मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ३९ वा

स्कंध १० वा - अध्याय ३९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४५७
निवेदिती शुक पूर्ण हेतु सर्व । होऊनि अक्रूर दुष्ट झाला ॥१॥
संकल्पिलें तें तें घडूनियां आलें । देतां घननीळें काय न्यून ॥२॥
परी सेवेवीण प्रिय न भक्तांसी । कृष्ण अक्रूरासी पुढती पुशी ॥३॥
मार्गामाजी श्रम जाहाले कीं काय । शांत त्वत्स्वभाव सुखद आम्हां ॥४॥
इच्छितों कल्याण तुझें आम्हीं सदा । सौख्य आप्त-मित्रां लाभतें कीं ॥५॥
अपेक्षाचि ऐसी करणें अयोग्य । मातुलचि छळ करितां त्यांचा ॥६॥
वासुदेव म्हणे दु:खाचें कारण । निवेदी श्रीकृष्ण अक्रूरासी ॥७॥

४५८
आम्हांमुळें क्लेश माता-पितरांसी । होती, हेंचि चित्तीं दु:ख बहु ॥१॥
सकल अपत्यें वधिलीं तयाचीं । कारण आम्हींचि परी तया ॥२॥
आम्हांस्तव तयां कारागारक्लेश । भोगणें तें प्राप्त जाहलें कीं ॥३॥
असो, त्वद्भेटीनें पावलों संतोष । बहुदिन हीच होती इच्छा ॥४॥
मित्रा, आगमनहेतु कथीं आतां वासुदेव वृत्ता पुढती कथी ॥५॥

४५९
ऐकूनियां कृष्णप्रश्न । बोले अक्रूर वचन ॥१॥
देवा, यादवांचा द्वेष । नित्य कंसाच्या मनांत ॥२॥
वसुदेवासी वधावें । हेंही तयानें इच्छिलेंझ ॥३॥
तुम्हां न्यावें मथुरेंत । हेतु धरुनियां दुष्ट ॥४॥
वसुदेवाचा तूं पुत्र । ऐकूनियां नारदोक्त ॥५॥
धनुर्यागाच्या निमित्तें । कंस पाचारी तुम्हांतें ॥६॥
नंदादिक सकल गोप । यावे ऐसें इच्छी कंस ॥७॥
वासुदेव म्हणे कृष्ण । हांसे ऐकूनि वचन ॥८॥

४६०
नंदाप्रति सुत कंसाचा निरोप । निवेदितां, नंद आज्ञा मानी ॥१॥
आज्ञा करी नंद तदा गोपालांसी । जाऊं मथुरेसी चला म्हणे ॥२॥
नृपास्तव वस्तु घ्याव्या मूल्यवान । गोरस भरुन घ्यावे घट ॥३॥
रुजुभावें हेतु कळला न तया । पाहूं यज्ञशोभा हर्षे म्हणे ॥४॥
पिटूनि दवंडी गमनार्थ सिद्ध । घेऊनि बहुत उपायनें ॥५॥
वासुदेव म्हणे कृष्णवियोगाचें । वृत्त गोपींसी तें दु:खदाई ॥६॥

४६१
प्राणचि आपुला जातसे निघून । दु:खें ऐसें मन खिन्न त्यांचें ॥१॥
जाहल्या त्या म्लान उष्णश्वासयुक्त । सौभाग्यलंकार त्यजिती दु:खें ॥२॥
केवळ वृत्तेंचि जाहल्या मूर्च्छित । असह्य तें दु:ख कित्येकींसी ॥३॥
सिद्धांसम त्यांच्या सकलहई वृत्ति । झाल्या कृष्णरुपीं तदाकार ॥४॥
आठवूनि बहु प्रसंग कित्येकी । शोकाकुल होती अंतरांत ॥५॥
वासुदेव म्हणे पसरतां वृत्त । जाहल्या एकत्र सकल गोपी ॥६॥

४६२
हळु हळु तीव्र वियोगभावना । होऊनियां मना खेद त्यांच्या ॥१॥
म्हणती विधात्या, दया न तुजसी । प्रथम निर्मिसी प्रेम बहु ॥२॥
कृतार्थता त्याची लाभण्यापूर्वीचि । वेळ वियोगाची आणिसी तूं ॥३॥
ऐशा या बालिश करितोसी क्रीडा । विचार अन्याचा नसे तुज ॥४॥
विरह कृष्णाचा आम्हां न साहवे । रुप हे दाविलें तूंचि आम्हां ॥५॥
अर्पिलें जें तेंचि घेसी हिरावूनि । ऐसें निंद्य जनीं कर्म तव ॥६॥
अर्पिले तें घेई हिरोनि तो क्रूर । लक्षण साचार ब्रह्ययासी हें ॥७॥
वासुदेव म्हणे दोष विरंचीतें । लाविती गोपी, तें पुढती ऐका ॥८॥

४६३
म्हणसील नेई अक्रूर कृष्णासी । दोष कां मजसी लावीतसां ॥१॥
परी विधात्या, त्या नामचि अक्रूर । ऐसा केंवी क्रूर होईल तो ॥२॥
तात्पर्य, हा दोष निश्चयें तुझाचि । अर्पूनि नेत्रांसी हिरुनि घेसी ॥३॥
म्हणसील नेत्र नेईं न तुमचे । नेतों श्रीकृष्णातें मथुरेमाजी ॥४॥
परी हे विधात्या, काय न जाणसी । आमुचे नेत्रचि कृष्णरुप ॥५॥
सदासर्वकाळ पाहती ते कृष्ण । चातुर्य संपूर्ण तुझें तेथें ॥६॥
अवयव त्याचे सर्वही रुचिर । रहस्यचि तव उघडें होई ॥७॥
यास्तव विधात्या नेसी त्या हरुनि । क्रूरत्व हें जनीं परी न योग्य ॥८॥
वासुदेव म्हणे यापरी ब्रह्म्यासी । दोष लाविताती सकळ गोपी ॥९॥

४६४
विधात्यासी दोष लावूनि यापरी । चिंतिती अंतरीं पुढही गोपी ॥१॥
सख्यांनो, अन्यासी दोष काय द्यावा । निष्ठुर गणावा कृष्णचि हा ॥२॥
क्षणांत आमुचें तोडूनियां प्रेम । त्यागावया स्थान सिद्ध झाला ॥३॥
त्यागूनि आपण आप्त-पति-पुत्रां । तयाचा घेतला छंद नित्य ॥४॥
हास्यादिकें त्याच्या झालों पराधीन । नसेचि हें भान तया कांहीं ॥५॥
नित्य नूतनचि आवडी तयासी । कासया आम्हांसी पाही आतां ॥६॥
वासुदेव म्हणे मथुरानिवासी । स्त्रियांचा गोपींसी वाटे हेवा ॥७॥

४६५
मथुरेच्या नारी होतील कृतार्थ । पाहूनि मुखचंद्र श्रीहरीचा ॥१॥
श्रीहरीही तयां पाहील प्रेमानें । सख्यांनो, कृष्णाचें हास्य मद्य ॥२॥
कटाक्ष तो यदा फेंकी तैं तें मद्य । करी आम्हां धुंद दर्शनेंचि ॥३॥
नंदासमवेत येईल फिरुनि । सख्यांनो, हे मनीं न धरा आशा ॥४॥
मथुरानिवासी स्त्रियांतें पाहूनि । आठवील मनीं केंवी आम्हां ॥५॥
मधुर भाषण लज्जायुक्त दृष्टि । पाहूनि तयांची मोहकारी ॥६॥
विसरेल आम्हां, नंदाचीही इच्छा । दुर्लक्षील ऐसा तर्क होई ॥७॥
वासुदेव म्हणे आपुलीच दृष्टि । लावूनियां गोपी करिती तर्क ॥८॥

४६६
पौरस्त्रिया महाकुशल या कामीं । ग्रामीण या आम्हीं वेडया-भोळ्या ॥
आपुलें स्मरण व्हावें तयां कैसें । लाभेल सुख तें आतां अन्यां ॥२॥
भोज अंधक ते सात्वतही सुखी । होतील हरीसी पाहूनियां ॥३॥
अक्रूर या सर्व दु:खाप्रति मूळ । अक्रूर म्हणेल कोण यातें ॥४॥
निर्दयासी ऐशा क्रूरचि म्हणावें । चित्त आंवरावें यत्नें आतां ॥५॥
वासुदेव म्हणे विरहदु:खानें । बावरलीं मनें गोपिकांचीं ॥६॥

४६७
म्हणती सख्यांनो, करुं नका शोक । निघाला अच्युत निर्दयत्वें ॥१॥
आडदांड गोप तेही सिद्ध झाले । रथांत बैसले राम-कृष्ण ॥२॥
वृद्धही न कोणी अडवीचि तयां । म्हणावें दुर्दैवा काय ऐशा ॥३॥
अनुकूल दैव असतें आम्हांसी । तरी विघ्न यासी येतें कांहीं ॥४॥
यास्तव सख्यांनो, आम्हीचि अभागी । अभाग्याचा जगीं जन्म व्यर्थ ॥५॥
वासुदेव म्हणे अंतीं एक तयां । उपाय सुचला काय ऐका ॥६॥

४६८
चला जाऊनियां आतां सांगूं कृष्णासीच ।
होईल तें होवो आम्हां हाचि एक मार्ग ॥१॥
सांगूं जावयाचें नाहीं कृष्णा मथुरेसी ।
स्पष्ट भाषणें या येवो रागही कोणासी ॥२॥
भीड धरुनियां आतां लाभ न आम्हांतें ।
क्षणही वियोग त्याचा युगासम भासे ॥३॥
आजवरी कृष्णास्तव साहस बहुत ।
केलें बहुधा हा जाणा अंतिम प्रसंग ॥४॥
रात्रीमागूनी त्या रात्री गोड संगतीच्या ।
घालविल्या नाहीं काय भीड ही कासया ॥५॥
सत्यचि गडे, तो काळ दीर्घ क्षणासम ।
विरहाचा क्षण अद्य भासे युगासम ॥६॥
वासुदेव म्हणे गोपी म्हणती न आतां ।
मैत्रिणींनो, राहियेली जीवनाची आशा ॥७॥

४६९
आतां लाभावें तें सुख । इच्छा धरणें हें व्यर्थ ॥१॥
सायंकाळीं धेनूंसवें । वेणु वाजवीत यावें ॥२॥
रज:कणें मलिन केश । ऐसें सुरम्य तें मुख ॥३॥
मंदमंद हास्यें दृष्टि । फेंकूनियां कृपावृष्टि-॥४॥
करी, आम्हांवरी ऐसा । काळ येईल तो कैसा ॥५॥
वासुदेव म्हणे गोपी । म्हणती कांहीं सुचेनाचि ॥६॥

४७०
लाजलज्जा राया, सोडूनियां अंतीं । आक्रोश मांडिती कृष्णास्तव ॥१॥
गोविंदा, माधवा, दामोदरा, देवा । मुक्तकंठे धांवा करिती ऐसा ॥२॥
मोकळा करुनि गळा आक्रंदती । मर्यादा न त्यांसी कांहीं आतां ॥३॥
संध्यावंदनादि आन्हिक करुनि । अक्रूर घेऊनि राम-कृष्णां ॥४॥
हांकूनियां रथ निघाला आनंदें । नंदादींचे गाडे मागोमाग ॥५॥
गोरसाचे कुंभ बहु उपायनें । घेतलीं नंदानें कंसास्तव ॥६॥
गोपींचा आक्रोश ऐके तदा कोण । नव्हतेंचि भान कवणा कांहीं ॥७॥
वासुदेव म्हणे पाहूनि तें गोपी । पोंचवाया जाती मागोमाग ॥८॥

४७१
रुद्धकंठ गोपी भरल्या नेत्रांनीं । कृष्णावलोकनीं दंग झाल्या ॥१॥
खळखळां वाहे जरी अश्रुपुर । मिटती न नेत्र क्षणही परी ॥२॥
पळही न पडो खंड हेचि इच्छा । दया जगन्नाथा येई त्यांची ॥३॥
विरह:दुख तें जाणूनि तयांचें । वळूनियां मागें पाही तयां ॥४॥
पाहूनि तें हर्ष वाटला गोपींसी । अपेक्षित तेंचि वदला कृष्ण ॥५॥

४७२
येईन सत्वरी माघारीं जा आतां । निरोप कृष्णाचा कथी दूत ॥१॥
तैसेंचि करानें खुणावी गोविंद । पाहूनियां स्तब्ध होती गोपी ॥२॥
जेथल्या तेथेंचि अहो थबकल्या । वृत्ति आंवरल्या नकळे केंवी ॥३॥
लावूनियां टक तेथूनीच आतां । प्रेमें जगन्नाथा अवलोकिती ॥४॥
देह जरी मागें आत्मे ते धांवती । मागोमाग जाती श्रीकृष्णाच्या ॥५॥
काष्ठाच्या पुतळ्या तदा त्या भासल्या । तटस्थ राहिल्या अवलोकीत ॥६॥
वासुदेव म्हणे चलनवलन । न घडेचि जाण ध्यानमग्ना ॥७॥

४७३
पाहतां पाहतां रथ जाई दूर । गगनांत धूळ उडे वेगें ॥१॥
धूळचि ती आर्त होऊनि पाहती । दूर दूर दृष्टि नेऊनियां ॥२॥
कांहींच दिसेना यदा तयांप्रति । निराश तैं होती अंतरांत ॥३॥
शून्य हृदयानें होऊनियां दु:खी । माघार्‍या फिरती अंतीं कष्टें ॥४॥
राया, गोपिकांचें प्रेम तें नि:सीम । निरोपेंचि मन केलें शांत ॥५॥
कृष्णलीला आतां निरंतर गाती । गोकुळीं कंठिती ऐसे दिन ॥६॥
वासुदेव म्हणे भेद तों स्मरण । स्मरणास्मरण अभेदीं न ॥७॥

४७४
इकडे माध्यान्हसमयीं अक्रूर । अवलोकी तीर कालिंदीचें ॥१॥
वृक्षातळीं तदा उभा करी रथ । उतरले तेथ राम-कृष्ण ॥२॥
जाऊनि सत्वरी यमुनाजळांत । प्रक्षाळिती हस्तपाद दोघे ॥३॥
जळही थोडेसें प्राशूनियां रथीं । येऊनि बैसती अत्यानंदें ॥४॥
धार्मिक अक्रूरा माध्यान्हसंध्येची । इच्छा मनीं होती, परी शंका - ॥५॥
मनीं येई बहु दुष्ट असुरांची । सोडूनि दोघांसी जाववेना ॥६॥
वासुदेव म्हणे आंधळें हें प्रेम । राम-कृष्णां कोण काय करी ॥७॥

४७५
अंतीं अंतरीं चिंतूनि । बसा सावध म्हणूनि ॥१॥
गेला स्नानार्थ उदकीं । मंत्र जपे प्रमाणादि ॥२॥
बुडी मारिली तों तया । दिसले बांधव त्या ठाया ॥३॥
पाही शंकित होऊन । प्रेमें आपुला स्यंदन ॥४॥
तेथेंही ते दिसले तया । तदा भ्रमचि मानिला ॥५॥
पुनरपि मारी बुडी । तोंचि कौतुक त्या स्थळीं ॥६॥
वासुदेव म्हणे हरी । दिसला तदा शेषावरी ॥७॥

४७६
रायालागीं म्हणती शुक । वर्णूं केंवी त्यांचें रुप ॥१॥
नाग सहस्त्र फणांचा । दिसला अक्रूरासी मोठा ॥२॥
कुंडलाची त्या आकृति । सिद्धचारण स्तविती ॥३॥
शोभे मस्तकीं किरीट । अंगावरी नीलवस्त्र ॥४॥
कमलतंतूसम कांति । शुभ्रवर्ण त्याची होती ॥५॥
कैलासचि तो भासला । वेढे देऊनि बैसला ॥६॥
वासुदेव म्हणे शेष । ऐसा पाही तो प्रत्यक्ष ॥७॥

४७७
शेषावरी तया स्वस्थ शांत एक । निदेला पुरुष दिव्यवर्ण ॥१॥
मेघ:शाम पीतपितांबर शोभे । चतुर्भुज साचे, कमलनेत्र ॥२॥
किंचिदारक्त ते, रुचिर वदन । तरल ते जाण रम्यदृष्टि ॥३॥
भ्रुकुटि त्या धनु नासिका सरळ । आरक्त अधर शुकचंचु ॥४॥
सुंदर कपोली कर्णकुंडलांची । विरजली कांति मनोरम ॥५॥
दीर्घ पुष्ट बाहु, पांस ते उत्तुंग । श्रीवत्सलांछित वक्षस्थळ ॥६॥
कुंबकंठ, नाभि आवर्तासमान । अश्वत्थाचें पर्ण उदर शोभे ॥७॥
त्रिवलियुक्त तें, सिंहासम कटि । उरु गजशुंडाचि भासती त्या ॥८॥
जानुपिंडीकाही रुचिर भासती । वासुदेव कथी पुढती ऐका ॥९॥

४७८
किंचित्‍ रक्तवर्ण नखें । तेज फांकले तयांचे ॥१॥
अंगुलिका त्या कोमल । ऐसे चरणकमल ॥२॥
रत्नजडित भूषणें । शंख चक्र गदा पद्में ॥३॥
विराजले चार भुज । शोभे कंठांत कौस्तुभ ॥४॥
वनमालाही रुळते । नंद-सुनंद सेवेतें ॥५॥
सनकसनंदनादिक । स्तोत्रें गाताती विविध ॥६॥
पुष्टि-तुष्टिआदि शक्ति । सज्ज तयाच्या सेवेसी ॥७॥
वासुदेव म्हणे हर्ष । पाहूनियां अक्रूरास ॥८॥

४७९
भक्तीचे कल्लोळ तयाच्या अंतरीं । रोमांच शरीरीं रुद्ध कंठ ॥१॥
प्रेमाश्रु लोचनीं भरुनियां येती । जोडूनि करांसी नमन करी ॥२॥
शेषशायी नारायण तो प्रत्यक्ष । पाहूनि विनम्र चरणीं होई ॥३॥
सद्गदित चित्तें स्तवन मांडिलें । भान न राहिलें अन्य कांहीं ॥४॥
वासुदेव म्हणे अक्रूरकृत ती । ऐकूनि घ्या स्तुति भाविकहो ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP