मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय २९ वा

स्कंध १० वा - अध्याय २९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३२५
महामुनि शुक कथिती रायातें । होई वचनाचें स्मरण देवा ॥१॥
शरत्कालीं गोपीमनोरथपूर्ति । करीन हे उक्ति वदला पूर्वी ।२॥
आठवे ती तया येतां शरत्काल । सुटला सर्वत्र कुसुमगंध ॥३॥
कामीजन मनोल्हादक ते वृत्ति । उत्तेजित, ऐसी रम्य वेळ ॥४॥
पाहूनियां, योगमायेच्या आश्रयें । चिंतिलें केशवें क्रीडाकर्म ॥५॥
चंद्रकिरणें तैं शोभे पूर्वदिशा । तिलक प्रियेचा भासे चंद्र ॥६॥
वासुदेव म्हणे रजनीवल्लभ । पसरी सर्वत्र शीतकर ॥७॥

३२६
प्रफुल्लित झाल्या वनीं कमलिनी । कांतिमय भूमि कौमुदीनें ॥१॥
उच्छृंखलवृत्ति होती कामुकांच्या । वृंदावनशोभा अपूर्व ते ॥२॥
अंतर्बाह्य रम्य भासलें तें स्थान । विलासचिंतन करुनि मनीं ॥३॥
रमाकांत तदा करी वेणुनाद । आरंभी गोविंद मधुर गान ॥४॥
मंजुळ तें गीत ऐकूनियां गोपी । कामक्षुब्ध होती अंतरांत ॥५॥
पंचशरविद्ध होऊनि त्या स्तब्ध । तया कामकाज न सुचे कांहीं ॥६॥
कृष्णाविण कांहीं सुचेना तयांसी । उगवला चित्तीं सवतीभाव ॥७॥
वासुदेव म्हणे मनोगत गुप्त । राखूनियां गीत ऐकती त्या ॥८॥

३२७
पुढती आलाप येती ज्या दिशेसी । प्रेमें त्या दिशेची धरिती वाट ॥१॥
तल्लीन त्या नादें होऊनियां जाती । भान न तयांसी उरलें कांहीं ॥२॥
दोहनपात्रही टाकूनियां खालीं । कृष्णाची धरिली वाट त्यांनीं ॥३॥
तापलें कीं नाहीं दुग्ध न पाहिलें । तैसेंचि ठेविलें अग्नीवरी ॥४॥
चुलीवरी सांजा कोणाचा राहिला । कोणी पति-पुत्रां वाढिताती ॥५॥
परी तैं तैसेंचि टाकूनियां सर्व । धांवल्या अपूर्व वेणुनादें ॥६॥
अंगावरी पितां बाळेंही सांडिलीं । कोणी त्यागियेलीं अन्नपात्रें ॥७॥
वासुदेव म्हणे शुश्रूषा पतीची । त्यागूनियां घेती धांव कोणी ॥८॥

३२८
चंदन उटणें कोणी चर्चित धांवल्या ॥
काजळ लावितां कोणी तैशाचि पळाल्या ॥१॥
धांदल तयांची केंवी वर्णावी कळेना ॥
पदर कोठील कोठें घ्यावा तें सुचेना ॥२॥
कंचुकीसी ग्रंथि कोणी अन्यत्रचि देती ॥
ऐशा वेणुनादें गोपी भांबावूनि जाती ॥३॥
कंकणें गळ्यांत, कोणी गलसरी हातीं ॥
कर्णी नथ, बाळी कोणी नाकांत घालिती ॥४॥
पाहूनि तें प्रतिबंध करिती त्यां आप्त ॥
परी भान न त्यां कर्णी येतां वेणुनाद ॥५॥
वासुदेव म्हणे गोपी पाहतां पाहतां ॥
धांवूनियां गांठीताती प्रेमें कृष्णनाथा ॥६॥

३२९
मनीं येई तें वर्तन । सकलां शक्य नसे जाण ॥१॥
राया, यास्तव कित्येकी । पराधीन होत्या गोपी ॥२॥
पति-पुत्र तयांलागीं । गृहीं कोंडूनि ठेविती ॥३॥
परी थोर त्यांची निष्ठा । चित्तीं चिंतिती अच्युता ॥४॥
म्हणती पूर्वपापें ऐसा । विरह आमुतें कृष्णाचा ॥५॥
ऐसें चिंतूनियां मनीं । रमूनि जाती कृष्णध्यानीं ॥६॥
वासुदेव म्हणे चित्त । ध्यानें होई त्यांचें शुद्ध ॥७॥

