(साकी)
सिंधुर असुरा शंकर करिती पराभूत युद्धांत ।
सुटला तेथुन खिन्न वदनसा अवनिवरी मग येत ॥१॥
धृ०॥सुन सुन रे भाई । कथन मनोहर पाहीं ।
पुढती त्यानें त्रिवर्ग आम्हां पीडियिलें सकलांला ।
जिकडे तिकडे अधर्म माजे देवगुरु हें वदला ॥२॥
आतां सारे आपण मिळुनी स्तवन निश्चयें वाचे ॥३॥
स्तुती ऐकुनी प्रकट जाहला देव गजानन मग तो ।
रुप मनोहर तेजयुक्त तो सकलांना हें वदतो ॥४॥
सिंधुर मारिन सत्य असें हें नको काळजी साच ।
नाम गजानन पार्वतिउदरीं जन्मुन येतों मीच ॥५॥
धीर देउनी गुप्त जाहला पार्वतिउदरीं जाई ।
दोहद होती यास्तव शिव ते बघती सुंदर राई ॥६॥
त्या राईचें नांव परियळी सुंदरसी रमणीय ।
वास कराया शिव ते गेले देव सवें स्तवनीय ॥७॥