स्कंध १० वा - अध्याय ३ रा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
२८
हर्षे शुकदेव बोलले रायासी । सुयोग पुढती एक झाले ॥१॥
ग्रहनक्षत्रांसी स्थिरत्व लाभलें । तेज प्रकाशलें तारकांचें ॥२॥
सकलही दिशा जाहल्या प्रसन्न । जन्मोत्सव जाण जागजागीं ॥३॥
रत्नखनीही त्या चमकूं लागल्या । सुनिर्मल झाल्या सरिता बहु ॥४॥
सरोवरामाजी कमळें प्रफुल्ल । मधुशब्दें द्विज भृंग गाती ॥५॥
शीत मंद वायु पसरी सुगंध । स्वयें अग्निकुंड प्रदीप्तचि ॥६॥
वासुदेव म्हणे सज्जनांसी धीर । वाटला अपूर्व सहज तदा ॥७॥
२९
स्वर्गी दुंदुभींचा रव । गुण गाताती गंधर्व ॥१॥
सिद्ध चारण करिती स्तुति । नृत्य अप्सरा करिती ॥२॥
पुष्पवृष्टि रुद्ध कंठें । देव, मुनि करिती मोदें ॥३॥
मेघ सागरासमेत । हर्षे करी जयनाद ॥४॥
मध्यरात्रीचा समय । प्रकाशलें बंदीगृह ॥५॥
जेणें व्यापिलें ब्रह्मांड । चंद्रासम त्याचें तेज ॥६॥
होतें नक्षत्र रोहिणी । प्रगटे तदा शार्ड्गपाणी ॥७॥
वासुदेव म्हणे त्याचें । तेज अपूर्व विराजे ॥८॥
३०
अद्भुत ती बालमूर्ति पाही वसुदेव ॥
शंख चक्र गदा पद्मयुक्त चतुर्भुज ॥१॥
वत्सलांछन कौस्तुभ पीतांबरधारी ॥
सजलमेघकांति बहु शोभली शरीरीं ॥२॥
वैडूर्य रत्नांचा शोभे मस्तकीं किरीट ॥
रत्नखचित कुंडलेंही शोभलीं कर्णांत ॥३॥
किरीट कुंडलकांति कुरळ्या कुंतलीं ॥
संमिश्र पाहूनि कोंदे हर्ष निजांतरीं ॥४॥
कटिप्रदेशीं मेखला करीं कडीं तोडे ॥
ऐसें अपूर्व बाळाचें स्वरुप शोभलें ॥५॥
वासुदेव म्हणे पिता अहो भाग्यवंत ॥
विश्वकंद गोविंदाचें पाही ऐसें रुप ॥६॥
३१
ओळखूनि तदा अवतार ऐसें । अलौकिक हर्षे कंठ दाटे ॥१॥
विसरुनि गेला कारागृहवास । होई उतावीळ दानें द्याया ॥२॥
बंदिवास परी येतां ध्यानामाजी । मानसिक अर्पी दानें बहु ॥३॥
पुढती जाणूनि ईश्वर हा ऐसें । साष्टांग तयातें वंदीतसे ॥४॥
वासुदेव म्हणे पुढती स्तवन । मांडिलें जोडून हात दोन्ही ॥५॥
३२
देवा, मायातीता तुज मी जाणिलें । दाविसी सोनुलेम रुप जरी ॥१॥
देवकीचें बाळ झालासी परी न । म्हणे मी सामाज्य तुजलागीं ॥२॥
विषयइंद्रियांसवें पंचतत्त्वें । एक होतांचि हें प्रगटे विश्व ॥३॥
प्रविष्टलीं त्यांत भासती अद्यपि । तथापि पूर्वींचि असती तेथें ॥४॥
विषयसंबंधें पृथक् हाचि, भेद । परी महतत्त्व पूर्वींचेंचि ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसी भासमान । स्थिति तोचि जन्म म्हणती ज्ञाते ॥६॥
३३
असूनियां देही अलिप्त तूं तेंवी । सत्यत्वाचा होई भासमात्र ॥१॥
दूतक्रिया जेंवी म्हणती रायाची । प्रेरकत्त्वें तेंवी ईशकार्य ॥२॥
मायाश्रयें उत्पत्त्यादि कार्यास्तव । ब्रह्मा-विष्णु-शिवरुप घेसी ॥३॥
साधुरक्षणार्थ पातलासी अद्य । वधिसील दैत्य असंख्यात ॥४॥