३३०
चित्तशुद्ध होतां कृष्णध्यानीं दंग । होऊनि श्रीरंग चिंतिताती ॥१॥
दृढालिंगन त्या देती सूक्ष्मदेहें । विलास भोगिले ऐसे बहु ॥२॥
पूर्वसुकृतें हा कृष्णरतिलाभ । पापपुण्यातीत होती अंतीं ॥३॥
वासुदेव म्हणे गुणमय देह - । त्यागें, ब्रह्मरुप जाहल्या त्या ॥४॥

३३१
परीक्षिती म्हणे महामुनीश्वरा । गोपींच्या अंतरा कृष्णासक्ति ॥१॥
व्यभिचारयुक्त होतें त्यांचें प्रेम । नव्हतेंचि ज्ञान ईश्वराचें ॥२॥
शृंगारिकरुपीं केवळ आसक्त । लाभलें सायुज्य मग केंवी ॥३॥
वैषयिक प्रेम तारक तें जरी । मग कां संसारीं सायुज्य न ॥४॥
सर्वत्रचि ब्रह्मरुप ओतप्रोत । नसे आवश्यक ज्ञान जरी ॥५॥
दृश्यरुपें सर्व मायेचा विकार । राहिलें अंतर काय मग ॥६॥
वासुदेव म्हणे सुस्पष्ट हा प्रश्न । उत्तर ऐकून घ्यावें आतां ॥७॥

३३२
निवेदिती शुक राया, हें पूर्वींचि । कथिलें तुजसी स्मरण करीं ॥१॥
शिशुपालादिक वैरीही तरले । प्रेमचि कीं केलें गोपिकांनीं ॥२॥
ललना-पुत्रादि जरी ब्रह्मरुप । बहुतचि भेद परी तेथें ॥३॥
ब्रह्मतत्त्व त्यांचें अज्ञानावच्छिन्न । आवश्यक ज्ञान तेथें तेथ ॥४॥
आवरण कांहीं नसेचि या ठाईं । आवश्यक नाहीं ज्ञान तेणें ॥५॥
देहधार्‍यांसम लौल्य न कृष्णातें । जनउद्धारातें देह त्याचा ॥६॥
विषयवासना नसे या कारण । नियंता निर्गुण परमात्मा हा ॥७॥
वासुदेव म्हणे कृष्णप्रेम गूढ । निवेदिती शुक रायाप्रति ॥८॥

३३३
गोपिकांचें प्रेम, शिशुपाल वैर । ममता ते थोर यशोदेची ॥१॥
ज्ञात्याचें अद्वैत, पांडवांचें सख्य । भक्तिभाव श्रेष्ठ नारदाचा ॥२॥
सकलही भाव ऐसे मोक्षप्रद । राया, न आश्चर्य मानीं मनीं ॥३॥
ब्रह्मांडही मुक्त होईल प्रसादें । नवल गोपींचें काय मग ॥४॥
वासुदेव म्हणे शुकोक्ति हे सुधा । असावी सर्वदा हृदयामाजी ॥५॥

३३४
अंत:साक्षी कृष्ण होता वाक्‍चतुर । जया जें साचार तेंचि बोले ॥१॥
वेणुनादलुब्ध विलासा उत्सुक । पाहूनि गोपींस वदला हरी ॥२॥
भाग्यवतींनो, त्यां संबोधी विनोदें । करितों मी तुमचें अभिनंदन ॥३॥
सर्व मनोरथ कथावे मजसी । बावरली वृत्ति तुमची वाटे ॥४॥
गोकुळीं नसे कीं विघ्न कांहीं सांगा । पाहूनियां शंका तुम्हांप्रति ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनियां गोपी । करिती एकमेकी स्मितहास्य ॥६॥

