(गीति)
सिंधू सभेंत असतां, नंदी गेला तयासवें कोणीं ।
भाषण केलें नाहीं, यास्तव बोले तयास ही वाणी ॥१॥
मी कामधेनुसुत कीं, शंभूचें मी वहानही आहें ।
त्याचा गणेश सुत तो, शूर असोनी पराक्रमी आहे ॥२॥
सामासाठीं त्यानें, पाठविलें या स्थलास मजला कीं ।
जिंकुन समस्त देवां, कारागृहिं ठेविलेंस अपुल्या कीं ॥३॥
सोडी तयास आतां, ऐकुन सिंधूस ये बहू राग ।
नंदीस म्हणे तेव्हां, भीत नसे हें तयास तूं सांग ॥४॥
अससी दूत म्हणूनी, तुजसी सोडी कृपाच समजावी ।
नाहीं तर तुजला कीं, जुंपुनियां हाल ओढण्या लावी ॥५॥
यावर नंदी त्यासी, नानाविध सांगतो प्रकारांनीं ।
सिंधू ऐकत नाहीं, जाणुन पाडी तयास श्वासांनीं ॥६॥
परते तसाच तेथुन, सामाचा योग हा नसे सांगे ।
ऐकुन गणेश तेव्हां, युद्धासी सिद्ध जाहला वेगें ॥७॥