मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय २० वा

स्कंध १० वा - अध्याय २० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२४१
निवेदिती मुनि सकळ बाळांनीं । वृत्त निवेदूनि गोपांप्रति ॥१॥
कृष्णाचें सामर्थ्य कथिलें सर्वांसी । आनंद गोपांसी तदा होई ॥२॥
नररुपधारी म्हणती हे देव । आम्हांसी आश्रय भाग्यें यांचा ॥३॥
ऐसें कांहीं दिन लोटतां पुढती । जीवांची उत्पत्ति करिता ऋतु ॥४॥
‘वर्षा’ नामें येई पोषक सर्वांचा । संचार मेघांचा नभीं होई ॥५॥
वासुदेव म्हणे कृष्णमेघ नभीं । स्वैर संचरती वर्षाकालीं ॥६॥

२४२
विद्युल्लतेसवें गर्जना तयांची । झांकूनियां जाती सूर्य-चंद्र ॥१॥
गुणत्रयें होई ब्रह्म जैं आच्छन्न । तेंवी मेघाच्छान्न होई नभ ॥२॥
घेऊनियां कर संकटीं जैं नृप । रक्षितो प्रजेस, तेंवी सूर्य ॥३॥
शोषित उदक पर्जन्यास्वरुपें । अर्पी सकलांतें ऐसें वाटे ॥४॥
विद्युत्प्रकाशानें । पाहूनि जगासी । ताप निवारिती नील मेघ ॥५॥
वासुदेव म्हणे तपस्वी जैं पुष्ट । सेवूनि अन्नास, तेंवी भूमि ॥६॥

२४३
कलीमाजी वेद होऊनियां लुप्त । माजतें पाखंड जैशापरी ॥१॥
तेंवी शुक्रादिक आच्छत्र जाहले । चमकूं लागले काजवेचि ॥२॥
सद्‍गुरु निमग्न असतां आन्हिकांत । शिष्य जेंवी स्वस्थ बैसताती ॥३॥
पुढती सक्रोध पाहतांचि संथा । सुरु होई, तैसा मेघध्वनि ॥४॥
स्वाधीन इंद्रियें आरोग्यसंपदा । स्थिर, तीं सुटतां नाश होई ॥५॥
वासुदेव म्हणे उल्लंघूनि पात्रें । तेंवी जल धांवे भलतीकडे ॥६॥

२४४
राजसैन्या जेंवी बहुरंग वेश । शोभवी कोणास शुभ्र छत्र ॥१॥
तेंवी इंद्रगोप, हरित वा तृण । उच्छिलींद्र जाण कोठें शोभे ॥२॥
कृषीवल हर्षे पाहताती शेतें । कदा खिन्नचित्तें बघती मेघां ॥३॥
रुचिर स्वरुप जेंवी साधकासी । परमानंदरुपीं सिद्ध जेंवी ॥४॥
मत्स्य वृक्षही तैं नूतन जलानें । शोभती क्रमानें अधिकाधिक ॥५॥
अपक्व योग्यातें विषयांनीं क्षोभ । तैसा सिंधु क्षुब्ध वायुजलें ॥६॥
वासुदेव म्हणे गुणांनीं न कंप । ईश्वर भक्तांस तेंवी गिरि ॥७॥

२४५
अनभ्यासें वेदविस्मृति विप्रांसी । आछन्न तैं होती मार्ग वनीं ॥१॥
गुणवंतातेंही त्यागिती जैं वेश्या । विद्युल्लता मेघा त्यजिती तेंवी ॥२॥
त्रिगुण विश्वीं या शोभे गुणातीत । धनु तैं नभांत गुणहीन ॥३॥
अहंभावें जीव होई जैं निस्तेज । मेघाच्छन्न चंद्र तैशापरी ॥४॥
तापदग्ध शांत होतां संतसंगें । वंदिती आनंदें जेंवी संतां ॥५॥
आतपतप्त तैं मयूर मेघांसी । पाहूनि नाचती मधुर शब्दें ॥६॥
वासुदेव म्हणे तप:सिद्धांसम । पल्लवित जाण वृक्षराजी ॥७॥

२४६
तापद संसारीं लंपटांचा वास । तेंवी चक्रवाक मत्स्यामिषें - ॥१॥
पंकिलही सरस्तट ते कांटेरी । सेवूनि अंतरीं सुखी होती ॥२॥
पाखंड मतानें मर्यादांचा भंग । तेंवी क्षेत्रबांध भग्न होती ॥३॥
उपाध्यायप्रेरित ते जेंवी नृप । दीनांसी संतुष्ट करिती दानें ॥४॥
तैसेचि अनिलप्रेरित मेघांनीं । लता वृक्ष वनीं केले गार ॥५॥
वासुदेव म्हणे वर्षाकाल ऐसा । संतोषवी जगा परम भाग्यें ॥६॥

