(गीति)
भक्तीमित वरुषांचा, भक्तिप्रिय भक्तनाथ मयुरेश ।
जाई कासारीं तो, मित्रांसह मज्जनार्थ हें मीष-श ॥१॥
इतुक्यांमध्यें तेथें, हयरुपीं दैत्य येत पीडाया ।
शिशुंशीं पीडा करितो, पाहुन अरुढे प्रभू स्वयें सखया ॥२॥
सत्वर हय शिरला त्या, कासारीं त्या प्रभूस घेऊन ।
आला गणेश तीरा, धरिला हय तो जलांत बुडवून ॥३॥
कर्णीं नाकीं शिरलें, कासारीचें विशुद्ध तें नीर ।
गेला प्राण तयाचा, झाला हय तेधवां तिथें असुर ॥४॥
बाळांसह मयुरेशें, नानाविध खेळ खेळुनी दावी ।
अपुल्या विराटरुपा, बाळांना तो तिथें स्वयें दावी ॥५॥
आल्या कासारीं त्या, जलकेलीसी कुमारिका अहिच्या ।
पाहुन गणेशदेवा, मोहित झाल्या तिरावरी साच्या ॥६॥
वदती तयास तनया, विव्हळ बघुनी अम्ही महाराज ।
अमुच्या सदनीं यावें, कृतार्थ आम्हां करा तुम्ही आज ॥७॥
ऐसें वदून देवां, त्यांनीं नेलें बळेंच पाताळीं ।
त्यांना पहात सारी, सदनांसी मित्र मंडळी गेली ॥८॥
मध्यंतरिं पण त्यांना, संकटिं पाडी भगासुर प्रथम ।
उघडी मुखास मार्गीं, धरितो सारीं मुखीं मुलें अधम ॥९॥
मित्राचें संकट तो, जाणुन धरितो द्वितीय तें रुप ।
आला गणेश तेथें, राक्षस उदरीं शिरुन घे रुप ॥१०॥
झाला विशाल तेव्हां, राक्षस तनु जाहली जशा फाकी ।
इकडे समस्त ऋषि हो, सूतासाठीं करीत चिंता कीं ॥११॥
मुनिंची करुणा आली, रुपें धरिलीं समस्त सूतांचीं ।
सदनीं प्रत्येकीं तीं, गेलीं मुनिसीच भासलीं त्यांचीं ॥१२॥