(साकी)
दुःखद वार्ता कळतां तेव्हां सिंधू उदास झाला ।
दुःखी जनका पाहुन सुत दों अळवित ताताला ॥१॥
धृ०॥सुन सुन बा सखया । युद्धकथा ऐकें या ।
अधर्म धर्म हे मागति आज्ञा युद्धाला जाण्याची ।
आज्ञा होतां दलासहित ते निघती रणांत तोंची ॥२॥
सेनानीनें प्रवेश केला असुर-दलीं हननाला ।
सिंधू-सुत हें पाहुन दोघे शिरले सुर-दलनाला ॥३॥
इतुक्यामध्यें सेनानीनें धरिला अधर्म हस्तीं ।
नंतर धर्मा धरिता झाला तैसा दुसर्या हस्तीं ॥४॥
गरगर फिरवुनि दोघांनाही धरणीवरि आपटीलें ।
सुत सिंधूचे वधिले तेव्हां पळुनि राक्षस गेले ॥५॥
तिकडे सिंधुस पुत्रवधाची हकिकतही कळली ।
जय जय ऐसें गणपति नामें सुर-सेना वदली ॥६॥
पुत्र-वधाचें वृत्त ऐकुनी पडिला असनाखालीं ।
मूर्च्छा आली परिसुन तेव्हां दुर्गा झडकरि आली ॥७॥
धृ०॥ सुन सुन मित्रमणी । शोक कथाही श्रवणीं ।
पुत्र-वधाचा शोक जाहला दोघांना तो भारी ।
अनीवार हा शोक निवारुनि समजावित जन नारी ॥८॥
चिरंजीव हें नाहीं कोणीं निःसिम-भक्तच वानी ।
बली मारुती व्यास बिभीषण परशुराम हो अवनीं ॥९॥
कृपाचार्य नी अश्वत्थामा हेच चिरायू झाले ।
परिजन भाषण ऐकुन दोघे तदुपरि सावध झाले ॥१०॥
चक्रपाणिही सिंधुस सांगे मुक्त करी देवांसी ।
म्हणजे हितकर मैत्री होइल गणपति देवासी ॥११॥
बापाचाही बोध सिंधुला रुचला नाहीं व्यासा ।
पुत्र-सुडास्तव हयपति होऊन समरीं जाइल खासा ॥१२॥