(गीति)
गिरिजेस पुत्र झाला, कळला वृत्तान्त त्या हिमाद्रीस ।
गिरिजेस भेटण्यासी, मेरुशिखरीं हिमाद्रि ये खास ॥१॥
त्यानें गजाननाला, हेमाचे नी सुरत्न-मणि-युक्त ।
दिधले बहूत नग हो, हेरंबाभिद सुनाम करि युक्त ॥२॥
एके दिवशीं बालक, अंगणामध्यें उभा असे शान्त ।
इतुक्यामध्यें गगनीं, गृध्र विहंगम बहूत तो फिरत ॥३॥
झडपुन त्यानें बालक, उचलुनि नेलें त्वरीत तें गगनीं ।
गर्वित गृध्र असे तो, बालक धरि चंचु त्याचि दाबूनी ॥४॥
कोंडे श्वास तयाचा, भूमीवर तो पडे मृतप्राय ।
पक्षी उरप्रदेशीं, बालक क्रीडा करी बघे माय ॥५॥