मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
दासांविषयीं आशौच

तृतीय परिच्छेद - दासांविषयीं आशौच

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां दासांविषयीं आशौच सांगतो -

अथदासस्यस्वदास्युत्पन्नस्यसपिंडमृतौस्नानमात्रेणस्वामिकार्येस्पृश्यत्वम् ‍ भक्तदासस्यत्र्यहोर्ध्वं सद्यः स्पृश्योगर्भदासोभक्तदासत्र्यहाच्छुचिरितिस्मृत्यंतरोक्तेः मूल्यकर्मकराः शूद्रादासीदासस्तथैवच स्नानेशरीरसंस्कारेगृहकर्मण्यदूषिताइतिशातातपोक्तेश्च एतच्चानन्यसाध्यतत्कार्यमात्रे अन्यत्रमासाद्याशौचमस्त्येव एवंदास्यामपि सूतिकायास्तस्याअस्पृश्यत्वमपिमासमात्रं दासीदासश्चसर्वोवैयस्यवर्णस्ययोभवेत् ‍ तद्वर्णस्यभवेच्छौचंदास्यामासस्तुसूतकमित्यंगिरसोक्तेः षडशीतावपि स्वामिशौचेनदासाद्याः स्पृश्यामासात्तुकर्मसु योग्याः स्युर्मासतोदासीसूतीचेत्स्पृश्यतामियात् ‍ दत्तदासादीनांस्वसपिंडमरणादौस्वाम्याशौचसमसंख्यादिनोर्ध्वंसत्यपिमासाद्याशौचेस्वामिकार्येस्पृश्यतेतिहरदत्तः दासांतेवासिभृतकाः शिष्याश्चैकत्रवासिनः स्वामितुल्येनशौचेनशुध्यंतिमृतसूतकइतिबृहस्पतिस्मृतेः दासश्चात्र गृहजातस्तथाक्रीतोलब्धोदायादुपागतः अन्नकालभृतस्तद्वदाहितः स्वामिनाचयः मोक्षितोमहतश्चर्णाद्युद्धप्राप्तः पणेजितः तवाहमित्युपगतः प्रव्रज्यावसितः कृतः भक्तदासश्चविज्ञेयस्तथैववडवाह्रतः विक्रेताचात्मनः शास्त्रेदासाः पंचदशस्मृताइति नारदोक्तेषु गर्भभक्तदासौविनाज्ञेयाः वडवादासीतयाह्रतः तामुद्वाह्यदासोजातइत्यर्थः अंतेवास्यपितेनैवोक्तः स्वशिल्पमिच्छन्नाहर्तुंबांधवानामनुज्ञया आचार्यस्यवसेदंतेकृत्वाकालंसुनिश्चितं आचार्यः शिक्षयेदेनंस्वगृहेदत्तभोजनमिति शिष्यस्तत्तुल्योविद्यार्थी दासादेः स्वामितत्सपिंडमरणेतुविष्णुः पत्नीनां दासानामानुलोम्येनस्वामितुल्यमाशौचंमृतेस्वामिन्यात्मीयमिति प्रतिलोमदासानामाशौचाभावः वर्णानामानुलोम्येनदास्यंनप्रतिलोमतइतियाज्ञवल्क्योक्तेः ।

