मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ४५ वा

स्कंध १० वा - अध्याय ४५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५३१
पाहूनि तें कृष्ण अंतरांत चिंती । नसो हें आजचि ज्ञान यांतें ॥१॥
कृपाकटाक्षें तें पुढती देईन । यापरी चिंतून पसरी माया ॥२॥
पुढती बोलती उभय बालक । तुम्हांप्रति दु:ख दिधलें आम्हीं ॥३॥
लालनसौख्यही लाभूं दिलें नाहीं । तेणें खेद होई आम्हां बहु ॥४॥
पुत्रवियोगाचें दु:ख बहुकाळ । सोशीतसां छळ विविधरुपें ॥५॥
पंचदश वर्षे होतील आम्हांसी । सौख्य न तुम्हांसी दिधलें परी ॥६॥
कौतुक तें श्रेष्ठ अंतरलों आम्हीं । दैवहीन जनीं खचित तेणें ॥७॥
वासुदेव म्हणे मातापित्यांलागीं । पुढती बोलती राम-कृष्ण ॥८॥

५३२
माता-पितरांची करावी शुश्रुषा । आद्यधर्म ऐसा पुत्रांप्रति ॥१॥
जयांमुळें होई नरदेहप्राप्ति । कौतुकें पाळिती बालपणीं ॥२॥
ऋणांतूनि त्यांच्या मुक्त केंवी व्हावें । पूर्णायुष्य झालें प्राप्त जरी ॥३॥
असूनि सामर्थ्य जीविका तयांची । चालवी न त्यासी यमदंड ॥४॥
यम तयालागीं भक्षवी स्वमांस । जन्मूनि तो व्यर्थ उदरीं त्यांच्या ॥५॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्णवचन । देऊनियां ध्यान पुढती ऐका ॥६॥

५३३
अंगीं असूनि सामर्थ्य । वृद्ध माता-पितरांस ॥१॥
तेंची पतिव्रता स्त्रीतें । अज्ञान वा बालकांतें ॥२॥
संरक्षी न जो विमूढ । मृत, असूनि तो जिवंत ॥३॥
गुरुं, विप्रांचें रक्षण । अथवा येई जो शरण ॥४॥
ऐशां रक्षी न जो त्याचें । वय जाणावें मृताचें ॥५॥
आई, बाबा, कंसभयें । नाहीं तुम्हांसी सेविलें ॥६॥
व्यर्थ गेले इतुके दिन । आतां क्षमावें जाणून ॥७॥
छळितां कंसानें तुम्हांसी । नाहीं आलों उपयोगासी ॥८॥
अपराध तो आमुचा । पुत्रवात्स्ल्यें क्षमावा ॥९॥
वासुदेव म्हणे धन्य । माता-पित्याचें तें प्रेम ॥१०॥

५३४
महामुनि तदा बोलले रायासी । ऐकोनि नम्रोक्ति बालकांची ॥१॥
पुत्रप्रेमव्याप्त वसुदेव-देवकी । घेती तयां अंकीं परम प्रेमें ॥२॥
आलिंगनें त्यांच्या पावती संतोष । सद्गदित कंठ प्रेमें होई ॥३॥
अश्रुधारा त्यांच्या वाहती लोचनीं । शब्दही वदनीं उमटेचिना ॥४॥
स्तब्धता तयांची यापरी पाहून । करी समाधान कृष्ण त्यांचें ॥५॥
वासुदेव म्हणे मातामहाप्रति । वंदिती पुढती राम-कृष्ण ॥६॥

५३५
यादवांचें आधिपत्य । अर्पी तयासी अच्युत ॥१॥
म्हणे राया, उग्रसेना । करीं आम्हांसी तूं आज्ञा ॥२॥
यादवांसी शाप थोर । नसे राज्याचा अधिकार ॥३॥
परी माझिया वचनें । अधिकार तुज जाणें ॥४॥
नम्र होतां मी, इंद्रही । नम्र जाणें तुझ्या पायीं ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसा । वर्णवेन मोद त्यांचा ॥६॥

५३६
पुढती यादव सात्वत भोजादि । कंसभयें जाती पळूनि तयां - ॥१॥
पाचारुनि प्रेमें करुनि सत्कार । देई त्यां आधार अत्यानंदें ॥२॥
गृहसौख्य तयां लाभलें यापरी । मथुरा नगरी धन्य होई ॥३॥
कृपाकटाक्षाचा लाभ नित्य जनां । भान न सज्जनां वार्धक्याचें ॥४॥
वासुदेव म्हणे कृपादृष्टि तेचि । अमृताची वृष्टि मथुरेमाजी ॥५॥

५३७
राम-कृष्ण नंदाप्रति । पुढती प्रेमें आलिंगिती ॥१॥
बाबा, लालन-पालन । केलें आमुचें सप्रेम ॥२॥
माता-पितरें बाळांसी । जिवांहूनिही जपती ॥३॥
पिता-पुत्राचेंचि नातें । जडलें आम्हां-तुम्हां ऐसें ॥४॥
अनाथांसी जे रक्षिती । आई-बाप तेचि त्यांसी ॥५॥
बाबा, आतां गोपांसवें । तुम्हीं गोकुळांत जावें ॥६॥
आप्त सुहृदांचे स्वास्थ्य । येतों करुनि भेटीस ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसें । कृष्ण कथितो नंदातें ॥८॥