देवा, बंधूंसम तुजसीही कंस । वधील सावध होईं आतां ॥५॥
वासुदेव म्हणे थोरांतेंही ज्ञान । शिकवितो अज्ञ मोहग्रस्त ॥६॥
३४
रायालागीं शुक बोलले देवकी । आनंदली चित्तीं दर्शनें त्या ॥१॥
चतुर्भुज शामसुंदरा त्या प्रार्थी । आणिसी वेदोक्ति प्रत्यया तूं ॥२॥
आदिकारणा, हे अव्यक्ता निर्गुणा । धर्मक्रियाहीना सत्स्वरुपा ॥३॥
भीति मग तुज काय बा, कोणाची । जैसा तैसा तूंचि प्रलयकाळीं ॥४॥
सृष्टयुत्पत्तिज्ञान निमेषोन्मेष ते । कालरुपें तुझे सकळ खेळ ॥५॥
मंगलनिधाना अभयद तूंचि । वासुदेव वंदी ईश्वरा त्या ॥६॥
३५
मायाचालका, भक्तांसी । नित्य रक्षिसी संकटीं ॥१॥
कंसापासूनि आमुतें । रक्षीं देवा, या समयातें ॥२॥
मुमुक्षूसी उद्धारक । रुप करावें हें गुप्त ॥३॥
जन्मलासी कळतां एथें । कंस वधील आम्हांतें ॥४॥
मोहमग्न करीं त्यासी । आंवरीं हे दिव्य कांति ॥५॥
होईं सामान्यासारिखा । न घडो उपहास माझा ॥६॥
वासुदेव म्हणे देव । ऐका तदा वदले काय ॥७॥
३६
माते, स्वायंभुव मन्वंतरामाजी । ‘पृश्नि’ हें तुजसी नाम होतें ॥१॥
पति तैं सुतपाप्रजापति तव । कथी ब्रह्मदेव सृष्टि निर्मा ॥२॥
द्वादश सहस्त्र संवत्सरें तदा । उभयांनीं तपा केलें घोर ॥३॥
पाहूनि ते भक्ति चतुर्भुज रुपें । प्रगटलों तेथें त्वदिच्छेनें ॥४॥
तदा पृश्निगर्भ नामें मी जाहलों । पुत्रत्वें पावलों तुम्हांप्रति ॥५॥
पुढती अदिति-कश्यप तुम्हींचि । वामन रुपासी धरिलें तदा ॥६॥
स्मरणार्थ त्याचि झालों चतुर्भुज । आतां न तुम्हांस पुनर्जन्म ॥७॥
ब्रह्मभावें आतां चिंतितां मजसी । पावाल सद्गति निश्चयानें ॥८॥
वसुदेवा, भय वाटे जरी मनीं । गोकुळीं नेऊनि ठेवीं मज ॥९॥
यशोदेची कन्या आणीं योगमाया । हर्ष वासुदेवा ऐशा शब्दें ॥१०॥
३७
बोलूनियां ऐसें उभयांसमक्ष । होई बालरुप मायाबळें ॥१॥
चिंती वसुदेव न्यावा या बाहेरी । तोंचि नंदाघरीं प्रगट माया ॥२॥
इकडे द्वारपाल तेंवी नागरिक । कालनिद्रावश मथुरेमाजी ॥३॥
शृंखला कडयांनीं द्वारें जीं पिनद्ध । होती आपोआप मोकळीं तीं ॥४॥
मंद गर्जनांनीं मेघ करी वृष्टि । पसरी मस्तकीं शेष फणा ॥५॥
वासुदेव म्हणे यमुना जळांत । वसुदेवा मार्ग देई सुखें ॥६॥
३८
गोकुळींही जन होते निद्रामग्न । करी आज्ञेसम वसुदेव तैं ॥१॥
यशोदेच्या शय्येवरी बालमूर्ति । वसुदेव योजी, उचली कन्या ॥२॥
बंदिशालेमाजी पातला त्वरित । होई पूर्ववत् बंदिवान ॥३॥
प्रसूतिवेदनामूर्च्छित यशोदा । कन्या पुत्रभेदा न जाणे ते ॥४॥
पुढती पाहिला पुत्र शय्येवरी । आनंद अंतरीं सकलां तदा ॥५॥
वासुदेव म्हणे लीला श्रीहरीची । अवतारकार्यासी प्रारंभ हा ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : December 09, 2019
TOP