मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
सोमकांताचें विमानारोहण

क्रीडा खंड - सोमकांताचें विमानारोहण

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

शौनक आदि करुनी, सत्राला प्राप्त जाहले मुनि ते ।

गणपतिपुराण कथिती, पुराणपटु सूत तेधवां त्यातें ॥१॥

भृगुमुनि पुराण कथिती, ऐकाया सोमकांत सहचारी ।

त्याचि सुधर्मा कांता, संगें होते अमात्य द्वयचारी ॥२॥

ऐकें पुराण भूपति, तेव्हांपासून पुराण पूर्ण करी ।

तोंवरि च्युतवृक्षाची, रक्षासिंचन करीतसे स्वकरीं ॥३॥

तें पुण्योदक होतें, संजीवनयुक्त श्रवण करण्याचें ।

उदकें सजीव तरुवर, झाला नृपती सुदेह फल त्याचें ॥४॥

नृपती सुंदर पाहुन, आश्चर्ये चकित जाहले लोक ।

भृगुंनीं आज्ञा दिधली, सदनीं जाण्यास ऐकती लोक ॥५॥

वदला भृगूंस भूपति, अपुलें तप नी पुराण गणपतिचें ।

सामर्थ्य असे अद्‌भुत, उद्धरिलें मीं म्हणून शिशु तुमचें ॥६॥

मजला राज्यादिकही, गरज नसे वाटतें भृगू मुनि हो ।

इतुक्यामध्यें गगनीं, घंटारव होतसे बघे वर हो ॥७॥

आलें विमान तेथें, म्हणती भृगु सोमकांत भूपासी ।

तुजला गणेशलोकीं, नेण्यासाठींच ये वनिंसी ॥८॥

जावें गणेशलोकीं, वदतां मुनिंनीं विमान देखियलें ।

भूपति म्हणे मुनींसी, श्रवणीं महिमा कसा असे कळलें ॥९॥

ऐसें भाषण होतां, तों आले दूत त्या गणेशाचे ।

भक्‍ति तुझी श्रीप्रभुंनीं, पाहुन लोकीं अणा वदे वाचे ॥१०॥

अमुचे समीप यावें, ध्यावें सुख तें गणेशलोकाचें ।

ऐकुन गहिंवर आला, बोले दूतांस त्या स्वरें वाचे ॥११॥

केलें गजाननानें, माझे स्मरणास हेंच आश्चर्य ।

अपुली आज्ञा असल्या, तरि बैसें मी सुयोग्य मुनिवर्य ॥१२॥

आलिंगिलें मुनींनीं, वदले माझें तुला असो स्मरण ।

घेउन निरोप नंतर, यानासी सव्य घातलें जाण ॥१३॥

भृगुला वंदन केलें, पत्‍नीसह बैसले विमानांत ।

नंतर दूतांनीं तें, चालविलें बहु त्वरीत गगनांत ॥१४॥

नंतर दंपत्यांनीं, देखियलें कीं स्वपूर नयनांनीं ।

झालें स्मरण तियेला, पुत्रासी भेटुं येतसे ध्यानीं ॥१५॥

पत्‍नीभाषण ऐकुन, राजाचें मन तदर्थ पाझरलें ।

दूतांकडून भूपें, नगरासंनिध विमान उतरविलें ॥१६॥

नंतर अमात्य दोनी, उतरुन गेले सुतास कळवाया ।

बघतां अमात्य त्यांना, उतरे असनावरुन भेटाया ॥१७॥

पुत्रानें पितरांचें, पुशिलें आधीं त्वरीत तें क्षेम ।

कथिती अमात्य त्यातें, घडलेलें सारभूत तें क्षेम ॥१८॥

अपुले तात विमाना, भेटीसाठीं बसून यानांत ।

उत्कठेनें आली, यास्तव आपण त्वरें चला म्हणत ॥१९॥

ऐकुन अमात्यभाषण, पौरजनांसह निघोन युवराज ।

दर्शन घेण्यासाठीं, नगराबाहेर येतसे सहज ॥२०॥

युवराज येत भेटी, कथिलें भूपा अमात्य येऊन ।

बघती वाट तयाची, उत्कटप्रेमें जसा शशी सान ॥२१॥

इतुक्यामध्यें तेथें, पौरजनांसह समस्त परिवारें ।

आला सत्वर भेटी, जननी-जनका नमीत परिवारें ॥२२॥

नूतन वर रमणीसी, आलिंगी त्यापरीच शशिकांत ।

आलिंगी सूतासी, कथिलें श्रीचें पुराण जें श्रूत ॥२३॥

मागे निरोप भूपति, तेव्हां रुदती समस्त तेथें कीं ।

अपणां त्यजून मागें, दुःखदसें राहणें जगीं हिन कीं ॥२४॥

अपुल्यासमीप यावें, वाटे आम्हीं समस्त वृंदांनीं ।

ऐकुन भूपति देई, श्रवणाचें पुण्य त्यांस उदकांनीं ॥२५॥

निष्पाप नगरवासी, झाले सर्वत्र त्याच उदकानें ।

झाले विमानवासी, गेले गगनांत यान वेगानें ॥२६॥

झाले समस्त हर्षित, नाम गजानन म्हणून घोषरव ।

झाला प्रभूत गगनीं, महिमा प्रकटे महींत हा भाव ॥२७॥

जेव्हां विमान गेलें, काशी-नगरावरुन चालून ।

तेव्हां दूतांनीं त्या, भूपाला श्रेष्ठ कां असे स्थान ॥२८॥

गणपति असंख्य नामें, सांगुन स्थापन इथेंच त्या मूर्ती ।

असती यास्तव नगरीं, पुण्यप्रदही म्हणून ही कीर्ती ॥२९॥

या मूर्तीचीं नामें, वदनीं वदतां पिडा न हो विघ्न ।

दूर्वा तंडुल तिल वा, शमिपत्रीं पूजितांच निर्विघ्न ॥३०॥

इच्छित कार्य खरोखर, होतें साध्य प्रभूस यजितां तें ।

आयुष्य पुष्टि-वर्धित, होती तैसें अरोग्य सुख मिळतें ॥३१॥

ऐसें महत्त्व नामीं, कथिती भूपा म्हणून तें गावें ।

प्रभु-लोक-मार्ग क्रमितां, ऐकत नृपती सुलोकिं तो पावे ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP