोध मनाचा होई आवश्यक तेणें ॥५॥
सर्व साधनांसी हेंचि साध्य म्हणे कृष्ण ॥
वासुदेव करी प्रेमें नित्य त्याचें गान ॥६॥
५७६
प्रियसख्यांनो, या विरहें तुम्हांसी । अहर्निश चित्तीं माझा ध्यास ॥१॥
तया भक्तिसौख्यें स्थिर होई चित्त । सान्निध्यें हा लाभ नसे कोणा ॥२॥
प्रियविरहेंचि येई तल्लीनता । सान्निध्यें न तैसा लाभ घडे ॥३॥
निर्व्यापार तुम्हीं जहालांती तेणें । मम प्राप्ति ध्यानें तुम्हां आतां ॥४॥
केवळ संतोषास्तव न हे वाचा । मार्ग कल्याणाचा कथिला सत्य ॥५॥
प्रतिबंध जयां रासक्रीडेमाजी । पावल्या मजसी आठवा तें ॥६॥
तैशाच तुम्हींही मत्स्वरुपीं लीन - । होऊनि जा, ध्यान करुनि माझें ॥
वासुदेव म्हणे गोपींसी सन्मार्ग । निवेदी गोविंद परम प्रेमें ॥८॥
५७७
रायालागीं मुनि कथिती निरोप । जाहलें गोपींस स्मरण पुन्हा ॥१॥
बोलल्या त्या आम्हां कंसवधें हर्ष । वसुदेवदु:ख दूर झालें ॥२॥
मथुरानिवासी स्त्रियांवरी प्रेम । करी काय कृष्ण आम्हांपरी ॥३॥
अन्य कांही तदा बोलल्या रसिक । श्रीकृष्णचि योग्य ऐशा कर्मा ॥४॥
मधुर भाषणें, विलासें त्या नारी । करितील सत्वरी आपुला त्या ॥५॥
अन्य कोणी तया बोलल्या आम्हांसी । नको तें, आम्हांसी स्मरतो काय ॥६॥
वासुदेव म्हणे इतुक्यांत अन्य । बोलल्या वचन परिसा काय ॥७॥
५७८
वृंदावनांतील रात्री त्या मधुर । स्मरे शारड्गधर काय सांगें ॥१॥
शुष्कवनालागीं अमृत जैं मेघ । होईल आम्हांत काय तेंवी ॥२॥
बोलती तैं अन्य आतां तो कासया । येईल या ठाया त्यजूनि राज्य ॥३॥
राजकन्यांलागीं वरील तो आतां । भोगील आनंदा परोपरी ॥४॥
इतुक्यांत एक बोलली वेदान्त । अहो जो नि:संग पूर्णकाम ॥५॥
पिंगलाही कथी नैराश्येचें सौख्य । जाणूनीही आस धरितों पोटीं ॥६॥
कैसे विसरावें एकान्तींचे खेळ । विरक्ति अपूर्व श्रीकृष्णाची ॥७॥
कमलाही तुच्छ मानी तो परी ते । सर्वदा तयातें सेवीतसे ॥८॥
वासुदेव म्हणे आठवूनि कृष्णा । व्याकुळ ललना होती बहु ॥९॥
५७९
उद्धवा, विस्मृति होईल तयाची । तरी विरहाची व्यथा टळे ॥१॥
परी काय सांगूं न होईचि तैसें । प्रतिक्षणीं येते आठवण ॥२॥
पादचिन्हांकित नद्या, गिरी, वन । धेनू, वेणुगान स्मरण देई ॥३॥
चालण्याची ऐटा, मुद्रा ती प्रसन्न । सलीलावलोकन, मधुर भाषा ॥४॥
वारंवार सर्व आठवूनि खेद । होई नाइलाज आमुचा तेथें ॥५॥
दर्शनावांचूनि उद्धवा, न शांति । हांका श्रीकृष्णासी मारिती तैं ॥६॥
कृष्णा, रमाकांता, हे व्रजनायका । शोकार्णवीं आतां बुडतों आम्हीं ॥७॥
गोविंदा, उद्धार करी गोकुळाचा । वासुदेव वाचा रुद्ध होई ॥८॥
५८०
पाहूनि गोपींच शोक उद्धवानें । पुनरपि प्रेमें कथिला बोध ॥१॥
निरोप कृष्णाचा पुनरपि तोचि । कथिला तैसाचि गोपींलागीं ॥२॥
ऐकूनि त्या शांत जाहल्या अंतरीं । कृष्ण चराचरीं दिसला तयां ॥३॥
विरहाग्नि त्यांचा होई तदा शांत । प्रेमें उद्धवास पूजिताती ॥४॥
सद्गुरु तयासी मानिती आनंदें । उद्धव संतोषें राही तेथें ॥५॥
कांही मास कृष्णकथा त्यां कथूनि । सांत्वन करुनि सुखवी तयां ॥६॥
उद्धवसान्निध्यें हर्ष गोकुळांत । काळ तो क्षणांत निघूनि जाई ॥७॥
नद्या, वनेंआदि विहाराचीं स्थळें । पाहूनि उद्धवें पुशिलें वृत्त ॥८॥
स्वयेंही त्या वृत्तें होऊनि हर्षित । गोपींप्रति सौख्य स्मरणें होई ॥९॥
पुढती तन्मय होऊनियां गोपी । व्यवहार करिती वेड्यापरी ॥१०॥
वासुदेव म्हणे पाहूनि उद्धव । वंदन तयांस करुनि स्तवी ॥११॥
५८१
भूमंडळीं एक कृतार्थ या गोपी । लाभली न भक्ति ऐसी कोणा ॥१॥
श्रेष्ठवर्णही तो भक्तीवीण व्यर्थ । भक्तचि वरिष्ठ, असूनि हीन ॥२॥
ईश्वरलाभेंचि कृतार्थता येई । जाती, आचारही, ज्ञान तुच्छ ॥३॥
ग्रामीण या गोपी व्यभिचारभावें । उद्धरल्या ऐसें भक्तिबल ॥४॥
अहो, ज्ञानाविण रक्षी जैं अमृत । तैसीच हे श्रेष्ठ भक्ति जनीं ॥५॥
आलिंगनें त्याच्या कृतार्थता त्यांसी । कमलाही तैसी नसे धन्य ॥६॥
वासुदेव म्हणे उद्धववचन । गोपींचें माहात्म्य कथी ऐका ॥७॥
५८२
निश्चयेंचि गोपी महा भाग्यवती । पादधूलि त्यांची उद्धारक ॥१॥
लता-वृक्षादीही तया धूलिस्पर्शे । पावन जगातें करितील हे ॥२॥
गौरवावें यांसी तितुकेंही थोडें । ब्रह्ययादिकांही हें नसे भाग्य ॥३॥
स्मरणेंही ज्यांच्या त्रैलोक्य पावन । स्वयें धन्यता न केंवी तयां ॥४॥
गोपीचरणजां असो नमस्कार । उद्धव साचार म्हणे ऐसें ॥५॥
वासुदेव म्हणे उद्धव गोकुळीं । बहुकाळ राही आनंदानें ॥६॥
५८३
गोपी, यशोदा, नंदासी । भेटे उद्धव पुढती ॥१॥
घेई निरोप तयांचा । रथ सिद्ध करी साचा ॥२॥
राम-कृष्णा उपायनें । गोप अर्पिती प्रेमानें ॥३॥
वासुदेव म्हणे गोप । वदले तदा उद्धवास ॥४॥
५८४
उद्धवजी, आम्हां निवेदिलें तत्त्व । गुरुचि यास्तव तुम्हीं आम्हां ॥१॥
आतां विनवणी एकचि तुम्हांसी । प्रेम कृष्णपदीं अढळ राहो ॥२॥
कृष्ण कृष्ण ऐसा ध्यास घेवो वाणी । देह त्याच्या कामीं झिजूनि जावो ॥३॥
लाभो कोणताही जन्म प्रारब्धानें । बुद्धि कृष्णप्रेमें दृढ होवो ॥४॥
पुढती उद्धव जाई मथुरेसी । श्रेष्ठता गोपींची सकलां कथी ॥५॥
उपायनेंही तीं अर्पिलीं सकळ । भक्ति म्हणे थोर गोपींचीच ॥६॥
वासुदेव म्हणे धन्य धन्य गोपी । भक्तही लाजती पाहूनियां ॥७॥