३३५
मंदहास्य त्यांचें पाहूनियां हरी । म्हणे भयकारी रजनी वाटे ॥१॥
व्याघ्रादिक हिंस्त्र पशूंचा संचार । स्त्रियांसी हें स्थळ भीतिप्रद ॥२॥
क्षणही न एथें बसावें स्त्रियांनीं । यास्तव निघूनि सत्वरी जा ॥३॥
पति, पुत्र, आप्त शोधितील तुम्हां । चिंतेंत तयांना ठेऊं नका ॥४॥
राया, कामुकाचें चित्त हळुवार । होतसे साचार सर्वदाचि ॥५॥
तेणें श्रीहरीचा हेतु जाणूनिही । नर्मवचें होई खेद तयां ॥६॥
वासुदेव म्हणे प्रणयक्रोधें त्या । पाहती गोपिका तदा कृष्णा ॥७॥

३३६
कृष्ण म्हणे कार्य जाहलें तुमचें । आतां कासयातें एथें वास ॥१॥
वृंदावनशोभा पहा हे अपूर्व । रजनीवल्लभ हांसतसे ॥२॥
नयनाल्हादायक किरण हे त्याचे । पुष्पगुच्छ कैसे दिसती रम्य ॥३॥
विकसित तयां वायु शीत मंद । हालवूनि गंध पसरी वनीं ॥४॥
गोपींनो, हे ऐसी अपूर्व वनश्री । पाहूनि तुम्हांसी कृतार्थता ॥५॥
पातलांती एथें म्हणूनि हे शोभा । दिसली, जा आतां धन्य तुम्हीं ॥६॥
वासुदेव म्हणे विनोदें श्रीकृष्ण । बोलला हांसून ऐका काय ॥७॥

३३७
आतां न करा विलंब । सेवा जाऊनि पतिपाद ॥१॥
पाजा भुकेल्या तान्ह्यांसी । चारा घाला जा वत्सांसी ॥२॥
गोपी अधिकचि क्षुब्ध । ऐकूनियां ऐसे शब्द ॥३॥
वावरूनि सर्व दिशा । पाहूम लागल्या बापुड्या ॥४॥
तदा बोलला श्रीकृष्ण । पातलांती धरुनि प्रेम ॥५॥
तरी काय नवलकृति । प्रीती मजवरी विश्वाची ॥६॥
वासुदेव म्हने कृष्ण । कथी गोपींसी स्त्रीधर्म ॥७॥

३३८
गोपींनो, स्त्रियांचा श्रेष्ठधर्म ऐसा । पतीची शुश्रुषा मनोभावें ॥१॥
तैसेंचि आप्तांसी वागावें प्रेमानें । संगोपन प्रेमें अपत्यांचें ॥२॥
अहो, पति जरी भाग्यहीन दुष्ट । रुपहीन, वृद्ध, दुर्व्यसनी ॥३॥
मूढ, रोगी किंवा दरिद्रीही जरी । प्रेम तयातरी करणें योग्य ॥४॥
पतितचि तरी नसावा संबंध । परी सेवा योग्य इतर त्याची ॥५॥
परपुरुषाशीं संबंध नसावा । सर्व पुण्यठेवा नष्ट तेणें ॥६॥
वासुदेव म्हणे मोकळा निर्मळ । कथी घननीळ परिसा बोध ॥७॥

३३९
परपुरुषाच्या संगें । यश लाभेनाचि कोठें ॥१॥
सर्वत्रचि तेणें भय । ध्यानीं असो हा निर्णय ॥२॥
मार्ग माझिया सेवेचे । असती बहुत तुम्हांतें ॥३॥
प्रेमें माझें घ्या दर्शन । ऐका सर्वदा गुणगान ॥४॥
करा अनुवाद त्याचा । घडो ध्यानही सर्वदा ॥५॥
अंगसंग इच्छा परी । ऐसी न धरावी अंतरीं ॥६॥
आतां त्यागूनि विलंब । धरा सदनाचा मार्ग ॥७॥
वासुदेव म्हणे कृष्ण - । बोध, नसे हा सामान्य ॥८॥

३४०
ऐकूनियां गोपी पावताती खेद । सकल संकल्प जिथल्यातिथें ॥१॥
वाहूं लागे उष्णश्वास, म्लान होती । अंतीं अश्रु येती लोचनांतें ॥२॥
वांकवूनि माना पादाग्रें भूमीसी । रेघोटया ओढिती घोंटाळूनि ॥३॥
अंगिकारार्थचि प्रार्थितसें वाटे । कोणीही गृहातें जातीचिना ॥४॥
पुढती पुसूनि नेत्र सद्गदित । होऊनि, कृष्णास वदती प्रेमें ॥५॥
वासुदेव म्हणे प्रेमें प्रियतमा । बोलती ललना ऐका काय ॥६॥

