(ओवी)
एके दिवशीं गजानन । पाराशर लागून ।
इष्ट कार्य जाणून । अवतार घेतला असे मीं ॥१॥
करावया सिंधूरहनन । योग्य समय साधून ।
वध तयाचा करीन । आशीर्वाद द्यावा मजलागीं ॥२॥
(गीति)
असुरें धार्मिक विधिचीं, कर्मादी यज्ञयागही कृत्यें ।
केली बंद म्हणूनी, धर्माचा लोप होत तत्कृत्यें ॥३॥
ऐकुन पराशराला, वाटे आश्चर्य तेधवां व्यासां ।
शीर्षा आशीर्वादें, ठेवी कर वरद तो असा खासा ॥४॥
नंतर मूषक वहनीं, बसतांना घेतलीं करीं अयुधें ।
शंकर उमा नि विष्णू, स्मरुनी गर्जे निघे पथीं साधें ॥५॥
नगरासमीप येउन, गर्जे अणखी गजानन प्रभु तो ।
ऐकुन ध्वनीस तेव्हां, मूर्च्छागत दैत्य दैत्यपति होतो ॥६॥
मूर्च्छा वारुन येती, धीराचे वीर उत्तरें वेशीं।
बघती गजाननाला, वदती तेथून भीत ते त्याशीं ॥७॥
गर्जे भीषण भारी, अससी तूं कोण सांग हें बाळ ।
वदला तयांस मग तो, पार्वतिउदरीं जनीत मी बाळ ॥८॥
मजला पराशरांनीं, वाढविलें मी असून परमात्मा ।
माझा विक्रम मोठा, गर्व असा सिंधुरास हो आत्मा ॥९॥
त्याच्या वधार्थ आलों, सांगा जाऊन आपुल्या भूपा ।
दूतमुखांनीं ऐकुन, सिंधुर सायुध सजून ये रुपा ॥१०॥
(वसंततिलका)
पाहे गणेश मग सिंधुर राक्षसास ।
झाला विराट समरीं बघतां तयास ॥
भ्याला असे तरिहि सिंधुर धीट झाला ।
केला प्रहार असिनें गणराज याला ॥११॥
तों त्या धरी गणपती चिरडी तनूनें ।
सिंधूरयुक्त तनु ती तनुघर्षणानें ॥
झाली म्हणून वदती गणभक्त त्याचे ।
सिंधूरमूख अथवा प्रिय त्या प्रभूचें ॥१२॥
सिंधूर दैत्य वधला म्हणुनी सुरांनीं ।
केला तिथेंच जयघोश मुदें मुखांनीं ॥
भेटीस येति बहु भूप गजाननाच्या ।
पाहे वरेण्य निरखून रुपास त्याच्या ॥१३॥
जें टाकिलें वनिं शिशू अपुलाच सूत ।
जाणे वरेण्य मग हें अपुल्या मनांत ॥
मागे क्षमा तदुपरी प्रभुपाशिं भूप ।
बोले गजानन न हो नृप दुःखरुप ॥१४॥
(गीति)
तुम्हीं दंपत्यांनीं, निःसिम तपसा करुन पूर्वीच्या ।
जन्मीं मला सुतोषित, केलें म्हणुनी घरास ये तुमच्या ॥१५॥
आतां ती निजधामा, जातों वदला गजानन प्रभु तो ।
वदला वरेण्य त्यासी, मोक्षाचा बोध सांग मी नमितों ॥१६॥
विधि व्यासांसी वदती, वरेण्य भूपा गणेश ती सांगे ।
सर्वत्र सिद्धिदायक, महत्त्व आहे स्वयें गिता आंगें ॥१७॥