५३८
समाधान ऐसे करुनि नंदाचें । अलंकार वस्त्रें अर्पी तया ॥१॥
स्नहीबव्हल तो आलिंगी पुत्रांसी । खळेना नेत्रींची अश्रुधारा ॥२॥
गोपांसवें अंतीं गोकुळासी जाई । अघटित होई घटना जनीं ॥३॥
अवस्था नंदाची तदा झाली काय । म्हणे वासुदेव कोण जाणे ॥४॥

५३९
वसुदेवानें पुढती । पाचारुनि गर्गांप्रति ॥१॥
करुनि सकल संस्कार । उपनयन केलें थोर ॥२॥
पाचारुनि बाह्मणांसी । अर्पी बहु दक्षिणेसी ॥३॥
वस्त्रें, अलंकार तेंवी । अर्पी सालंकृत गाई ॥४॥
कृष्णजन्म समयींचा । संकल्प तो पूर्ण केला ॥५॥
धेनू हरिल्या कंसानें । त्याचि आणवूनि प्रेमें - ॥६॥
अर्पियेल्या ब्राह्मणांसी । वासुदेवा हर्ष चित्तीं ॥७॥

५४०
परीक्षिता, सर्वज्ञचि राम-कृष्ण । पातले घेऊन मनुजरुप ॥१॥
स्वत:सिद्ध तेणें झांकूनियां ज्ञान । घ्यावया शिक्षण गुरुगृहीं - ॥२॥
जावें ऐसें मनीं योजिलें तयांनीं । गुरु सांदिपनी काश्यपगोत्री ॥३॥
योजूनियां जाती अवंतीपुरीतें । संयमें गुरुतें सेविताती ॥४॥
ईश्वरचि साक्षात्‍ गुरुसी लेखूनि । आदर्शचि जनीं होती छात्रां ॥५॥
वासुदेव म्हणे पाहूनियां भाव । तुष्ट मुनिराय शिष्यांवरी ॥६॥

५४१
साड्गसोपनिषद्‍ पढविले वेद । तेंवी धनुर्वेद यथासांग ॥१॥
मनुस्मृतिआदि सर्व धर्मशास्त्रें । मीमांसा-न्यायाचें कथिलें गूढ ॥२॥
राजनीतीही ते संपूर्ण कथिली । ऐकतांचि केली आत्मसात ॥३॥
कारण स्वयें ते विद्याप्रवर्तक । कलाही समस्त अभ्यासिल्या ॥४॥
अपेक्षितचि जे दक्षिणा गुरुसी । सिद्ध द्यावयासी होती अंतीं ॥५॥
वासुदेव म्हणे व्यवहारयोग्य । दावावया मार्ग आचरिला ॥६॥

५४२
चिंतूनियां मुनि, कांतेसी पुसोनि । विक्रम जाणूनि बालकांचा ॥१॥
प्रभासतीर्थी जो सागरीं बुडाला । पुत्र तो इच्छिला दक्षिणेसी ॥२॥
तथेति म्हणोनि स्यंदनीं बैसले । सिंधुतीरीं आले प्रभासासी ॥३॥
क्षणभरी तेथें बैसले जों स्तब्ध । पातला प्रत्यक्ष तोंचि सिंधु ॥४॥
मनुष्यरुपें तो पूजा करी त्यांची । बोले सागरासी तदा कृष्ण ॥५॥
सागरा, गुरुचा पुत्र हरिलासी । देईं तो आम्हांसी त्वरा करीं ॥६॥
वासुदेव म्हणे अपांपति बोले । नाहीं मी वधिलें गुरुपुत्रा ॥७॥

५४३
शंखरुपें कृष्णा, असुर उदकीं । राहिला तो दोषी या कर्माचा ॥१॥
ऐकूनि तत्काळ कृष्ण सागरांत । शिरुनि दैत्यास वधिता झाला ॥२॥
तयाच्या उदरीं नव्हता गुरुपुत्र । पांचजन्य थोर शंख तो हा ॥३॥
घेऊनि तो, गांठी वेगें यमपुरी । कोंदला अंबरीं शंखनाद ॥४॥
रामासवें कृष्णा पाहूनियां यम । आदरें स्तवन करी त्यांचें ॥५॥
वासुदेव म्हणे यम कथी देवा । काय व्हावी सेवा आज्ञा करीं ॥६॥

५४४
यमा, सांदीपनीपुत्र त्वत्‍दूतांनीं । आणिला बांधूनि सदनीं तव ॥१॥
स्वाधीन तो माझ्या करावा सत्वरी । स्वकर्मेचि जरी मरण तया ॥२॥
ममाज्ञेनें तुज दोष न त्या कर्मे । ऐकूनि यमानें दिधला पुत्र ॥३॥
घेऊनि तयासी राम-कृष्ण जाती । गुरुसी अर्पिती अत्यानंदें ॥४॥
पुत्र प्राप्त होतां गुरु संतोषले । आशीर्वाद दिले राम-कृष्णां ॥५॥
म्हणती जा आतां सदनीं सुखानें । पावन जगातें करील यश ॥६॥
अध्ययनफल पावाल सर्वत्र । भोगाल आनंद परत्रही ॥७॥
वासुदेव म्हणे वंदूनि गुरुंसी । राम-कृष्ण येती मथुरेमाजी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP