आतां विधवेचे धर्म सांगतो -
अथविधवाधर्माः मदनरत्नेस्कांदे विधवाकबरीबंधोभर्तृबंधायजायते शिरसोवपनंतस्मात्कार्यंविधवयासदा एकाहारः सदाकार्योनद्वितीयः कदाचन मासोपवासंवाकुर्याच्चांद्रायणमथापिवा पर्यंकशायिनीनारीविधवापातयेत्पतिं नैवांगोद्वर्तनंकार्यंस्त्रियाविधवयाक्वचित् गंधद्रव्यस्यसंभोगोनैवकार्यस्तयापुनः तर्पणंप्रत्यहंकार्यंभर्तुस्तिलकुशोदकैः तत्पितुस्तत्पितुश्चापिनामगोत्रादिपूर्वकम् इदमपुत्रापरमितिमदनपारिजातः नाधिरोहेदनड्वाहंप्राणैः कंठगतैरपि कुंचकंनपरीदध्याद्वासोनविकृतंवसेत् वैशाखेकार्तिकेमाघेविशेषनियमंचरेत् प्रचेताः तांबूलाभ्यंजनंचैवकांस्यपात्रेचभोजनं यतिश्चब्रह्मचारीचविधवाचविवर्जयेत् श्राद्धादौतुविशेषः प्रागुक्तः यत्तुबौधायनः संवत्सरंप्रेतपत्नीमधुमांसंविवर्जयेत् अधः शयीतषण्मासानितिमौद्गल्यभाषितमितितदसवर्णापरमित्यपरार्कः ।
मदनरत्नांत स्कांदांत - “ विधवेचा केशबंध पतीच्या बंधाला कारण होतो, या कारणास्तव विधवेनें सदा मस्तकाचें वपन करावें. सर्वकाल एकवार भोजन करावें. दुसर्या वेळीं कधींही भोजन करुं नये. एक महिना उपवासव्रत करावें किंवा चांद्रायण करावें. विधवा स्त्री पलंगावर शयन करील तर पतीचा अधः पात करील. विधवा स्त्रियेनें कधींही अंगाचें उद्वर्तन ( सुगंधिक चूर्ण वगैरे लावून धुणें ) करुं नये. विधवेनें सुगंधि पदार्थांचा उपभोग करुं नये. तिलसहित कुशोदकांनीं दररोज पति, त्याचा पिता व पितामह यांचें नाम, गोत्र इत्यादि उच्चार करुन तर्पण करावें. हें तर्पण अपुत्र जी विधवा तिला सांगितलें आहे, असें मदनपारिजात सांगतो. प्राण जात असले तरी तिनें बैलावर बसूं नये. कंचुकी धारण करुं नये. रंगविलेलें वस्त्र नेसूं नये. वैशाखांत, कार्तिकांत व माघांत विशेष नियम धारण करावे. ” प्रचेता - “ तांबूल, अभ्यंग, कांशाच्या पात्रांत भोजन हीं संन्याशी, ब्रह्मचारी व विधवा यांनीं वर्ज्य करावीं. ” विधवेनें करावयाच्या श्राद्धाचा विशेषनिर्णय पूर्वीं ( द्वितीयपरिच्छेदांत वगैरे ) सांगितला आहे. आतां जें बौधायन - “ मृताच्या पत्नीनें एक वर्षपर्यंत मध व मांस वर्ज्य करावें. सहा महिने भूमीवर शयन करावें. असें मौद्गल्य ऋषीचें सांगणें आहे. ” असें सांगतो तें भिन्न जातीच्या स्त्रीविषयीं आहे, असें अपरार्क सांगतो.