८५
निवेदिती शुक राया, वसुदेव । वंदी उपाध्याय गर्गांप्रति ॥१॥
म्हणे गोकुळांत जाऊनि पुत्राचा । नामकरणाचा विधि करा ॥२॥
ऐकूनि तें गर्ग येती गोकुळांत । सत्वरी त्या नंद अत्यादरें ॥३॥
जोडूनियां कर म्हणे विष्णुरुप । मुने, तुम्हीं तृप्त सर्वकाल ॥४॥
उपकारबुद्धया आलांती या स्थानीं । अनुग्रह मनीं जाणतों हें ॥५॥
भूत-भविष्यही जाणतां ज्योतिषें । इंद्रियातीत तें ज्ञान तुम्हां ॥६॥
राम-कृष्णजन्मपत्रिका कराव्या । हेतु पुरवावा हाचि माझा ॥७॥
जन्मसिद्ध तुम्हीं गुरु सकलांचे । वंदितो गर्गांतें वासुदेव ॥८॥
८६
निवेदिती तदा शुक । राया, ऐकें गगवर्च ॥१॥
गुप्तपणें घदोकार्य । ऐसा धरुनि आशय ॥२॥
गर्ग निवेदिती नंदा । गुरु असें यादवांचा ॥३॥
प्रसिद्ध हें जगामाजी । विघ्न येईल तुजसी ॥४॥
नामकरण मी करितां । कृष्ण म्हणतील कृष्णींचा ॥५॥
देवकीचा पुत्र ऐसें । नंदा वाटेल कंसातें ॥६॥
वासुदेव म्हणे वाणी । कन्येची तो घेईल ध्यानीं ॥७॥
८७
देवकीचा गर्भ पुत्रचि आठवा । निश्चयें असावा मानितील ॥१॥
वसुदेवसख्यें पातला तो एथें । खचित दुष्टातें वाटेल हें ॥२॥
तेणें तद्वधार्थ करील तो यत्न । न येवो हें विघ्न मन्निमित्तें ॥३॥
नंद म्हणे मुने, कथितां तें सत्य । परी होवो कृत्य गुप्तरुपें ॥४॥
पुण्याहवाचन करुनि एकान्तीं । शास्त्रोक्त विधीचि व्हावा मात्र ॥५॥
वासुदेव म्हणे गर्गांसी आनंद । बोलला जैं नंद आदरें हें ॥६॥
८८
हर्षभरें गर्ग बोलले नंदासी । रमवील जनांसी रौहिणेय ॥१॥
तेणें ‘राम’ नामें ख्यात तो होईल । श्रेष्ठ बलें ‘बल’ संज्ञा त्यासी ॥२॥
यादवकलहीं आकर्षूनि तयां । मिटवील कलहा ‘संकर्षण ॥३॥
आतां तव अन्य पुत्र युगायुगीं । प्रगटे श्वेतादि वर्ण तदा ॥४॥
कलियुगीं कृष्णवर्णें ‘कृष्ण’ नाम । ईश्वर, सर्वज्ञ गुणनामें ॥५॥
नंदा, हा पूर्वीचा वसुदेवपुत्र । तेणें ‘वासुदेव’ नाम यासी ॥६॥
वासुदेव म्हणे गोवर्धनधारी । कर्मे या कंसारीआदि नामें ॥७॥
८९
कर्मासम त्याचीं ऐसीं बहु नामें । नंदा, मीही नेणें सर्वही तीं ॥१॥
गाई-गोपींसी हा होईल सौख्यद । संकटविमुक्त करिल तुम्हां ॥२॥
अराजक पूर्वी होतां, हाचि त्राता । पालक देवांचा विष्णु जेंवी ॥३॥
तैसाचि भक्तांतें रक्षील हा प्रेमें । तात्पर्य हा जाणें विष्णु दुजा ॥४॥
वासुदेव म्हणे निवेदिती गर्ग । नंदा, या बाळास अधिक जपें ॥५॥
९०
कथूनि यापरी गर्गाचार्य जाती । गोकुळीं क्रीडती राम-कृष्ण ॥१॥
नंद-यशोदा तैं गोकुळनिवासी । गोप आणि गोपी आनंदित ॥२॥