आपल्या दासीचे ठायीं उत्पन्न जो दास त्याचा सपिंड मृत असतां स्वामिकार्याविषयीं त्याला ( दासाला ) स्नानानें स्पृश्यत्व येतें . भक्तीनें झालेला जो दास त्याचा सपिंड मृत असतां तीन दिवसांनीं स्वामिकार्याविषयीं स्पृश्यत्व येतें . कारण , " दासीचे ठायींज झालेला जो गर्भदास तो सद्यः ( स्नान करुन ) स्पृश्य होतो , आणि भक्त झालेला जो दास तो तीन दिवसांनीं शुद्ध होतो " असें इतर स्मृतीचें वचन आहे . आणि " मूल्य ( मजुरी ) घेऊन कर्म करणारे शूद्र , दासी आणि दास हे स्नानाविषयीं , शरीराला तेल उटी वगैरे लावण्याविषयीं आणि घरांतील कामाविषयीं दूषित नाहींत " असें शातातपवचनही आहे . हें दासांना सांगितलेलें सद्यः शौच दुसर्‍याला न होणार्‍या अशा त्याच्याच कार्याविषयीं समजावें . इतर कर्माविषयीं एक मास वगैरे आशौच आहेच . याप्रमाणें दासीविषयीं देखील समजावें . दासी प्रसूत असेल तर तिला अस्पृश्यत्व एक महिनापर्यंत आहेच . कारण , " दासी व दास हा सर्व ज्या वर्णाचा जो असेल त्या वर्णाचें त्याला आशौच होतें आणि दासीला तर एक महिना जननाशौच होतें " असें अंगिरसाचें वचन आहे . षडशीतींतही - " दासादिकांना आशौच प्राप्त असतां स्वामीच्या आशौच दिवसांनीं ते दासादिक स्पृश्य होतात . आपल्या कर्माविषयीं एका महिन्यानें योग्य होतात . दासी प्रसूत असेल तर एका महिन्यानें ती स्पर्शाला योग्य होते . " दत्तदासादिकांच्या सपिंडाचें मरण वगैरे असेल तर त्यांना एक मास वगैरे आशौच असलें तरी स्वामीच्या आशौचाइतक्या दिवसांनंतर स्वामिकार्याविषयीं त्यांना स्पृश्यत्व आहे , असें हरदत्त सांगतो . कारण , " दास , अंतेवासी , भृतक ( मजुरीनें काम करणारे ), शिष्य हे स्वामीबरोबर एकत्र राहाणारे असून त्यांना मृताशौच प्राप्त असतां स्वामीच्या तुल्य आशौचानें शुद्ध होतात ’ असें बृहस्पतिस्मृतिवचन आहे . येथें दास कोणते ते सांगतो - " घरीं उत्पन्न झालेला , विकत घेतलेला , मिळालेला , दायापासून ( वडिलार्जित जिंदगींतून ) प्राप्त झालेला , भोजनसमयीं भोजन देऊन पोषण केलेला , त्याच्या पूर्ण स्वामीनें ठेवलेला , मोठ्या ऋणापासून मुक्त केलेला , युद्धांत प्राप्त झालेला , पणांत जिंकलेला , ‘ तुझा मी आहें ’ असें म्हणून आलेला , सर्वस्व त्याग करुन प्राप्त झालेला , दास असा केलेला , भक्त असून दास झालेला , दासीशीं विवाह करुन झालेला , आपण विकून घेणारा , असे शास्त्रामध्यें पंधरा दास सांगितले आहेत . " ह्या नारदानें सांगितलेल्या दासांमध्यें गर्भदास आणि भक्तदास हे दोन वर्ज्य करुन बाकीचे दास वरील बृहस्पतिवचनांत घ्यावे . वडवा म्हणजे दासी तिच्याशीं विवाह करुन झालेला जो दास तो वडवाह्रत होय . अंतेवासीदेखील कोणता तो त्यानेंच ( नारदानें ) सांगितला , तो असा - " वडिलांच्या आज्ञेनें आपलें कसब शिकण्यासाठीं अमुक कालपर्यंत राहावयाचें असा कालाचा निश्चय करुन आचार्याच्या जवळ राहील , व आचार्य त्याला आपल्या घरीं भोजन घालून कसब शिकवील , तो अंतेवासी होय . " शिष्य म्हणजे त्याच्यासारखाच विद्यार्थी होय . दास , पत्नी यांचा स्वामी ( यजमान ) किंवा यजमानाचा सपिंड मृत असेल तर सांगतो विष्णु - " अनुलोमानें विवाहित पत्नी व अनुलोमानें उत्पन्न दास यांना यजमानाचा सपिंड मृत असतां यजमानाच्या बरोबर आशौच होतें . यजमान मृत असतां आपल्या जातीचें आशौच . " प्रतिलोमदासांना आशौच नाहीं . कारण , " ब्राह्मणादि वर्णांच्या अनुलोमानें उत्पन्न असतील ते दास होतील . प्रतिलोमानें उत्पन्न ते दास होत नाहींत . " असें याज्ञवल्क्यवचन आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP