(गीति)
उदधी समान दिसली, राक्षससेना गजानना समरीं ।
अयुधें सज्ज करुनी, शिखिवरि बैसे त्वरीत ये स्वारी ॥१॥
तेथें शंकर होते, असंख्य गण घेउनी रणीं ठेले ।
वृषभें सिंधु हयासी, शृंगीं जर्जर करुन सोडियलें ॥२॥
सिंधू अपुल्या वीरां, निर्भर्त्सी तो प्रचूर वचनांनीं ।
कौस्तुभ नी मैत्र असे, दोघे मंत्री रणांत तोर्यांनीं ॥३॥
येती बघून त्यांना, स्कंद रणीं वीरभद्र शौर्यांनीं ।
लोळविती मंत्र्यांना, येई सिंधू त्वरित त्वेषांनीं ॥४॥