कांहीं दिन जातां रांगती ते दोघे । धेनुमूत्रपंकें लिप्त होती ॥३॥
घागर्यांचा नाद ऐकूनि मंजुळ । येतां कोणी, दूर पळूनि जाती ॥४॥
यशोदा रोहिणी तयां पंकलिप्तां । उचलूनि घेतां आनंदती ॥५॥
तेणें तयां पान्हा फुटतां पाजिती । प्रेमें अवलोकिती मंदहास्य ॥६॥
वासुदेव म्हणे कोंवळे रदन । पाहूनियां मन हृष्ट्स त्यांचें ॥७॥
९१
पुढती एकेक टाकीत पाऊल । करिती नवल सानुले ते ॥१॥
खंडित गतीनें पाउलें टाकित । धेनुवत्सपुच्छ धरिती दृढ ॥२॥
स्वाभाविक मग धांव घेतां वत्स । होती आनंदित राम-कृष्ण ॥३॥
क्रीडा ही तयांची पाहूनियां गोपी । विसरुनि जाती कामकाज ॥४॥
हळुहळु बाळें चालती नि:शंक । अग्नि-उदकादि सकल वस्तु ॥५॥
वासुदेव म्हणे काक-गृध्रादिक । विषय बाळांस क्रीडेचे ते ॥७॥
९२
अवखळ ऐशा बाळां आंवरावें केंवी ॥
यशोदा रोहिणी ऐशा चिंतामग्न पाहीं ॥१॥
गृहकृत्येंही न होती, नावरती बाळें ॥२॥
रोहिणी यशोदा माता भांबावूनि जाती ॥
क्षणोक्षणीं होई मति कुंठित तयांची ॥३॥
वासुदेव म्हणे बाळें समान वयाचीं ॥
नंदअंगणीं पुढती बहु गोळा होती ॥४॥
९३
आतां स्वैरपणें गोकुळांत बाळ । करिती संचार बाळांसवें ॥१॥
खोडकर लीला करिती बहुत । गार्हाणीं सांगत येती गोपी ॥२॥
यशोदे, हा बहु खोड्या करी कान्हा । थेंबही न आम्हां दुग्ध लाभे ॥३॥
म्हणसील ऐसें करी तरी काय । निघाली न धार धेनूंची जों - ॥४॥
तोंचि येऊनियां सोडी वत्सांलागीं । प्राशूनि तीं जाती सकल दुग्ध ॥५॥
वासुदेव म्हणे गार्हाणीं गोपींचीं । प्रेममय कैसीं ऐका आतां ॥६॥
९४
धरायासी जातां आम्हीं मुक्त वत्सें । सदनीं प्रवेशें निर्भयत्वें ॥१॥
चोरुनियां भक्षी दूध दहीं लोणी । मारा म्हणतां कोणी हांसूं लागे ॥२॥
एकटाचि खाई ऐसेंही न कांहीं । मर्कटांही देई दूध लोणी ॥३॥
देतांही, न कोणी खातां फोडी घट । ऐसा हा चावट बाळ तुझा ॥४॥
सदनीं न कांहीं गवसतां बाई । चिमटेचि घेई तान्ह्यां बाळां ॥५॥
वासुदेव म्हणे पेटवीन गृह । ऐसा दावी धाक म्हणती गोपी ॥६॥
९५
लावीलही अग्नि गृहासी हा वाटे । ठेवितों या धाकें दूध दहीं ॥१॥
दूध-दहींचि हा नासो, खावो परी । घरें जाळी तरी जावें कोठें ॥२॥
पटाईत बाई किती हा चोर्यांत । जाणतो अचुक काय कोठें ॥३॥
शिंक्यावरी जरी त्या कांहीं दिसेल । घेईल उखळ पात किंवा ॥४॥
ऐसा बहु यत्न करील चोरटा । यशोदे, कारटा खटयाळचि ॥५॥
रत्नप्रभेनें त्या प्रकाश अंधारीं । न मिळे घट तरी छिद्र पाडी ॥६॥
निर्मल सदनीं त्यागी मल-मूत्र । कार्यमग्नां त्रस्त करी बहु ॥७॥
ऐसी हा पुंडाई करी रात्रंदिन । बैसे साधूसम स्वस्थ एथें ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसीं हीं गार्हाणीं । कथितां गोपींनीं, मानीं धाक ॥९॥
९६
भयग्रस्त नेत्र पाहूनि ते गोपी । विसरुनि जाती अपराध ते ॥१॥
मोहक रुप तें पाहूनि यशोदा । न चिंतीचि कदा मारुं ऐसें ॥२॥
एकदां ती चिंती कृष्णा दाऊं धाक । नवल अद्भुत घडलें तदा ॥३॥
खेळतां खेळतां मृत्तिका भक्षिली । वार्ता हे कळली यशोदेसी ॥४॥
नाहीं नाहीं आई म्हणूनि धांवतां । तयासी यशोदा धरुनि आणी ॥५॥
म्हणे बळिरामादिक हे सर्वही । निवेदिती पाहीं वदसी खोटें ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्णाप्रति माता । म्हणे कां मृत्तिका भक्षिलीस ॥७॥
९७
कृष्ण म्हणे नाहीं नाहीं । माती भक्षिली मी आई ॥१॥
शंका येई तरी माते । स्वयें पाहीं वदन माझें ॥२॥
‘दावीं पाहूं रे’ म्हणतां । उघडी आपुलिया मुखा ॥३॥
नवल जाहलें त्या स्थानीं । अवघें विश्वचि वदनीं ॥४॥
गोकुळही वदनांत । पाहूनियां तीं विस्मित ॥५॥
वासुदेव म्हणे चित्तीं । यशोदा जें ऐका चिंती ॥६॥
९८
काय पाह्तें मी स्वप्न । छे छे जागृत मी पूर्ण ॥१॥
काय माया ही हरीची । अथवा भ्रंशली मन्मति ॥२॥
स्वाभाविकचि ऐश्वर्य । लाभलें हें पुत्रा काय ॥३॥
तर्क ऐसे नानापरी । करी यशोदा अंतरीं ॥४॥
अंतीं रिघाली शरण । मायातीत तो जाणून ॥५॥
पुनरपि निजपुत्र । मानूनियां ती मोहित ॥६॥
वासुदेव म्हणे हरि । अतर्क्यचि लीला करी ॥७॥
९९
परीक्षिती म्हणे मुने, हें अद्यापि । चरित्र ज्ञात्यांसी मोह पाडी ॥१॥
श्रवणेंचि ज्याच्या पातक विनष्ट । चरित्र तें श्रेष्ठ भूमंडळीं ॥२॥
प्रत्यक्ष जन्मला जयांच्या उदरीं । मुने, कां श्रीहरी दूर तयां ॥३॥
अंकावरी ज्यांच्या वाढले खेळले । स्तनपान केलें यशोदेचें ॥४॥
काय महत्पुण्य नंद-यशोदेचें । मुने, निवेदा तें वृत्त मज ॥५॥
वासुदेव म्हणे निवेदिती शुक । ऐका तो वृत्तांत स्थिरचित्तें ॥६॥
१००
राया, वसूंमाजी ‘वसु’ द्रोण नामें । ‘धरा’ ते तयातें सुगुणी कांता ॥१॥
आज्ञापी तयातें ब्रह्मा, गोरक्षण । करावें जाऊन पृथ्वीवरी ॥२॥
ऐकूनि तें द्रोण म्हणे विरंचीसी । जडो श्रीहरीची भक्ति पूर्ण ॥३॥
तरीच आपणा जन्म येवो जनीं । नेई उद्धरुनि सुजनां भक्ति ॥४॥
ऐकूनियां ब्रह्मा बोलला तथास्तु । पूर्ण झाले हेतु वसूचे त्या ॥५॥
नंद-यशोदा तीं द्रोण धरा जाणें । विरंचीवचनें लाभ ऐसा ॥६॥
वासुदेव म्हणे थोरांचें वचन । करी हेतु पूर्ण मानवाचे ॥७॥