३४१
कृष्णा आमुचा धिक्कार करुं नको ऐसा ॥
देवा, आगमनीं किती पाहीं हे उत्कंठा ॥१॥
सर्व सर्व विषयत्याग करुनि एकचि ॥
इच्छितसों सेवा तुझ्या पादकमलांची ॥२॥
आदि-नारायण जेंवी साधक स्वीकार - ॥
करुनि, पुरवी त्यांचे मनोरथ सर्व ॥३॥
अंगिकारुनी आम्हांतें तेंवी बाळकृष्णा ॥
होऊनि दयाळु मनीं पुरवीं कामना ॥४॥
कथिलेसी जे जे धर्म मान्य ते आम्हांसी ॥
परी व्यापका सेवितां, पुण्य आम्हां तेंचि ॥५॥
वासुदेव म्हणे गोपी केवळ जारिणी - ॥
होत्या, अज्ञानेंचि ऐसें म्हणो सुखें कोणी ॥६॥

३४२
सर्वधर्मसिद्धि होईल आमुची । देवा, एक तुझी घडतां सेवा ॥१॥
प्रभो, ज्ञाते देह-भार्याही त्यागूनि । प्रेमांत रंगूनि जाती तुझ्या ॥२॥
त्याचि परी आम्हीं इहपरसौख्य । त्यागूनियां, एक भजतों तुज ॥३॥
यास्तव करावी करुणा दयाळा । हेतु पुरवावा बहुकाळींचा ॥४॥
गृहीं जावयासी कथिसी तें केंवी । घडावें तें पाहीं चित्तीं तूंच ॥५॥
आकर्षूनि सर्व घेतल्यासी वृत्ति । लक्ष गृहकृत्यीं केंवी आतां ॥६॥
वासुदेव म्हणे मनोभाव व्यक्त । करुनियां स्पष्ट कथिती गोपी ॥७॥

३४३
गृहकृत्यासी न कर हे उद्युक्त । तैसेचि हे पाद दूर जाण्या ॥१॥
सोडूनियां पादपद्में हीं कोमल । कैसें हें शरीर दूर न्यावें ॥२॥
प्रियतमा, आतां पाहूं नको अंत । मदनाग्नि क्षुब्ध बहु झाला ॥३॥
अधरामृत हें तेंवी हास्य मंद । होई वेणुनाद सखा त्यातें ॥४॥
तेणें क्षोभ याचा, आतां जरी शांति - । न होतां, आहुति पडतील या ॥५॥
वासुदेव म्हणे उतावीळ मन । होतां तें दारुण अग्निज्वाला ॥६॥

३४४
विरहानळही असह्य हा तव । भक्षील सर्वस्व ऐसें वाटे ॥१॥
मदनाग्नि तेंवी विरहाग्नि ज्वाला । दग्धचि आम्हांला करितील या ॥२॥
ध्यानमग्न आम्हीं जातांही हे प्राण । स्वीकारुं चरण हेचि देवा ॥३॥
मग सर्वकाळ राहूं त्याचि स्थानीं । क्षणही त्यजूनि न जाऊंचि ॥४॥
प्राणवल्लभा, हीं दुर्लभ लक्ष्मीसी । यमुनातीरासी पादपद्में - ॥५॥
पाहिलीं प्रथम, तदाचि आकृष्ट । जाहलें हें चित्त तुझ्या पाईं ॥६॥
तदा प्रभृतीचि पती आम्हां तुच्छ - । जाहले, गृहास न जाववे ॥७॥
वासुदेव म्हणे पाप-पुण्यचिंता । सोडूनि अच्युता स्मरती गोपी ॥८॥

३४५
हे मनोहरणा, कर्म हें आमुचें । भासे न आमुतें नवें ऐसें ॥१॥
कटाक्ष लक्ष्मीचे लाभावे म्हणूनि । ब्रह्मयादिक मनीं झुरती परी ॥२॥
धिक्कारुनि तयां वक्ष:स्थळीं तुझ्या । सर्वदा तियेचा वास जेंवी ॥३॥
भक्त सेविती ते पादरज:कण । तुलसी स्वयें जाण सेवूं इच्छी ॥४॥
तैशाचि आम्हींही, इच्छावे हे पाय । विशेष तें काय यांत असे ॥५॥
योग्यांसम आम्हीं सर्वसंगत्यागें । प्राप्त झालों इएथें जाणूनियां ॥६॥
अंतर आम्हांसी देऊं नको आतां । प्रार्थितो अच्युता वासुदेव ॥७॥

३४६
प्रभो, पाहूनियां तुझा गोड मुखचंद्र ॥
मीलनोन्मीलन जाती विसरुनि नेत्र ॥१॥
अधरामृतमाधुरी नाहीं अमृतासी ॥
देवही आम्हांसी तेणें तुच्छ वाटताती ॥२॥
स्मितहास्य देवा, तुझें आल्हाददायक ॥
कुरळे कुंतल घेती आकर्षूनि चित्त ॥३॥
बाहुपाश हे करिती संसारविमुक्ति ॥
मोहित कमला तुझ्या पाहूनि वक्षासी ॥४॥
लालसा तुझ्या सेवेची यास्तव गोविंदा ॥
वासुदेव म्हणे चित्त घेवो याचि छंदा ॥५॥

३४७
वासुदेवा, आम्हीं पति-पुत्रत्याग । करुनि आनंद मानियेला ॥१॥
एकचि उत्कंठा यावें या स्थळासी । सर्वकाल होती मनामाजी ॥२॥
यास्तव त्वदुक्त धर्मही ऐकूनि । रुचेनाचि मनीं गृहीं जाणें ॥३॥
देवा, मुरलीचा मंजुळ हा नाद । कोणासी आकृष्ट न करी जनीं ॥४॥
विवेकिनी तेही ढळेल क्षणांत । तुझें दिव्यरुप मोहकारी ॥५॥
पाहूनियां कोण सोडूनि जाईल । आम्हीं तो चंचल गोपस्त्रिया ॥६॥
वासुदेव म्हणे नम्रभावें गोपी । विनवण्या किती करिती पहा ॥७॥

३४८
त्रैलोक्यनायका, वेणुनादे गाई । पशुपक्षी तेही रोमांचित ॥१॥
काष्ठ-पाषाणही चेतना पावती । आम्हां अबलांसी काय दोष ॥२॥
दीनबंधो, कृष्णा, आजवरी किती । अवतार घेसी भक्तांस्तव ॥३॥
भयवारणार्थ आलासी गोकुळीं । मदन दावानलीं रक्षीं आम्हां ॥४॥
वासुदेव म्हणे कृपाप्रसादाची । याचना गोपींची ऐशापरी ॥५॥

३४९
गोपींचें करुणावचन ऐकूनि । दया येई मनीं माधवासी ॥१॥
तत्काळ मायेचा आश्रय करुनि । नटला त्या वनीं बहुरुपें ॥२॥
सुस्मित वदनें भेटूनि तयांसी । दु:खाची निवृत्ति करी त्यांच्या ॥३॥
कृपाकटाक्षें त्या प्रसन्न गोपिका । शोभे तैं तारकांमाजी चंद्र ॥४॥
सुखद आलाप करुनी पुढती । अत्यानंदें गाती गोड गीतें ॥५॥
पुढती पुलिनीं येती कालिंदीच्या । अति शीतलता तयास्थानीं ॥६॥
कुमुदिनी बहु फुलल्या जळांत । भरुनियां तेथ गंध जाई ॥७॥
वासुदेव म्हणे तया रम्य स्थळीं । गोपींसवें करी क्रीडा कृष्ण ॥८॥

३५०
प्रेमें देई आलिंगन । करी विनोदें भाषण ॥१॥
टोंची नखाग्रें तयांस । फेंकी त्यांवरी कटाक्ष ॥२॥
हास्यविनोदें प्रदीप्त । करुनियां कामराज ॥३॥
नाना विलास मांडिले । गोपिकांसी सौख्य दिलें ॥४॥
सर्व स्त्रियांमाजी आम्हीं । श्रेष्ठ ऐसें येतां मनीं ॥५॥
हरावया त्यांचा दर्प । तेंवी कराया प्रसाद ॥६॥
वासुदेव म्हणे हरि । गुप्त होई त्याचि स्थळीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP