(शार्दूलविक्रीडित)
व्यासानें विधिला नमून पुसलें द्वापारिंचें वृत्त तें ।
त्रेतीं त्या मयुरेश नाम वदती झालें मला श्रूत तें ॥
पावे ईश गजाननास बरवें नामास कीं कारण ।
त्यासी मूषक हें वहान कथणें कैसें मिळे कारण ॥१॥
होतों मी अपुला खुशाल निजलों भेटीस ये शंकर ।
त्यांनीं त्या समयीं मला उठविलें जृंभाच ये सत्वर ॥
तेव्हां तींतून एक बालक निघे गेले गृहा शंकर ।
त्यांना मीं पुसलें तया झडकरी तूं कोण सांगें तर ॥२॥
बोले बालक तें तुम्हांस उठतां जृंभा तदा येतशी ।
माझा जन्म तियेमधून पडलों तुंडांतुनी भूमिशीं ॥
माझे तात तुम्ही म्हणून सुत मी आहें वदे तें तदा ।
आतां काय करुं कुठें गमन मी खाउन राहूं वदा ॥३॥
आज्ञा ही मजसी श्रवून वदलों जाई फिरें तूं जगीं ।
नाहीं भीति तुला जया कवळिशी त्या मृत्यु ये या युगीं ॥
आहे ताम्रतनू म्हणून तुजला सिंधूर हें नाम मी ।
ठेवीं सत्य तुला म्हणून वदलों सिंधूर मातें नमी ॥४॥
(वसंततिलका)
सिंधूर तो करितसे स्वमनीं विचार ।
केलें नमून जप नी तप मी कुमार ॥
तातें मशीं वर दिला मज येइ शंका ।
पाहूं प्रचीत म्हणुनी सुत येइ लोका ॥५॥
मातें वदे प्रथम मी बघतों प्रचीती ।
आलिंगितों प्रथम मी तव देह हातीं ॥
ऐकून मी वदतसें मुर होइ सूता ।
मारी गजानन तुला मम शाप सूता ॥६॥
(गीति)
गेलों पळून मग मी, विष्णूकडे त्वरित खास वैकुंठीं ।
सिंधुर तेथें येउन, तातडिनें लागला असे पाठीं ॥७॥
विष्णू वदले त्याला, अमुचे वाटे कशास जातोसी ।
मोठा पराक्रमी शिव, युद्ध करी धैर्य दाखवी त्यासी ॥८॥
चिडवून त्याला दिधलें, हरिलें संकट त्वरीत दोघांनीं ।
गेला कैलासीं तो, शंकर ध्यानस्थ हें बघे नयनीं ॥९॥
दिसली पार्वति त्याला, रुपा भुलला त्वरीत घे तिजला ।
स्वमुखीं गजाननाचा, करित्ये धावा प्रभू तिथें आला ॥१०॥
विप्रस्वरुप होतां, तों आले शंभुही तया स्थानीं ।
सिंधुर तयास म्हणतो, योग्य नसे शंकरा तुला पत्नी ॥११॥
बोलुन शिवास ऐसें, बोलावी तो तयास कर युद्ध ।
करिती तिथेंच दोघे, मल्लयुधा लागले स्वतां सिद्ध ॥१२॥
इतुक्यामध्यें तेथें, शिरला द्विज काय बोलतो वाचे ।
तुमच्या दोघांमध्यें, हाल नको या गरीब अबलेचे ॥१३॥
माझेपाशीं ठेवा, अबला ही सागतों करा युद्ध ।
ज्यासी मिळेल जय त्या, देईं अबला तयास मी सिद्ध ॥१४॥
राक्षस कबूल झाला, युद्धासी पातला शिवासंगें ।
कवळी शिवास तों करिं, गुप्तत्वें परशु फेकि द्विज अंगें ॥१५॥
केला अघात त्यानें, शिव त्रिशुलानें मिळून एकसरें ।
झाला विव्हळ सिंधुर, विप्र वदे तूजला नसे जय रे ॥१६॥
यास्तव हक्क तुझा कीं, गेला आहे खरोखरी स्त्रीचा ।
आतां सावध व्हावें, नाहीं तर भस्म हो करीं साचा ॥१७॥
सिंधुर उदास झाला, गेला सत्वर निघून माघारीं ।
प्रकटे तेथें प्रभु तो, आई भेटे तुम्हांस द्वापारीं ॥१८॥
वचन कराया साचें, उदरीं जन्मोन तुमच्या आई ।
पुढती कथानकाला, ऐकें व्यासा सुशांतसा भाई ॥१९॥