आतां श्राद्धभोजनाविषयीं प्रायश्चित्त सांगतों -
अथश्राद्धभोजनेप्रायश्चित्तं दर्शेषट् प्राणायामाः वृद्धौत्रयः संस्कारेषुजातकर्मादिचूडांतेषुसांतपनं आद्येचांद्रंवा अन्यसंस्कारेषूपवासः सीमंतेचांद्रमितिविज्ञानेश्वरः आपदिनवश्राद्धैकादशाहेषुभोजनेषु कायः द्वादशाहेऊनमासेचपादोनः द्विमासेत्रिपक्षेऊनषष्ठोनाब्दयोश्चार्धकृच्छ्रः त्रिमासाद्याब्दिकांतेषुसपिंडनेचपादकृच्छ्रः उपवासोवा गुरुद्रव्यार्थभोजनेर्धं जपशीलेतदर्धं अनापदितूनमासांतेषुचांद्रंकायंवा द्विमासादौपादोनं त्रिमासादावर्धकायः आब्दिकेपादोनकायः पुनराब्दिकेएकाहः क्षत्रियादिश्राद्धेषुद्वित्रिचतुर्गुणानिज्ञेयानि चांडालसर्पश्वादिहतपतितक्लीबादिनवश्राद्धेचांद्रं आद्यमासिकांतेचांद्रंपराकश्च द्वादशाहादौपराकः द्विमासादावतिकृच्छ्रः त्रिमासादौकायः आब्दिकेपादः अभ्यासेसर्वंद्विगुणं आमहेमसंकल्पश्राद्धेषुतत्तदर्धानि यतिर्ब्रह्मचारीचोक्तंप्रायश्चित्तंकृत्वात्रीनुपवासान् प्राणायामान्घृताशनंचाधिकंकृत्वाव्रतशेषंसमापयेत् अनापदिद्विगुणंदर्शादौदशगायत्रीमंत्रिताआपः पिबेत् षटप्राणायामावा संस्कारेषुचौलेकृच्छ्रः सीमंतेचांद्रं अन्येषूपवासइतिदिक् अत्रमाधवमिताक्षरादौक्कचिद्विरोधोविषयभेदात्परिहार्यः एकादशाहेचांद्रंपुनः संस्कारश्चेतिप्रायश्चित्तकांडे हेमाद्रिः यत्तूशनाः दशकृत्वः पिबेदापोगायत्र्याश्राद्धभुग्द्विजइतितदनुक्तप्रायश्चित्तश्राद्धपरमितिविज्ञानेश्वरः ।
दर्शश्राद्धाचे ठायीं भोजन केलें असतां सहा प्राणायाम करावे. वृद्धिश्राद्धांत भोजनीं तीन प्राणायाम. जातकर्मापासून चौलापर्यंत संस्कारांचे ठायीं भोजन केलें असतां सांतपनकृच्छ्र करावें. अथवा पहिल्या ( जातकर्म ) संस्कारांत चांद्रायण करावें. इतर संस्कारांचे ठायीं भोजनीं उपवास करावा. सीमंतसंस्काराचे ठायीं भोजनीं चांद्रायण असें विज्ञानेश्वर सांगतो. आपत्कालीं नवश्राद्ध व एकादशाहश्राद्ध यांचे ठायीं भोजनीं प्राजापत्यकृच्छ्र करावें. द्वादशाह व ऊनमासिक यांचे ठायीं भोजनीं पादन्यूनप्राजापत्यकृच्छ्र. द्विमासिक, त्रैपक्षिक, ऊनषष्ठमासिक आणि ऊनाब्दिक यांचे ठायीं अर्धकृच्छ्र. त्रैमासिकापासून आब्दिकापर्यंत श्राद्धांत व सपिंडीकरणांत भोजनीं पादकृच्छ्र किंवा उपवास करावा. गुरुला द्रव्य देण्यासाठीं भोजन केलें असतां अर्धै प्रायश्चित्त समजावें. नेहमीं जप करणार्या ब्राह्मणास चतुर्थांश प्रायश्चित्त. आपत्ति नसतां ऊनमासिकापर्यंत श्राद्धांत भोजन केलें असतां चांद्रायण किंवा प्राजापत्य कृच्छ्र. द्विमासिक इत्यादिश्राद्धांत भोजनीं पादन्यून चांद्रायण किंवा प्राजापत्य. त्रैमासिकादिकांत अर्धप्राजापत्य. आब्दिकांत पादन्यून प्राजापत्य. अधिकमासप्रसंगीं पुनराब्दिक सांगितलें तेथें भोजनीं एकाह ( उपवास ). क्षत्रिय, वैश्य इत्यादिकांच्या श्राद्धांत हींच प्रायश्चित्ते द्विगुणित, त्रिगुणित, चतुर्गुणित अशीं समजावीं. चांडाल, सर्प, कुत्रा इत्यादिकांनीं मारलेल्याच्या नवश्राद्धांत आणि पतित, नपुंसक इत्यादिकांच्या नवश्राद्धांत भोजनीं चांद्रायण. यांच्या आद्यमासिकापर्यंत श्राद्धांत भोजनीं चांद्रायण व पराक. द्वादशाहादिश्राद्धांत पराक. द्विमासिक इत्यादिकांत अतिकृच्छ. त्रिमासिक इत्यादिकांत प्राजापत्य. आब्दिकांत पादकृच्छ. वारंवार भोजन केलें असतां सारें प्रायश्चित्त द्विगुणित समजावें. आमश्राद्ध, हेमश्राद्ध, सांकल्पिकश्राद्ध यांचे ठायीं त्याच्या त्याच्या निम्मे प्रायश्चित्तें समजावीं. संन्याशी व ब्रह्मचारी यानें श्राद्धीं भोजन केलें असतां वर सांगितलेलें प्रायश्चित्त करुन तीन उपवास व प्राणायाम आणि घृतप्राशन अधिक करुन शेष राहिलेलें व्रत समाप्त करावें. आपत्काल नसतां श्राद्धीं भोजन करील तर द्विगुणित प्रायश्चित्त समजावें. दर्शादिश्राद्धांत दशगायत्रींनीं अभिमंत्रण केलेलें उदकप्राशन करावें. अथवा सहा प्राणायाम करावे. संस्कारांचे ठायीं चौलांत कृच्छसीमंतांत चांद्रायण. इतर संस्कारांत उपवास ही दिशा समजावी. ह्या वर सांगितलेल्या प्रायश्चित्तांत क्कचित् स्थलीं माधव, मिताक्षरा इत्यादि ग्रंथांत विरोध येतो त्याचा परिहार विषयभेदानें करावा. एकादशाहश्राद्धांत भोजन केलें असतां चांद्रायण आणि पुनः संस्कार करावा, असें प्रायश्चित्तकांडांत हेमाद्रि सांगतो. आतां जें उशना सांगतो कीं, “ श्राद्धभोक्त्या ब्राह्मणानें गायत्रीनें दहा वेळां उदक अभिमंत्रण करुन प्राशन करावें ” असें तें, ज्या श्राद्धाविषयीं प्रायश्चित्त उक्त नाहीं तद्विषयक समजावें, असें विज्ञानेश्वर सांगतो.