२४७
निवेदिती शुक राया, ऐशापरी । पूर्ण शोभा आली वृंदावना ॥१॥
पक्वफलभारें खर्जुरिका नम्र । तेंवी जंबुवृक्ष फलाकीर्ण ॥२॥
बलराम गोपांसवें तेथ कृष्ण । पातला घेऊनि निज धेनू ॥३॥
संतोषें त्या वनीं करी बहु क्रीडा । पीनपयोधरा धेनूप्रति ॥४॥
वाहतां ते येई घेऊनियां धांव । कांसेतूनि दुग्ध वाहे तिच्या ॥५॥
भिल्लिणी ते क्रीडा पाहती दुरुनि । वासुदेव मनीं हर्ष पावे ॥६॥

२४८
धबधबे गुहा मधुस्त्रावी वृक्ष । द्विजगणशब्द ऐके कृष्ण ॥१॥
कंद-मुळें फळें भक्षितां । पर्जन्य वर्षतां एकाएकीं ॥२॥
वृक्षातळीं कदा, कदा ढोलीमाजी । किंवा गुहेमाजी शिरुनि खेळे ॥३॥
राम गोपांसवें निर्झराच्या कांठीं । दध्योदन भक्षी कदा हर्षे ॥४॥
हरित तृणीं त्या रवंथ करीत । धेनु स्वस्थचित्त बैसताती ॥५॥
निजवास्तव्यानें ऐसी वनशोभा । आल्हादक जगा पाही कृष्ण ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा वर्षाकाल । होतसे सफल वृंदावनीं ॥७॥

२४९
निवेदिती शुक ऐसा वर्षाकाल । क्रीडेंत गोपाल घालविती ॥१॥
शरत्कालारंभ जाहला पुढती । सुनिर्मल होती सरिताजलें ॥२॥
शीतमंद वायु वाहे शांतपणें । सज्जनांचीं मनें निर्मल जैं ॥३॥
आल्हादक तेथें अंबुजें फुललीं । निर्मल जाहली सकल सृष्टि ॥४॥
अंतरांत भक्ति उपजतां जेंवी । विघ्नें दूर व्हावीं भाविकांचीं ॥५॥
निरिच्छ मुनीचि तेंवी, शुभ्र मेघ । समाधानें नभ आक्रमिती ॥६॥
वासुदेव म्हणे शरत्कालशोभा । वर्णितां आनंदा काय तोटा ॥७॥

२५०
कुटुंबपोषणीं दंग होतां मूढ । क्षणोक्षणीं वय निघूनि जाई ॥१॥
तेंवी क्षीण जलीं मस्त्य होती दु:खी । आतर्पी तापती उदकें यदा ॥२॥
कर्ममार्ग जनीं सकलां सामान्य । पात्रचि ते ज्ञानमार्गी रत ॥३॥
तेंवी आतां जलप्रवाह पर्वतीं । स्थानीं योग्य त्याचि प्रवाहित ॥४॥
धैर्यवंत ज्ञानी अहंममत्यागें । पूर्णता विरागें पावताती ॥५॥
तेंवी पंकहीन होऊनियां क्षिति । वृक्ष-वनस्पतिवृद्धि पूर्ण ॥६॥
वासुदेव म्हणे शांत ज्ञात्यासम । आघोष त्यागून सिंधु स्थिर ॥७॥

२५१
ज्ञाता जैं संरक्षी संयमानें ज्ञान । रक्षिती जीवन तेंवी कृषि ॥१॥
परमार्थज्ञान अथवा कृष्णभेटी । दु:खें या भवींचीं सकल हरी ॥२॥
तेंवी शरच्चंद्र प्रखर सूर्याचा । ताप सकलांचा दूर करी ॥३॥
उभयमीमांसाबोध शुद्ध मनें । शुद्ध नभीं जाणें तेंवी तारे ॥४॥
नक्षत्रवेष्टित सुनिर्मल चंद्र । यादववेष्टित कृष्ण जेंवी ॥५॥
पुष्पसुगंधिमंदवायुस्पर्शे । ताप सकलांचे दूर होती ॥६॥
श्रीकृष्णविरहदु:खनिवारण । सामर्थ्य, परी न वायूसी त्या ॥७॥
वासुदेव म्हणे भक्तिमार्ग मोद । समागमें गर्भ स्त्रियांसी तैं ॥८॥

२५२
सन्नृप लाभतां तस्करांवाचूनि । आनंदित मनीं सकल जन ॥१॥
कुमुदांवांचूनि कमळें समस्त । तेंवी विकसित सूर्योदयीं ॥२॥
नूतन धान्यानें सर्वत्र समृद्धि । नवान्न भक्षिती समारंभें ॥३॥
ऐशा समारंभीं राम-कृष्णभेटी । आनंदा भरती आणीतसे ॥४॥
योग-भक्तिसिद्ध, प्रारब्धावशिष्ट । तोंचि देहस्थित, पुढती मुक्त ॥५॥
तैसे यति, राव, ब्रह्मचारीआदि । साधनीं रमती आपुलाल्या ॥६॥
वासुदेव म्हणे शरत्काल ऐसा । शुक परीक्षिता निवेदिती ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP