(गीति)
झाला सूत शिवाला, कळला वृत्तान्त तेधवां मुदित ।
होउन ऋषींस आणवि, केलें जातक यथाविधी त्वरित ॥१॥
ऋषिंनीं शिव-सूताची, जन्माची कुंडली शिवा कथिती ।
नभ-मास शुद्ध चौथां शशि-वासर सिंह-लग्न दिन स्वाती ॥२॥
जन्माच्या वेळे कीं, ग्रह होते पांच एक राशीस ।
सूताला होते ते, बहु शुभ सारे पराक्रमी खास ॥३॥
शुभ-वेळ सांगुनी ते, गेले सदनास ऐक हे मित्रा ।
अकरावे दिवशीं त्या, गुणेश ऐसें सुनाम दे पुत्रा ॥४॥
कार्यारंभीं घेतां, नाम असें हें अविघ्नपणिं कार्य ।
सिद्धिप्रत जाई तें, देती वर तो सुनाम हो आर्य ॥५॥
गणेशजन्मा दिवशीं, पूजावा तो गणेश भक्तीनें ।
ऐसें महात्म्य आहे, वदले शिव ते बहूत प्रीतीनें ॥६॥
दूतांकरवी कळलें, सिंधूला वृत्त जन्म हो त्याचें ।
इतुक्यामध्यें झाली, विहायवाणि कु-वृत्त तें साचें ॥७॥
ऐकुन सिंधू तेव्हां, शत्रूचा नाश कीं करायास ।
दिधली आज्ञा असुरां, त्यापरि गेले गणेश बघण्यास ॥८॥
होते गणेश तेव्हां, मेरुशिखरीं त्रिसंध्य-धामास ।
व्यासांस सांगती विधि, सांगति भृगु सोमकान्त भूपास ॥९॥